लवंगी मिरची : पादचार्‍यांमध्ये फूट पाडणारे पाथ! | पुढारी

लवंगी मिरची : पादचार्‍यांमध्ये फूट पाडणारे पाथ!

आजी, मित्रांबरोबर जातोय गं. यायला उशीर होईल.
उशीर होऊ दे; पण सुरक्षित या, रस्ता आपल्या तीर्थरुपांचा असल्यासारखे रस्त्यावरून टोळक्यात फिरू नका रे पोरांनो. नेहमी फूटपाथवरून चालावं रे.
ते आता शक्य नाही आजी.
का?
अगं, फूटपाथवर पाय ठेवायला जागा नसते आता. तू घराबाहेर पडत नाहीस फारशी, म्हणून तुला माहीत नसते आजची परिस्थिती.
पदपथावर पाय ठेवायला जागा नाही? उगाच बाता मारू नकोस हं माझ्यासमोर.
येऊन बघ. आजकाल फूटपाथवर कंप्लीट बाजार भरलेला असतो. कॉलेजजवळच्या रस्त्यांवर तर फारच.
रस्त्यावर म्हणजे फारतर गोळ्या चॉकलेटं विकत असतील ना?
कुठल्या जमान्यात वावरते आहेस तू आजी? अगं, आता रस्त्यावर कपडे, बूट-चपला, मोबाईल फोनची कव्हरं, फ्रेंडशिप बँड, मुलींची कानातली, गळ्यातली, पोस्टर्स, पुस्तकं, असं काहीही विकत मिळतं बरंका. माल ठेवण्यापुरती एक चादर टाकली किंवा एखादं बाकडं, खोकडं उभारलं की विक्री सुरू!
मग बाजार काय ओस पडलेत का? का तुम्ही कॉलेजमधली पोरं अभ्यास करायला बाजारात जाता?
आम्ही कुठे अभ्यास करतो? आम्ही आपले रस्त्यांवरून माल बघत हिंडतो. माल म्हणजे निर्जीव माल हं. नाहीतर उगाच लेक्चर द्यायला लागशील त्यावरून.
मी ढीग देईन. तू ऐकणार आहेस? पण मी म्हणते, हाच माल जरा मागे सारला तर पुढच्या उरलेल्या फूटपाथवरून चालू शकाल की तुम्ही.
तिथे खाऊ गल्ली भरते.
काय? वाहत्या रस्त्यावर खाऊ गल्ली?
हो तर. माणसं खाऊ खातात. खाऊ गल्ल्या रस्ते खातात. चणेफुटाण्यापासून चायनीजपर्यंत, कणसांपासून मोमोपर्यंत काहीही विकत मिळतं रस्त्यावर. फ क्त तिथे पंगती वाढल्या जात नाहीत अजून.
पण काय रे? तुमच्याइथे अतिक्रमणविरोधी कारवाई वगैरे होत नाही का?
होते ना मध्येच अचानक एखाददा. गाडी आली, गाडी आली, अशी कुजबूज सुरू होते. मग सगळे आपापल्या चादरी गुंडाळून जीव तोडून पळत सुटतात. दोन दिवस शुकशुकाट होतो की तिसर्‍या दिवसापासून पुन्हा ‘सौका तीन’, ‘सौका तीन’ असं होतं सुरू.
मग तुमच्या म्युनिसिपालट्या काय करतात?
नो हॉकर्स झोन जाहीर करतात. काय ती ओटा मार्केटं वगैरे काढतात. खाद्यपदार्थांच्या विक्रीबद्दल तर खूपच कडक नियम असतात त्यांचे. ते नियम काढतात. लोक ते खुशाल मोडतात.
म्हणजे फूटपाथ पादचार्‍यांसाठी नसतातच का आता?
असतात ना. जेवढे शिल्लक उरले असतील तेवढे. तीन माणसं एकत्र बाहेर पडलो असलो तर एकामागे एक असं कवायतीत लेफ्ट-राईट, लेफ्ट-राईट केल्यासारखं चालायला मिळतं फारतर. एका बाजूला कणीस भाजायची शेगडी किंवा मोमोचा पेटता स्टोव्ह आणि दुसर्‍या बाजूला भरधाव जाणारी गाडी, ह्यापैकी कशात पडायचं हा तुमचा चॉईस.
अरेरे, काय रे ही अवस्था तुमच्या रस्त्यांची?
ते नावाला जागतात आजी. फूटपाथ म्हणजे पादचार्‍यांमध्ये फूट पाडणारे पथ किंवा पाथ, घ्यायचीये एखादी ट्रायल? मग चल माझ्याबरोबर.

– झटका

Back to top button