लवंगी मिरची : भाव तोचि देव! | पुढारी

लवंगी मिरची : भाव तोचि देव!

कसा आहे माझा नवा शर्ट पप्पा?
छान आहे. शोभतोय तुला; पण त्यासाठी प्रचंड किंमत मोजून खिशाला केवढं भगदाड पाडलंय ते एकदा सांगा चिरंजीव.
काहीच नाही पडलं एवढं. चाळीस टक्के सवलत भेटली ना! किस खुषीमें?
ऑफर होती पप्पा. आजकाल आम्ही लोक ऑफरशिवाय काही घेतच नसतो .
आता सारख्याच ऊठसूट सवलतीच्या ऑफर येतात. म्हणून उगाच अनावश्यक जिन्नस खरेदी करता बरं का तुम्ही लोक. अगदी पाच टक्क्यांपासून थेट साठ टक्क्यांपर्यंत काहीही सवलतीचं गाजर दाखवलं की, निघाले शॉपिंगला.
नुसतं तेवढंच नाही. खरं तर ‘डील ऑफ द डे’ बघायचं असतं पप्पा. अहो शास्त्र असतं ते. उगाच बाजारात जाऊन हवी ती वस्तू छापील किमतीला घेऊन टाकत नसतो आम्ही लोक.
पण काय रे, जो शर्ट तीनशे रुपयांना विकला तरी परवडतो, तो आधी सहाशे आणि सातशेला विकावाच का म्हणतो मी? का तेव्हा किंमत न परवडल्याने तो अजिबात विकला जाऊ नये असं वाटत असतं विक्रेत्याला?
मार्केटिंगचं आख्खं सायन्स असतं पप्पा त्यामागे.
होय काय? ते सायन्स, आर्ट कॉमर्स काही असो. मला तर बुवा आजकाल कशाची खरी किंमत काय तेच कळत नाही एकेकदा.
का? बघून चेक नाही करता येत?
तोच तर वांधा असतो ना. एकेकदा दुकानातला पाचशेचा शर्ट आणि पाच हजारांचा शर्ट नुसता बघून सारखाच वाटतो. काही काही वेळा स्वस्त माल तर जास्तच झगमगीत दिसतोय असंही होतं.
त्याची पारख फक्त खोचंदळ लोकांनाच करता येते.
शक्य आहे. आम्ही नसू एवढे खोचंदळ. म्हणजे बहुधा चोखंदळ म्हणायचं असणार तुला.
शब्दात पकडू नका. पॉईंटचा मुद्दा ध्यानी घ्या.आताचं जग हे ग्राहकांचं नंदनवन आहे.
ऊर्फ उधळपट्टीला आवतण ठरतंय ते. आम्ही बुवा प्रत्येक बिल बारकाईने पाहायचो. एक पैसा वायफळ जाऊ द्यायचो नाही.
काल मला वीज बिल भरायला लावलंत, ते कधी बारकाईने पाहिलंत?
त्यात काय पाह्यचं? ते तर आयुष्यभर येणार, भरावं लागणार आहेच.
तरीपण, बघून काय कळतं ते सांगा. काय तर म्हणे, मूळ देयक, त्यावर अधिभार, स्थिर आकार, वीज शुल्क, वीज वहन आकार, इंधन समायोजन आकार…
अशी मोठी यादी आहे त्यात. वाचलीत कधी? विचारलंत कोणाला की बापहो, हे कसले पैसे मागताय?
आँ? वीज शुल्कही? आणि वीज वहन आकारही? ह्या दोनांत काय फरक म्हणे?
एक्झॅक्टली! शेवटी आपल्यासारखी माणसं येतील ती बिलं भरतातच ना? कोणी शहानिशा करतं त्यांची? बाजार म्हणतो, हम जो भाव बतायेगा वहीच तुम देव.
म्हणजे भाव तोचि देव म्हटल्यासारखं झालं.
तेच सांगतोय. तुम्हीही आयुष्यभर फक्त बिलं भरत गेलायत. चोखंदळपणाच्या गोष्टी कशाला सांगता?

– झटका

संबंधित बातम्या
Back to top button