टीटीपी नामक ‘भुताटकी’ | पुढारी

टीटीपी नामक ‘भुताटकी’

अफगाणिस्तानातून अमेरिकन सेनेने माघार घेतल्यामुळे जगातल्या अनेक देशांना तालिबान्यांचे भय वाटणे स्वाभाविक आहे. कारण, पुन्हा एकदा त्यांच्या अतिरेकामुळे दोन दशकांपूर्वी होती तशी जागतिक जिहादची शक्यता निर्माण झालेली आहे. शिवाय अजूनही अनेक देशांचे नागरिक अफगाणिस्तानमध्ये अडकून पडले असून त्या सर्वांना मायदेशी सुरक्षित आणायचे आहे. ज्यांना तशी अजिबात भीती नाही असा एकच देश आहे, तो पाकिस्तान; पण पाकिस्तानलाही तालिबान्यांच्या विजयाने वेगळी भीती सतावत आहे आणि त्याची वाच्यता कुठे होत नाही. पाकला त्यावर उघडपणे बोलता येत नाही, ती भीती ‘तहरिके तालिबान पाकिस्तान’ची. आंतरराष्ट्रीय जगात त्याचा उल्लेख टीटीपी असा होत असतो.

हे पाक तालिबान अफगाण तालिबानांचे समर्थक आहेत, तितकेच पाकचे शत्रू आहेत. त्यांचे निर्दालन करताना पाकिस्तानी सेनेच्या नाकी मागल्या दहा वर्षांत दम आलेला आहे. 2007 च्या सुमारास या संघटनेची स्थापना झाली. तिच्या समोर तीन मुख्य उद्दिष्टे होती. अमेरिकन सेनेच्या माघारीने त्यापैकी दोन उद्दिष्टे साध्य झालेली आहेत. उरलेले एकमेव उद्दिष्ट जगासमोर चर्चिले जात नाही आणि त्यामुळेच पाकिस्तान भयभीत झालेला आहे; मात्र त्यावरचा उपाय शोधताना पाक सरकार व सेनेला घाम फुटलेला आहे.

‘तहरिके तालिबान’ म्हणजे पाक-अफगाण सीमेलगतच्या प्रदेशातील लढवय्ये असून त्यांना पाकिस्तानातले पंजाबी वंशाच्या सेनेचे वर्चस्व मान्य नाही. ज्यांना पश्तून म्हणतात, त्या वंशाचे त्यांच्यात प्राबल्य आहे. त्यामुळेच अमेरिकेने अफगाण भूमी व्यापल्यापासून या टीटीपीच्या लढवय्यांनी कायम अफगाण भूमी मुक्‍त होण्यासाठी तालिबान्यांना मदत केली आहे. पाकमध्ये शरियत राज्य असावे, हे त्यांचे उद्दिष्ट साकारलेले नाही आणि पाकचे राज्यकर्ते व सेना यांना संपवल्याखेरीज ते शक्य नाही, असे त्यांचे ठाम मत आहे.

संबंधित बातम्या

साहजिकच त्यासाठी अफगाण तालिबान सत्तेने त्यात मदत करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. पाकमधले 27 जिहादी गट-संघटना एकत्र येऊन त्यांनी टीटीपीची स्थापना केली होती. त्यांच्या कारवायांना कत्लेआम करून रोखण्याचा कितीही प्रयत्न केला, तरीही पाकिस्तानच्या सेनेला यश आलेले नाही. मागल्या दीन दशकांत त्यांनी पाक सेनेचे हल्ले पचवण्यासाठी अफगाण भूमीत आश्रय घेतला व तिथल्या तालिबान्यांनी मित्र लढवय्ये म्हणून त्यांना आश्रय दिला; पण अफगाणिस्तानात अमेरिकन सेना असल्याने टीटीपीच्या तालिबान्यांचा तिथेही खात्मा करणे पाकला सोपे जात होते किंवा तिथल्या तुरुंगामध्ये आपल्या दुष्मनांना कोंडणे पाकला शक्य झालेले होते; पण अमेरिकेने माघार घेताच तुरुंंग फोडले गेले आणि तिथले हजारो टीटीपी लढवय्ये मुक्‍त झालेे आहेत.

तालिबान्यांची सत्ता स्थापन झाल्यावर त्यामध्ये पाक आणि चिनी राज्यकर्त्यांचा सहभाग असणार, हे निश्‍चित! पण, टीटीपीच्या बाबतीत तालिबान सरकार पूर्ण सहकार्य देण्याची शक्यता खूप कमी वा नगण्य आहे आणि तीच पाकला भेडसावणारी मोठी समस्या झालेली आहे. सरकार स्थापन होण्यापूर्वीच टीटीपीने आपला पराक्रम ग्वादार बंदरात स्फोट घडवून दाखवला आणि त्यामुळे चीनचेही धाबे दणाणले. साहजिकच जितके तालिबान सरकार स्वयंभू होत आपले बुड पक्के करीत जाईल, तितका त्यांचा टीटीपीला असणारा सक्रिय पाठिंबा वाढत जाईल, हे पाकलाही समजू शकते; मात्र त्यावरचा उपाय सापडत नाही, ही त्यांची समस्या आहे. कारण, जितका पाकसेना व गुप्तचर विभागाचा तालिबान्यांवर प्रभाव आहे, त्यापेक्षा अधिक प्रभाव खांद्याला खांदा लावून अमेरिकन सेनेविरोधात त्यांच्यासोबत लढलेल्या टीटीपी लढवय्यांचा तालिबान नेतृत्वावर आहे.

थोडक्यात, आजवर अफगाण भूमीत अमेरिकन सेना असल्याने तिथे तालिबान्यांप्रमाणेच टीटीपी लढवय्यांना मोकाट आश्रय नव्हता. आता त्यांना मोकाट रान मिळणार आहे आणि अमेरिकन सेनेप्रमाणे तालिबान सेनेकडून त्यांचा बंदोबस्त करून घेणे पाकला शक्य होणार नाही. त्याचप्रमाणे अफगाण भूमीत टीटीपीविरोधातली मोहीमही चालवणे शक्य नाही. शिवाय पाक वा पश्तून वंशियांना ब्रिटिशकालीन सीमा म्हणजे डुरांड लाईन मान्य नाही. पर्यायाने दोन्हीकडले तालिबानी वृत्तीचे लढवय्ये रक्‍ताचे नातलग आहेत. त्यांना पंजाबी मुस्लिमांचे वर्चस्व अजिबात मानवणारे नाही, ही पाकिस्तानची खरी अडचण आहे.

पाकिस्तान अस्तित्वात आल्यापासून सर्व सत्तापदांवर किंवा अधिकाराच्या स्थानांवर कायम पंजाबी मुस्लिमांचे वर्चस्व राहिलेे आणि प्रत्येक पाकिस्तानी प्रांताने त्यांच्याविरोधात बंड पुकारलेले आहे; पण जितके पश्तून तालिबान जिद्दीने लढणारे व कू्रर आहेत, तितक्या कडव्या प्रादेशिक व वांशिक अस्मिता अन्य समाज गटांच्या नसल्याने पाकचे पंजाबी वर्चस्व आजवर खपून गेले. आता प्रथमच पश्तून तालिबान व अन्य पाक प्रांतातील स्थानिक अस्मितांचा सहयोग उभा राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

सिंधी, बलुची व काश्मिरी आणि शिया बंडखोरीला टीटीपीची लढाऊ साथ मिळाली, तर पाकिस्तानच्या अस्तित्वालाच नवे आव्हान उभे राहील. त्याच्या नुसत्या कल्पनेनेच पाक सेनेला व राज्यकर्त्यांना घाम फुटलेला आहे. कारण, ते टीटीपी इतकेच मर्यादित आव्हान नाही, तर आजवर भारताशी वा अफगाण मुस्लिमांच्या भावनांशी पाकने जो राजकीय हिंसाचारी खेळ केला, त्याची चव खुद्द पाक राज्यकर्त्यांना व सेनेला प्रथमच चाखावी लागणार आहे. तालिबान नावाचे ‘भूत’ जन्माला घालून जो खेळ पाकने आपल्या वर्चस्वासाठी आरंभला होता, त्याच भूताने टीटीपी नावाच्या नव्या ‘भूता’ला जन्माला घातलेले असून आता त्याचे पालनपोषण अफगाण तालिबान करणार, ही कल्पना पाकला सतावत आहे.

Back to top button