मिशन मुंबई महापालिका

मिशन मुंबई महापालिका
Published on
Updated on

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्या मुंबई दौर्‍याने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा समोरासमोर उभे ठाकले आहेत. 2017 च्या महापालिका निवडणुकीवेळी भाजप आणि शिवसेना महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये एकत्र होते, तरीही त्यांनी महापालिकेची निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढवली. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. 2019 ची विधानसभा निवडणूक एकत्र लढवल्यानंतर भाजपला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडीचा प्रयोग केला. त्यामुळे सुमारे तीन दशके युतीमध्ये एकत्र राहिलेल्या दोन पक्षांमध्ये कमालीचे वितुष्ट निर्माण झाले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर ते टोकाला पोहोचले आणि परस्परांना मातीत गाडण्याची, अस्मान दाखवण्याची भाषा केली जाऊ लागली. गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौर्‍याच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्याची झलक पाहावयास मिळाली.

शिवसेनेने महाराष्ट्राची सत्ता मिळवली किंवा अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये किती यश मिळवले हे महत्त्वाचे असले तरी या कुठल्याही सत्तेपेक्षा मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेनेसाठी सर्वाधिक महत्त्वाची राहिली. शिवसेनेचे प्राण मुंबई महापालिकेमध्ये आहेत, असेही म्हटले जाते. 2017च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मारलेल्या मुसंडीमुळे शिवसेनेचे प्राण कंठाशी आले, परंतु थोडक्या फरकाने सत्ता राखण्यात शिवसेनेला यश आले. आताची निवडणूक शिवसेनेसाठी प्रचंड आव्हानात्मक आहे. कारण राज्याच्या सत्तेतून शिवसेनेला पायउतार व्हावे लागले. एवढेच नव्हे, तर शिवसेनेमध्ये स्थापनेपासूनची सर्वात मोठी फूट पडली असून अनेक आमदार, खासदारांनी पक्षाला 'जय महाराष्ट्र' केला, त्यात मुंबईतील अनेकांचा समावेश आहे. शिवसेनेच्या अनेक नगरसेवकांनीही एकनाथ शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेची ताकद खच्ची झाली असताना दुसरीकडे भाजपची ताकद सत्तेच्या अंगाने आणि जनाधाराच्या अंगानेही वाढली. शिवाय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना त्यांच्यासोबत आहे. अशा दुहेरी आव्हानाचा सामना शिवसेनेला महापालिका निवडणुकांमध्ये करावा लागणार आहे. गृहमंत्री शहा यांनी गणेशोत्सवातील दर्शनाच्या निमित्ताने मुंबईचा दौरा करून भाजपच्या नेते-कार्यकर्त्यांना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी कानमंत्र दिला असून भाजपच्या गोटामध्ये चैतन्य आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने भाजपने आधीच मुंबईभर पोस्टरबाजी करून आपले इरादे स्पष्ट केले आहेत. शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या 'व्होट बँके'ला धक्‍का देण्याबरोबरच मराठी माणसांनाही आपलेसे करण्याची रणनीती भाजपने आखलेली दिसते. स्थानिक पातळीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरू असतानाच त्याला राज्य सरकार तसेच केंद्राच्या पातळीवरील पाठबळ मिळवून प्रचंड शक्‍तिप्रदर्शन करण्यात येत आहे. शिवसेनेचे करता येईल तेवढ्या खच्चीकरणाचा निर्धारही करण्यात येत आहे. शहा यांच्या दौर्‍यातून तोच थेट संदेश देण्यात आल्याने राजकीय हवा तापणे साहजिक आहे.

भाजपसोबतची युती तोडून शिवसेनेने महाविकास आघाडीचा प्रयोग केला, त्यानंतरच्या अनेक प्रश्‍नांबाबत लोकांच्या मनात संभ्रम होता. महाविकास आघाडी सरकार विश्‍वासघाताने बनलेले सरकार असल्याची टीका भाजपच्या वतीने करण्यात येत होती. तर अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचे आश्‍वासन शिवसेनेने न पाळल्यामुळे युती तोडावी लागल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत होते. युतीच्या चर्चेत असलेल्या अमित शहा यांनी मात्र त्यासंदर्भात तपशीलवार बोलणे टाळले होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवरील मुंबई दौर्‍याच्या निमित्ताने त्यासंदर्भातही त्यांनी सविस्तर वक्‍तव्य केले. उद्धव ठाकरे यांनी आपल्याला धोका दिला असून त्यांना धडा शिकवलाच पाहिजे. एक वेळ अन्याय सहन करा, परंतु कोणी धोका दिला तर सहन करू नका, असे सांगून शहा यांनी पक्षाची राजकीय दिशा स्पष्ट केली. मी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाबाबत कुठलेच वचन दिले नव्हते. आम्ही राजकीय चर्चा उघडपणे करतो. बंद खोलीत नाही, असे सांगून त्यांनी मुंबई महापालिकेसाठी 'मिशन 150'ची घोषणा केली. नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुंबई महानगरपालिकेत दीडशे जागा जिंकेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

शिवसेनेत पडलेल्या फुटीसंदर्भात भाष्य करताना, उद्धव ठाकरे यांच्या लोभामुळेच शिवसेना फुटली आणि त्यांचे मुख्यमंत्रिपद गेल्याचे शहा म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी फक्‍त भाजपलाच धोका दिलेला नाही तर त्यांनी महाराष्ट्राच्या विचारधारेला आणि महाराष्ट्राच्या जनमतालाही धोका दिल्याचा घणाघातही त्यांनी केला. शहा यांच्या वक्‍तव्यांचा एकूण सूर पाहता शिवसेनेचा पराभव करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी त्यांनी ठेवलेली दिसते. केंद्रात सत्ता असताना आणि अनेक राज्यांमध्ये सत्ता मिळवली असताना महाराष्ट्राच्या सत्तेतून भाजपला अपमानास्पदरीत्या बाहेर ठेवल्याची सल त्यांनी पहिल्यांदाच व्यक्‍त केली. मुंबई महापालिकेतील शिवसेनेची सत्ता हिसकावून घेतली तर शिवसेनेचा राज्य पातळीवरही वेगाने र्‍हास होऊ शकेल, अशी भाजपची धारणा दिसते आणि त्यात तथ्यही आहे. अशा आव्हानाला शिवसेना कशी सामोरी जाते, हेही पाहणे नजीकच्या काळात औत्सुक्याचे ठरणार आहे.

मनसे भाजपबरोबर जाणार की शिंदे गटासोबत, हेही लवकरच स्पष्ट होईल. सध्याचे राजकीय चित्र पाहता महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होऊ शकते. काँग्रेस मात्र या आघाडीत असण्याची शक्यता कमी. कारण कमी-जास्त प्रमाणात का असेना, पण काँग्रेसची मुंबईत सर्वत्र ताकद आहे. काँग्रेसला मानणारा मतदारही सगळीकडे आहे. आघाडी केली तर अनेक ठिकाणी काँग्रेसचा पारंपरिक मतदार शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाठवून दिल्यासारखे होईल. त्यामुळे मुंबईतील आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आणि असलेला पाया मजबूत करण्यासाठी काँग्रेस स्वबळावर लढेल. त्याचा फायदा अर्थात भाजपला होणार असला तरी काँग्रेस आघाडीसाठी स्वतःचे नुकसान करून घेणार नाही तर राष्ट्रवादीसोबत आघाडी करताना शिवसेनेसमोरही मोठे आव्हान असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news