पंजाब : कॅप्टन विरुद्ध क्रिकेटपटू | पुढारी

पंजाब : कॅप्टन विरुद्ध क्रिकेटपटू

सचिन बनछोडे

पंजाब, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांत काँग्रेसची सरकारे आहेत. या तिन्ही राज्यांत सध्या अंतर्गत सुंदोपसुंदी आणि नेत्यांच्या बंडाळीने पक्षाला ग्रासले आहे. पंजाबमध्ये मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील संघर्ष अजूनही न शमल्याने काँग्रेसची पंचाईत झाली आहे.

पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणार्‍या सात राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीला बहुतांश राजकीय पक्ष लागले असले, तरी काँग्रेस पक्षात मात्र सध्या वेगळीच परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. पंजाबमध्ये निवडणुका तोंडावर आल्या असताना मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील संघर्ष अजूनही शमलेला नाही. पूर्वाश्रमीचे क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू हे राजकारणातले बडे आसामी बनले आहेत. माजी लष्करी अधिकारी असलेल्या मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या विरोधात सिद्धू यांनी अल्प काळात मोठे आव्हान उभे केले आहे.

2019 मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या ऐन आधी सिद्धू यांनी भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांतच ते काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यंत पोहोचले. त्यांचे पुढचे लक्ष्य अर्थातच मुख्यमंत्रिपदाचे आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना थेट आव्हान देण्यामागे हे खरे कारण आहे. पंजाबमधील कॅप्टन आणि क्रिकेटपटूच्या या लढाईमुळे दिल्लीत बसलेल्या काँग्रेस नेतृत्वाची मात्र मोठीच पंचाईत झाली आहे. दोघांमधला वाद मिटावा, यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह राहुल आणि प्रियांका गांधी यांनी आतापर्यंत असंख्य बैठका घेतल्या आहेत. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना समजून घ्यावे, असे निर्देशही नेतृत्वाकडून देण्यात आले आहेत; पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. केंद्रीय नेतृत्वाने समन्वयाच्या द‍ृष्टीने पंधरवड्यापूर्वीच दहा सदस्यीय समिती नेमली होती; मात्र काही दिवसांतच दोन्ही गटांकडून वादाला पुन्हा सुरुवात झाली आहे.

सिद्धू-सिंग यांच्यातला वाद चव्हाट्यावर पोहोचलेला असताना सिद्धू यांचे सल्लागार मालविंदर सिंग माली यांच्या वादग्रस्त विधानांनी एकच खळबळ उडाली होती. माली यांनी माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्यासंदर्भातील आक्षेपार्ह छायाचित्र ट्विट केल्यानंतर, तर काँग्रेसमध्ये मोठीच राळ उडाली होती. काँग्रेस पक्षाला अशा लोकांची गरज आहे का, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनिष तिवारी यांनी आपली भूमिका मांडली होती. पक्षाने चार-चार कार्यकारी अध्यक्ष नेमलेले असताना सिद्धू यांना सल्लागारांची गरज आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.

सल्लागाराच्या कर्तृत्वामुळे सिद्धू गोत्यात येऊ शकताहेत, असे वाटत होते; मात्र आक्रमक क्रिकेटपटूप्रमाणे आपण आक्रमक राजकारणी देखील आहोत, हे सिद्धू यांनी दाखवून दिले. शेवटी काँग्रेस नेतृत्वाने सल्लागारांना निलंबित करण्याची धमकी दिली तेव्हा कुठे मालविंदर माली यांनी सल्लागारपदाचा राजीनामा दिला होता. सिद्धू गटाच्या चार मंत्री आणि दोन डझन आमदारांनी कॅ. अमरिंदर सिंग यांच्या विरोधात लॉबिंग सुरू केले होते. दुसरीकडे अमरिंदर सिंग यांनी संबंधित मंत्री आणि आमदारांच्या नाड्या आवळण्यास सुरुवात केली. या सार्‍या घडामोडींचे पडसाद आगामी विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावेळी उमटल्यास आश्‍चर्य वाटू नये.

मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालीच विधानसभा निवडणुका लढविल्या जाणार असल्याचे काँग्रेस नेतृत्वाने स्पष्ट केले आहे. यामुळे तिकीट वाटपात सिंग यांचा वरचष्मा राहिला, तर सिद्धू गटाला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिद्धू अशावेळी कोणती भूमिका घेतात, ते पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सध्या सुरू असलेली बंडाळी आताच शांत झाली नाही, तर काँग्रेसचे दोन्ही गट एकमेकांना धाराशायी करण्यासाठी पुढे-मागे पाहणार नाहीत. याचा आपसूक फायदा विधानसभा निवडणुकीत शिरोमणी अकाली दल आणि आम आदमी पक्ष यांना होऊ शकतो.

वास्तविक गेल्यावेळच्या म्हणजे 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाट असूनही पंजाबमध्ये काँग्रेसने आपला झेंडा फडकविला होता. यामागे कॅप्टन अमरिंदर सिंग यांची मेहनत कारणीभूत होती, हे राजकीय जाणकारदेखील मान्य करतात. तथापि, अमरिंदर सिंग यांना पर्याय निर्माण केला आहे का, अशी शंका येण्याजोग्या घडामोडी पंजाब काँग्रेसमध्ये सुरू आहेत. अमरिंदर सिंग हे राजकारणातले धुरंदर आहेत. त्या तुलनेत सिद्धू नवखे आहेत, तरी पण विद्यमान परिस्थितीत काँग्रेस नेतृत्वाने सावध होऊन पंजाब काँग्रेसमधली बंडाळी मोडून काढणे, ही काळाची गरज बनली आहे.

छत्तीसगडमध्येही सुंदोपसुंदी

पंजाबप्रमाणे छत्तीसगड राज्यातही काँग्रेस पक्षात मोठी सुंदोपसुंदी माजली आहे. पंजाब काँग्रेसमधील सिंग-सिद्धू गटांचे जसे दिल्ली दौरे सुरू आहेत, तसेच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि आरोग्यमंत्री टी. एस. सिंगदेव यांच्या गटांचेही दिल्ली दौरे सुरू आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी आपणच योग्य आहोत, हे पटवून देण्यासाठी या दोन्ही गटांत काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वासमोर अहमहमिका लागली आहे. संघात खेळणार्‍या खेळाडूला कॅप्टन का व्हावेसे वाटणार नाही, अशी गुगली टाकत सिंगदेव यांनी बघेल यांना थेट आव्हान दिले आहे.

गेल्या वर्ष-दीड वर्षापासून बघेल आणि सिंगदेव यांच्यातून विस्तवही जात नाही, अशी परिस्थिती आहे. गेल्या काही दिवसांत काँग्रेसने दुसर्‍यांदा बघेल यांना दिल्लीला पाचारण केले होते. बघेल दिल्लीत पोहोचत नाहीत तोच, सिंगदेव गटाचा लवाजमाही दिल्लीत येऊन पोहोचला. सिंगदेव हे राज्याचे आरोग्यमंत्री असून मुख्यमंत्रिपदावर त्यांनी थेट दावा ठोकला आहे. येत्या काही दिवसांत दिल्लीत दोन्ही गटांचे शक्‍तिप्रदर्शन होण्याची शक्यता दिसून येत आहे. बघेल यांना अडीच वर्षे आणि आपणास अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद दिले जाईल, असे आश्‍वासन पक्षनेतृत्वाकडून देण्यात आले होते, असा दावा सिंगदेव करीत आहेत. मुख्यमंत्रिपद देण्यात आले नाही, तर पक्षाचा राजीनामा देऊ, अशी धमकीही त्यांनी याआधीच पक्षनेतृत्वाला दिली आहे. धमकीच्या या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या डोकेदुखीत आणखीच भर पडली आहे, हे निश्‍चित!

Back to top button