Krishna Janmashtami : भागवतातील श्रीकृष्ण जन्मोत्सव | पुढारी

Krishna Janmashtami : भागवतातील श्रीकृष्ण जन्मोत्सव

सचिन बनछोडे

भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेत म्हटले आहे की, ‘जन्म कर्म च मे दिव्यमेवं…!’ भगवंतांचा अवतार व लीला या दिव्य आहेत. त्याचे आद्य व सुंदर वर्णन महर्षी व्यासांच्या श्रीमद्भागवत महापुराणात आहे. त्यामधील श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे वर्णन अतिशय बहारदार आहे. जन्माष्टमीनिमित्त…

हजारो वर्षांपूर्वी मानवी तर्क, रूढी व परंपरा अशा सर्वांनाच छेद देत सर्वार्थाने अलौकिक लीला दर्शवणार्‍या भगवान श्रीकृष्णाचे जीवनचरित्र त्यांचे समकालीन असलेल्या महर्षी व्यासांनी श्रीमद्भागवत महापुराणाच्या दहाव्या स्कंधात लिहून ठेवले आहे. सर्वसाधारणपणे हेच श्रीकृष्णाचे मूळ व अधिकृत चरित्र मानले जाते. या अतिव सुंदर पुराणामधील श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा पाचवा अध्यायही अतिशय सुंदर आहे.

तक्षक नागाच्या दंशाने आठ दिवसांनी आपला मृत्यू होणार आहे, हे समजल्यावर प्रायोपवेशन करीत गंगातीरावर बसलेल्या अभिमन्यूपुत्र परिक्षित राजाला व्यासपुत्र व महान ज्ञानी शुक यांनी हे पुराण सर्वप्रथम सांगितले. या पुराणाचे एकूण बारा स्कंध आहेत. त्यामध्ये दहाव्या स्कंधात श्रीकृष्णचरित्र येते. अकराव्या स्कंधात भगवान श्रीकृष्णांनी उद्धवाला जो सुंदर उपदेश केला, त्याचे सविस्तर वर्णन आहे, तसेच ऋषींचा शाप, यादवी आणि श्रीकृष्णनिर्याणाचेही वर्णन आहे.दहाव्या स्कंधातील तिसर्‍या अध्यायात श्रीकृष्णजन्माचे वर्णन आहे. श्रीशुकांनी परिक्षिताला सांगितले की, ज्यावेळी सर्व गुणांनी युक्‍त अशी सर्वोत्तम वेळ आली, तेव्हा रोहिणी नक्षत्र असताना, सर्व ग्रह, तारे, नक्षत्रे शुभ असताना भगवान श्रीकृष्णांचे प्राकट्य झाले. भागवतात म्हटले आहे की, भगवान श्रीकृष्ण आधी चतुर्भुज व सर्व आयुधे धारण करून प्रकट झाले. त्यांचे तसेच रूप वासुदेव व देवकीने पाहिले. हा साक्षात भगवंतच आहे, हे जाणून दोघांनीही त्यांची स्तुती केली. त्यानंतर भगवंतांनी सामान्य बालकाचे रूप धारण केले व भगवंताच्या प्रेरणेने वासुदेवांनी बाळकृष्णाला तेथून गोकुळात नंदाघरी नेले.

दहाव्या स्कंधाच्या पूर्वार्धातील पाचव्या अध्यायात श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे मनोहारी वर्णन आहे. श्रीशुकाचार्यांनी परिक्षिताला सांगितले, उदार अशा नंदमहाराजांना आपल्याला पुत्र झाला आहे, हे कळताच अतिशय आनंद झाला. त्यांनी सुशोभित अशा दोन लाख गायी दान केल्या. रत्ने आणि सुंदर वस्त्रांनी झाकलेले तिळांचे सात ढीग दान दिले. लक्ष्मीपती भगवंताच्या प्राकट्यापूर्वीच लक्ष्मीने पतीच्या लीलास्थळाला संपन्‍न केले होते. व्यासांनी म्हटले आहे की, श्रीकृष्णाचा मोठाच जन्मोत्सव गोकुळात साजरा झाला. स्तुतीपाठक स्तुती करू लागले, भेरी आणि दुंदुभी वारंवार वाजू लागल्या. गोकुळातील सर्व घरांची दारे, अंगणे आणि अंतर्भाग झाडून स्वच्छ करण्यात आले. घरे रंगीबेरंगी ध्वज, पताका, फुलांच्या माळा, रंगीबेरंगी वस्त्रे आणि झाडांच्या पानांच्या तोरणांनी सजविली गेली. गाई, बैल आणि वासरांच्या अंगांना हळद-तेलाचा लेप देण्यात आला व त्यांना गेरुने रंगवण्यात आले. त्यांना मोरपंख, फुलांचे हार, सुंदर वस्त्रे आणि सोन्याच्या साखळ्यांनी सजविले गेले. सर्व गोप बहुमूल्य वस्त्रे, अलंकार, अंगरखे, पगड्यांनी नटून-थटून हातात नजराणे घेऊन नंदाघरी आले. गोपीही सुंदर वस्त्रे, अलंकार आणि डोळ्यांमध्ये काजळ घालून, विविध भेटवस्तू घेऊन लगबगीने नंदाघरी निघाल्या. ‘बाळाचे भगवंत दीर्घकाळ रक्षण करो’ असे म्हणून हळद-तेलमिश्रित पाणी त्या आजूबाजूच्या लोकांवर शिंपडीत उच्चस्वरात गीत गात निघाल्या होत्या. त्यांनी वेणीत गुंफलेली फुले वाटेत गळून पडत होती, त्याचेही त्यांना भान नव्हते. गोकुळात निरनिराळी मंगलवाद्ये वाजत होती. आनंदाने बेहोश होऊन गोपगण एकमेकांवर दही, दूध, तूप आणि पाणी उडवू लागले. एकमेकांच्या तोंडाला लोणी माखू लागले आणि एकमेकांवर लोणी फेकून आनंदोत्सव साजरा करू लागले. नंदमहाराजांनीही गोपांना पुष्कळ वस्त्रे, अलंकार आणि गायी दिल्या. सूत, मागध, बंदीजन तसेच नृत्य, वाद्य इत्यादी कलांवर उदरनिर्वाह करणार्‍या लोकांना त्यांनी मागितलेल्या वस्तू देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला.

आजही भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव जगभर थाटामाटात आणि उत्साहात साजरा होतो; मात्र भागवतातील जन्मोत्सवाच्या वर्णनाने तत्कालीन स्थितीचे ज्ञान व भक्‍तिरसाची प्राप्ती होते

Back to top button