पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी | पुढारी

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य सर्व समाजाच्या विकासाला प्रेरक आणि अनुकरणीय होते आणि आहे. उत्कृष्ट शासक आणि द्रष्टे नेतृत्व यामुळे त्यांनी घालून दिलेले आदर्श आजही समाजविकासासाठी पूरक ठरतात. आज त्यांची पुण्यतिथी. त्यानिमित्त…

कुशल, शूर शासक आणि माळवा प्रांताची राणी अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात जामखेड जिल्ह्यातील चौडी या गावात झाला. चौडी गावचे पाटील माणकोजीराव शिंदे आणि सुशीलाबाई यांची ही कन्या. वडील माणकोजीराव महिलांच्या शिक्षणाच्या बाजूने होते. त्यावेळी महिलांना घराबाहेर जाण्याची परवानगी नव्हती. लौकिक अर्थाने अहिल्यादेवी कोणत्याही शाळेत गेल्या नव्हत्या. मात्र, माणकोजीराव यांनी त्यांना घरातच शिक्षण दिले.

पुण्याला निघालेले सरदार मल्हारराव होळकर विश्रांतीसाठी चौंडी गावात थांबले. त्यावेळी त्यांची नजर त्यावेळी भुकेल्यांना आणि गरिबांना भोजन देत असलेल्या छोट्या मुलीवर पडली. तिच्यातील साहस, चातुर्य, धिटाई पाहून ते प्रभावित झाले. त्यांची माणकोजीराव यांच्याकडे आपला मुलगा खंडेराव होळकर यांच्याशी अहिल्यादेवींच्या लग्‍नाचा प्रस्ताव दिला. 1733 साली हा विवाह झाला आणि त्या होळकर घराण्याच्या महाराणी झाल्या. 1745 साली या दाम्पत्यास मालेराव हे पुत्ररत्न झाले. तीन वर्षांनी 1748 मध्ये मुक्‍ताबाई हिला जन्म दिला.

अहिल्यादेवी पतीला प्रशासनात मदत करायच्या. सासरे मल्हारराव होळकर यांनी अहिल्यादेवींना सातत्याने प्रोत्साहन दिले. त्यातून त्यांचे व्यक्‍तिमत्त्व घडत गेले. पुढे त्यांनी राज्यावर मांड बसविली. पती खंडेराव यांच्या 1754 मध्ये झालेल्या निधनामुळे अहिल्यादेवींनी सती जाण्याचा विचार केला होता,

पण मल्हारराव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहिले. यामुळे मन परिवर्तन होऊन अहिल्यादेवी राज्य कारभारासाठी पुन्हा सज्ज झाल्या, पण 1767 मध्ये सासरे मल्हारराव आणि त्याच वर्षी पुत्र मालेराव यांचा मृत्यू झाला. पती, सासरा आणि मुलगा गमावल्यानंतर अहिल्यादेवी एकट्या पडल्या. स्त्री आहे, दुबळी आहे असे समजून अनेक जण त्यांच्याविरोधात गेले. चंद्रावतने त्यांच्याशी संघर्ष सुरू केला. अहिल्यादेवींनी धीराने चंद्रावतचा बंदोबस्त केला. न्याय व राज्यव्यवस्थेसाठी त्यांचा विशेष लौकिक होता. योग्य-अयोग्याचा विचार करून दरबारात येणार्‍यास योग्य न्याय देण्यात त्या माहीर होत्या. अंतर्गत राज्य कारभारात त्यांनी अनेक बदल करून आपले सैन्यदल सक्षम केले. रामपूरच्या बंडातही त्यांनी अतिशय चोख भूमिका बजावली. अनेक लढायांमध्ये रणांगणावर त्यांचा पुढाकार असे. अहिल्यादेवींनी भारतातील अनेक तीर्थक्षेत्रांवर मंदिरे बांधली. अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. काशी, गया, सोमनाथ, अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, बद्रिकेदार, रामेश्‍वर व जगन्‍नाथपुरी अशा मंदिराच्या कामात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. अनेक मार्गांची बांधणी केली. छोटे-मोठे अनेक रस्ते, विहिरी व घाट बांधले. राज्यात अन्‍नछत्रे उघडली. विधवांना सन्मान, दत्तक योजनांना प्रोत्साहन दिले.

इंदूरशेजारी महेश्‍वरी ही त्यांची राजधानी जणू काव्य, संगीत, कला व उद्योग यांची जननी होती. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत, शाहीर अनंत फंदी यांना व संस्कृत विद्वान खुशालीराम यांना अहिल्यादेवींनी दरबारी आश्रय दिला. कारागीर, मूर्तिकार व कलाकरांना त्यांच्या राजधानीत विशेष सन्मान आणि वेतन मिळत होते. महेश्‍वर शहरात त्यांनी सूतगिरणी सुरू करून वस्त्रोद्योगाला चालना दिली. त्यांनी इंदूर अतिशय सुलभ, सुंदर शहर आणि तीर्थक्षेत्र बनवले. अहिल्यादेवींनी संपूर्ण भारतात शेकडो मंदिरे आणि धर्मशाळा बांधल्या. त्यांनी खजिना लोकांच्या हितासाठी खर्ची घातला. यातून एक वैभवशाली नवे राज्य उभे राहिले. कुशल, द्रष्टा राज्यकर्ता कसा असावा, यासाठी अहिल्यादेवी होळकर हे उत्तम उदाहरण मानले जाते. 13 ऑगस्ट 1795 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आणि द्रष्टेपण आजच्या परिस्थितीतही आदर्श आणि अनुकरणीय आहे, त्यांच्या स्मृतीस अभिवादन!

– रावसाहेब पुजारी 

Back to top button