आपत्तीपूर्व व्यवस्थापन गरजेचे | पुढारी

आपत्तीपूर्व व्यवस्थापन गरजेचे

देशभरात यंदा अनेक ठिकाणी ढगफुटीच्या, कमी काळात अधिक पर्जन्यवृष्टीच्या घटना घडल्या असून त्यामध्ये मोठी हानी झाली. वारंवार होणार्‍या ढगफुटीचा धोका कमी करण्याचे प्रमुख उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जोखीम कमी करणे आणि मदतीच्या उपाययोजना विकसित करणे, धोरणे, नियोजन आणि सराव हा त्याचा एक भाग बनविणे आवश्यक आहे.

ढगफुटीची वारंवारिता आणि तीव्रता वाढण्यामागे हवामानातील बदल हे प्रमुख कारण आहे. ढगफुटीच्या बहुतांश घटना डोंगराळ भागात घडत असल्या तरी त्या पठारी प्रदेशातही घडल्या आहेत. 2013 मध्ये केदारनाथ परिसरात ढगफुटीमुळे कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. काही दिवसांपूर्वी अमरनाथ गुहेजवळ झालेल्या ढगफुटीमुळे मालमत्तेचे आणि जमिनीचेही मोठे नुकसान झाले. जुलै 2005 मध्ये मुंबईतील ढगफुटीमुळे शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते, शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता आणि पायाभूत संरचनांचे मोठे नुकसान झाले होते.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मते, जेव्हा एखाद्या लहानशा भागात पाऊस कोसळण्याचे प्रमाण ताशी 10 सेंटिमीटर असते तेव्हा त्याला ढगफुटी म्हणतात. तथापि, ढगफुटीच्या बाबतीत, व्यवस्थापन, मदत आणि जोखीम कमी करण्याच्या द‍ृष्टीने 10 सेंटिमीटर प्रतितास या प्रमाणापेक्षाही कमी तीव्रतेच्या पावसाला ढगफुटी अशी संज्ञा देता येऊ शकते. ढगफुटीची वारंवारिता धोकादायक प्रमाणात गृहित धरलेली असल्याने त्यांचे धोरणात्मक व्यवस्थापन सुधारणे आवश्यक आहे. आजअखेर, मुख्य भर घटनेनंतरचे बचावकार्य, स्थलांतर आणि मदतीच्या उपाययोजना यावर दिला आहे वस्तुतः आपत्ती व्यवस्थापन संहितेनुसार तयारी, प्रतिसाद, पुनर्उभारणी आणि मदत या क्रमाने व्हायला हवे. घटनेच्या आधी सुरुवातीच्या संकेतांचा अंदाज घेऊन इशारा, मदत आणि जोखीम कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यावर भर असायला हवा. आपत्तीनंतर मूल्यमापन अभ्यासातून असे दिसून येते की, आपत्तीपूर्व उपाय सुरक्षित, आर्थिकद‍ृष्ट्या व्यवहार्य आणि फायदेशीर असतात. ज्या ठिकाणी ढगफुटीची शक्यता सर्वाधिक आहे, त्या ठिकाणांची ओळख पटवून आणि जोखमीचे आराखडे तयार करून त्या ठिकाणी व्यवस्थापनाचे काम सुरू केले जाऊ शकते.

रियल टाईम क्लाऊडबर्स्ट अलर्ट जारी करण्याची प्रणाली विकसित करणे आवश्यक आहे. डॉपलर रडार अनपेक्षित हवामान बदलांचा अंदाज 3 ते 6 तास अगोदर देऊ शकते. हे रडार ढगफुटीच्या अलर्टसाठी उपयुक्‍त ठरू शकते. पश्‍चिम आणि पूर्व हिमालय पर्वतरांगांव्यतिरिक्‍त ही यंत्रणा मैदानी प्रदेशातही काही ठिकाणी प्रस्थापित केली आहे. अशा रडारची संख्या सध्या 33 आहे. अतिवृष्टी किंवा हिमवृष्टीशी संबंधित मल्टिपल डिझास्टर अलर्ट सिस्टीमच्या वाढत्या वापरामुळे त्यांची आधीच सूचना मिळते. किमान दोन दिवस आधी मुसळधार पाऊस आणि ढगफुटीचा अंदाज वर्तविण्यासाठी आणि मानव, पशुधन तसेच मौल्यवान वस्तू वेळेत अन्यत्र हलविण्यासाठी केंद्रीय भूविज्ञान विभागाला रडारची संख्या 90 वर नेऊन त्यांची श्रेणीही सुधारायची आहे. त्यासाठी प्रत्येक वर्षी तयारी करणे ही योग्य दिशेने सुरुवात ठरेल. त्यामुळे पशुधनाचे नुकसानही कमीत कमी होईल. हे पाऊल पुढील ढगफुटीचा धोका कमी करण्यासाठी निम्मे काम करू शकेल.

दरीतील पशुधन आणि मनुष्यबळ सुरक्षित उंचीवर हलवणे, पायाभूत सुविधा, घरे आणि व्यावसायिक इमारतींचे बांधकाम नदीच्या पलीकडे आणि पूररेषेच्या वरच्या भागात करणे, पाऊस आणि पुराच्या पाण्याची वहनव्यवस्था चांगली करणे हे व्यवस्थापनाच्या द‍ृष्टीने उत्तम उपाय ठरू शकतात आणि त्यामुळे नुकसान कमी करता येऊ शकेल. उंचावरून उताराकडे वाहून येणार्‍या प्रवाहाचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे आणि त्यामुळे पर्वतीय भूप्रदेशाचे स्थिरीकरण होऊल आणि भूस्खलन, अचानक येणारी लाट, गाळाचा प्रवाह आदी बाबी टाळणे शक्य होईल. ज्या ठिकाणी आपत्ती निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे, अशा ठिकाणी हे धोरणात्मक उपाय प्रथम अमलात आणले पाहिजेत. तसेच मैदानी भागातही पावसाच्या पाण्याचा प्रवाह अविरत राहण्यासाठी उपाययोजना केल्यास ढगफुटीमुळे होणारे मानवी जीव, प्राणी आणि पायाभूत संरचनेचे बहुतांश नुकसान आपण टाळू शकतो. पंचायती राज संस्था, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे, स्वयंसेवी संस्था आणि समुदाय यांची संसाधने एकत्रित आणून अचानक येणारे पूर आणि ढगफुटीनंतरच्या मदत व्यवस्थापनात सातत्याने सुधारणा केली जाऊ शकते आणि यंत्रणा बळकट केली जाऊ शकते. अतिवृष्टी आणि ढगफुटीनंतर उद्भवणार्‍या संसर्गजन्य आजारांना तोंड देणेही तितकेच आवश्यक आहे.

आपत्तीपूर्व तयारीनंतरही ढगफुटी झाली तरी प्रतिसाद आणि बचावकार्याची गरज असते. कोणत्याही आपत्तीचा सामना करताना केंद्र सरकार आणि राज्यांचे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि भारतीय सशस्त्र दले ही जगातील सर्वोत्तम आपत्ती-प्रतिसाद यंत्रणा मानली जाते. अडकलेल्या लोकांचा आणि पशूंचा आधुनिक उपकरणांच्या माध्यमातून घेणे आणि बुडत असलेल्या लोकांचा बचाव करणार्‍या प्रशिक्षित जलतरणपटूंसोबत ही पथके आपत्तीपूर्वी सूचना मिळाल्यानंतर आपत्ती येण्याच्या आधीच संबंधित ठिकाणी पोहोचून तेथील लोकांना वाचवतात. ज्या ठिकाणी आपत्ती निवारण निधीचे वाटप करणार्‍या यंत्रणेचे संगणकीकरण करणे बाकी आहे.

ढगफुटीचा धोका कमी करण्याचे प्रमुख उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जोखीम कमी करणे आणि मदतीच्या उपाययोजना विकसित करणे, धोरणे, नियोजन आणि सराव हा त्याचा एक भाग बनविणे आवश्यक आहे. ढगफुटीचा धोका पूर, भूस्खलन आणि चक्रीवादळाशी जोडून त्यांचे व्यवस्थापन कालबद्ध पद्धतीने नियोजन करून अमलात आणले पाहिजे. यासंदर्भात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांनी आपत्ती व्यवस्थापनात सर्वसमावेशक लवचिकता असलेली प्रणाली तयार केली पाहिजे आणि त्यायोगे भारत सरकारने दिलेल्या मदतीचा पूर्ण वापर केला पाहिजे.

– एस. पी. वासुदेवा
(लेखक राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे संचालक आहेत.)

Back to top button