घरोघरी तिरंगा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा जल्लोष देशभर सुरू झाला असताना आजपासून ‘घरोघरी तिरंगा’उपक्रम सुरू होत आहे. देशातील प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रध्वजाशी असलेले नाते घट्ट करताना देशभक्‍तीचा जागर केला जातो आहे. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाला देशभरात जो प्रतिसाद मिळत आहे, तो देशवासीयांच्या तिरंग्याबद्दलच्या उत्स्फूर्त प्रेमाचे दर्शन घडवणारा आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना 13 ते 15 ऑगस्टदरम्यान ‘घरोघरी तिरंगा’ फडकावूया. राष्ट्रध्वजासोबत असलेली आपली बांधिलकी या मोहिमेमुळे अधिक घट्ट होईल, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी या मोहिमेसंदर्भातील भावना व्यक्‍त केल्या. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्‍या स्वातंत्र्यवीरांप्रती कृतज्ञता म्हणून हा उपक्रम राबवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यापलीकडे तिरंगा झेंड्याच्या माध्यमातून जो संदेश दिला जातो, तोही आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचा आहे. तिरंगा झेंड्यातला सगळ्यांत वरचा केशरी रंग हा शौर्य आणि त्यागाचं प्रतीक आहे. मधला पांढरा रंग शांतता आणि सत्याचे प्रतीक, त्यावर असलेलं निळ्या रंगाचे धर्मचक्र गतीचे द्योतक आणि हिरवा रंग सुजलाम-सुफलाम संपन्‍नतेचे प्रतीक आहे. भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे जे वैशिष्ट्य आहे,

विविधतेतून एकता त्याचे प्रतिनिधित्व तिरंगा ध्वज करीत असल्यामुळे त्याचा आशयही आजच्या काळात खूप महत्त्वाचा. त्यामुळेच घरोघरी तिरंगा फडकावताना देशप्रेमाची भावना बळकट करण्याबरोबरच विविधतेतील एकता जपण्याची जाणीवही करून देणारा हा उपक्रम आहे. नव्या पिढीला तिरंग्याच्या इतिहासाची माहिती देण्याची संधीही यानिमित्ताने मिळत आहे. 1929 साली काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात ‘पूर्ण स्वराज’चा ठराव संमत झाला होता. सध्या अस्तित्वात असलेल्या तिरंगा झेंड्यात असलेली रंगांची रचना त्याचवेळी अस्तित्वात आली. काँग्रेस पक्षाने केशरी, पांढरा आणि हिरवे पट्टे असलेला आणि त्यावर मध्यभागी चरखा असलेला झेंडा एक ठराव संमत करून स्वीकारला. हाच काँग्रेस पक्षाचाही झेंडा होता. तोपर्यंत झेंड्यातील रंगांकडे विविध धर्मांचे आणि गटांचे प्रतीक म्हणून पाहिले जात होते, पण या ठरावाने या रंगांचा धर्मांशी असलेला अर्थ काढून टाकला. 1947 साली घटना समिती स्वतंत्र भारताच्या कारभारासाठीचा व्यापक आराखडा तयार करत असताना स्वतंत्र भारताचा झेंडा कसा असावा, हा प्रश्‍नही घटना समितीत चर्चेला आला. 1931 साली स्वीकृत झालेला झेंडा या समितीने फक्‍त एक बदल करून स्वीकारला.

चरख्याच्या जागी सारनाथच्या अशोकस्तंभावरील धर्मचक्राला स्थान देण्यात आले. 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज म्हणून तिरंग्याचा स्वीकार करण्यात आला. स्वातंत्र्याची मागणी करताना, ब्रिटिशांविरोधात आवाज उठवताना आणि प्रत्यक्षात 15 ऑगस्ट 1947 ला भारताच्या स्वातंत्र्याची ग्वाही देताना भारतीयांनी झेंडा अभिमानाने फडकवला. 26 जानेवारी 2002 रोजी भारताच्या ध्वजसंहितेत बदल करून सर्व नागरिकांना आपल्या घरांवर, कार्यालयांवर किंवा कारखान्यांवर वर्षाच्या कुठल्याही दिवशी झेंडा फडकवण्याची परवानगी देण्यात आली.
तिरंग्याचे भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी असलेले नाते लक्षात घेऊन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा मोहिमेच्या माध्यमातून तिरंग्याचा सन्मान वाढवण्यासाठीचे प्रयत्न प्रेरणादायी आहेत. एखाद्या मोहिमेची घोषणा झाल्यानंतर ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. आजच्या युगात लोकांच्या मनावर एखादी गोष्ट सतत बिंबवल्याशिवाय तिची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे मोहिमेच्या प्रचार-प्रसारासाठी केंद्र-राज्यांच्या सरकारी यंत्रणांबरोबरच सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घेतला आहे. ही संपूर्ण देशाची मोहीम आहे. राजकीय पक्ष परस्परांमधील मतभेद दूर सारून देशाच्या एकात्मतेसाठी, तिरंग्याच्या सन्मानासाठी एकत्र येत आहेत, सर्वपक्षीय लोक मोहीम यशस्वी करण्यासाठी झटताना दिसत आहेत. मध्यंतरी खासदारांनी दिल्लीत बाईक रॅली काढून तिरंगा मोहिमेबाबत जाणीवजागृती केली. सरकारचे अनेक विभाग मोहिमेच्या यशस्वीतेसाठी झटत आहेत. टपाल कार्यालयांतून तिरंगा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पंधरा ऑगस्टपर्यंत सुट्टीच्या दिवशीही टपाल कार्यालयात तिरंगा उपलब्ध होईल, याची व्यवस्था करण्यात आली. टपाल कार्यालय सर्व थरांतील नागरिकांना सोयीचे ठिकाण असल्यामुळे त्या माध्यमातून लाखो लोकांना तिरंगा उपलब्ध होताना दिसत आहे. अर्थात, ही मोहीम प्रभावीपणे राबवली जात असताना काही ठिकाणी ती चुकीच्या पद्धतीने राबवली गेल्याचे तसेच काही ठिकाणी सोयीचा अर्थ काढून अपप्रचार होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे मोहिमेवर टीकाही झाली; परंतु यंत्रणेतील काही लोकांच्या चुकांचा एवढ्या व्यापक मोहिमेला फटका बसू नये, याची काळजी सर्व संबंधित घटकांनी घेण्याची आवश्यकता आहे. देशाचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना हा काही सरकारी किंवा विशिष्ट घटकांनी साजरा करावयाचा वा सक्‍तीने साजरा करावयाचा उत्सव नाही. देशाच्या प्रत्येक नागरिकाला हा आपला उत्सव आहे, असे वाटायला हवे. ती भावना जागृत होते आहे. लोकसहभागातून हा उत्सव साजरा व्हायला हवा, याद‍ृष्टीनेही घरोघरी तिरंगा मोहीम महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

घरोघरी तिरंगा मोहिमेबरोबरच विविध उपक्रमांच्या माध्यमातून लोकसहभाग वाढवण्यात येत आहे. स्वातंत्र्यसंग्रामाशी संबंधित जी ठिकाणे आहेत, त्या ठिकाणी विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाबरोबरच राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीनेही विविध सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. आपला देश विशाल असल्यामुळे देशवासीयांना तिरंगा उपलब्ध करून देणे हेही मोठे आव्हान होते; परंतु त्यासाठी सरकारने विविध घटकांचे सहकार्य घेऊन तिरंग्यांची पूर्तता करण्याचे आव्हान समर्थपणे पेलल्याचे दिसून येत आहे. मनामनांत स्वातंत्र्याचे मूल्य जागवण्याची ही मोहीम म्हणजे संधी समजून त्यात हिरिरीने सहभागी होण्याचे कर्तव्य प्रत्येक नागरिकाने बजावले पाहिजेे.

Exit mobile version