चमकदार यश | पुढारी

चमकदार यश

भारतासारखा लोकसंख्येने जगातील दुसर्‍या क्रमांकाचा देश ऑलिम्पिकसारख्या क्रीडा स्पर्धेतील पदकयादीत तळाच्या दिशेला असतो, तेव्हा कुणाही भारतीयासाठी ते फारसे भूषणावह वाटत नसते. आकाराने आणि लोकसंख्येने छोटे असलेले देश भारताच्या बरेचसे वर दिसतात; परंतु अलीकडच्या काही वर्षांमध्ये ही परिस्थिती बदलू लागली असून ऑलिम्पिक, एशियाड किंवा राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी सातत्याने उंचावत आहे. बर्मिंगहॅममध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतून त्याची प्रचिती आली असून, 22 सुवर्णपदकांसह भारताने पदकयादीत चौथे स्थान पटकावलेे. भारताने एकूण 61 पदके पटकावली असून, त्यात 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्यपदकांचा समावेश आहे. स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात भारताने न्यूझीलंडला धक्का देऊन पाचव्या क्रमांकावर ढकलले आणि चौथ्या स्थानावर मजल मारली. यशाचे मूल्यमापन करताना आधीच्या कामगिरीशी तुलना होणे स्वाभाविक असते.

गेल्यावेळी ग्लासगो येथे झालेल्या स्पर्धेत भारताने 26 सुवर्णपदकांसह 66 पदके मिळवली होती. दिल्लीत 2010 साली झालेल्या स्पर्धेत आपण 38 सुवर्णपदकांसह एकूण 101 पदके मिळवून पदकयादीत दुसरा क्रमांक मिळवला होता. त्या तुलनेत यंदाचे यश कमी असले तरीही कामगिरी चमकदार असल्याचे म्हटले जाते, त्याची कारणेही लक्षात घ्यावयास हवीत. 2010 साली भारतात स्पर्धा झाल्यामुळे हवामानापासून स्थानिकांच्या पाठिंब्यापर्यंतच्या अनेक गोष्टी पोषक होत्या आणि तशा परिस्थितीत खेळाडूंनी यश मिळवले होते. यंदा राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजीचा समावेश नसल्यामुळे त्याचा भारताला मोठा फटका बसला. स्पर्धेच्या इतिहासावर नजर टाकली तर भारताला मिळालेल्या एकूण 203 सुवर्णपदकांपैकी 63 नेमबाजीने मिळवून दिली आहेत. 564 पदकांपैकी 135 पदके एकट्या नेमबाजीमध्ये मिळाली आहेत. भारताचे वर्चस्व असलेल्या खेळाचा स्पर्धेत समावेश नसल्यामुळे साहजिकच त्याचा फटका बसला आणि लौकिकाला साजेसे यश मिळाल्याचे दिसत नाही.

ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले व्यक्तिगत पदक मिळवून देणारा खेळ कुस्ती हाच होता आणि कोल्हापूरच्या खाशाबा जाधव यांनी कांस्यपदकाला गवसणी घातली होती. त्याच कुस्तीने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा झेंडा सातत्याने फडकवत ठेवला. राष्ट्रकुल स्पर्धेतही भारताकडून सर्वाधिक सुवर्णपदके मल्लांनीच पटकावली असून, कुस्तीमधील आपला दबदबा कायम ठेवला. मल्लांनी सहा सुवर्णपदकांसह एक रौप्य आणि पाच कांस्यपदकांची लयलूट केली. कुस्तीनंतर भारताला सर्वाधिक दुसर्‍या क्रमांकाची पदके वेटलिफ्टिंगमध्ये मिळाली. भारताच्या वेटलिफ्टिंगपटूंनी तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि चार कांस्यपदके मिळवून दमदार कामगिरीचे दर्शन घडवले. मीराबाई चानूने भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले आणि तो सिलसिला बाविसाव्या सुवर्णपदकापर्यंत पोहोचला. देशाने अ‍ॅथलेटिक्समध्ये आठ पदके मिळवली असून, त्यामध्ये एक सुवर्ण, चार रौप्य आणि तीन कांस्यपदकांचा समावेश आहे. त्याचबरोबर ज्यूदोमध्ये दोन रौप्य आणि एक कांस्यपदक प्राप्त केलेे. टेबल टेनिसमध्येही भारताचा आधीपासून दबदबा होताच, तो कायम टिकवताना यावेळी चार सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य अशी सात पदके मिळवली.

बॉक्सिंगमध्ये तीन सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य अशा एकूण सात पदकांची कमाई केली. लॉन बॉलने एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावून इतिहास निर्माण केला. शिवाय पॅरा ऑलिम्पिकमध्येही एक सुवर्णपदक पटकावले. एकेकाळी भारतीय हॉकीचा ऑलिम्पिकमध्येही दबदबा होता, नंतर तो कमी होत गेला; परंतु आपल्या या समृद्ध वारशाकडे भारतीय हॉकीची पुन्हा वाटचाल सुरू झाली आहे. राष्ट्रकुलमध्ये पुरुष संघाने मिळवलेले रौप्य आणि महिला संघाने मिळवलेले कांस्यपदक त्याचेच निदर्शक मानावे लागेल. महिला क्रिकेट संघानेही रौप्यपदक मिळवून आपली चमक दाखवली. या बाबींचा तपशीलवार उल्लेख करण्याचे कारण एवढेच की, कोणकोणत्या खेळांमध्ये आपले अस्तित्व आहे, हे लक्षात यावे. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू खेळतात तेव्हा देशाचे प्रतिनिधित्व करीत असतात. असे असले तरी स्पर्धा संपल्यानंतर राज्यांच्या कामगिरीचेही मूल्यमापन होत असते. भविष्यातील नियोजनाच्यादृष्टीने हे मूल्यमापन महत्त्वाचे ठरत असते. या स्पर्धेतही नेहमीप्रमाणे हरियाणाच्या खेळाडूंनी 23 पदकांसह आघाडी राखली.

महाराष्ट्राच्या खेळाडूंना पाच पदके मिळाली असून, आपल्याला विविध क्रीडा प्रकारांमध्ये सुधारणेसाठी भरपूर वाव असल्याचे यावरून लक्षात येऊ शकते. राज्यनिहाय पदकांचा विचार करताना हरियाणा 23, तेलंगणा 6, महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू प्रत्येकी 5, पश्चिम बंगाल 4, मणिपूर, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि दिल्ली प्रत्येकी 3, राजस्थान आणि गुजरात प्रत्येकी 2, तसेच चंदीगड आणि केरळ प्रत्येकी 1 अशी पदके प्राप्त केली. केवळ पदकांच्या संख्येवर गुणवत्तेचे मोजमाप करणे अनेकदा संबंधितांवर अन्यायकारक ठरत असते. सर्व सुविधा उपलब्ध असताना एखाद्याने मिळवलेले यश आणि अभावग्रस्त परिस्थितीवर मात करून एखाद्याने मिळवलेले यश याची तुलना योग्य नसते. अशावेळी खेळाडूंचे मूल्यमापन न करता त्या त्या ठिकाणची क्रीडासंस्कृती, खेळासाठी शासकीय पातळीवरून उपलब्ध करून दिल्या जाणार्‍या सुविधा, क्रीडा संघटनांकडून केले जाणारे प्रयत्न आदी बाबींचा विचार करावा लागतो.

प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवणार्‍या खेळाडूंना सुविधा मिळवून दिल्या, तर ते किती मजल मारू शकतील याचाही विचार करण्याची आवश्यकता असते. यंदा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील संकेत सरगर आणि अविनाश साबळे या खेळाडूंनी मिळवलेले यश लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या निमित्ताने अशा खेळाडूंच्या ज्या संघर्षाच्या कहाण्या समोर येतात, त्यातून आपल्या समाजाला आणि सरकारलाही खूप काही शिकण्यासारखे असते. दुर्दैवाने हे यश आपल्याकडे तात्पुरत्या गुणगौरवापुरते मर्यादित राहते. ते तसे न राहता त्यातून दीर्घकालीन उपाययोजना करून क्रीडा संस्कृतीच्या वाढीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न व्हायला हवेत.

Back to top button