आत्मविश्‍वासाची भरारी | पुढारी

आत्मविश्‍वासाची भरारी

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) अवकाशात प्रक्षेपित केलेल्या ‘आझादी सॅट’ नावाच्या सॅटेलाईटमुळे (कृत्रिम उपग्रह) अवकाशक्षेत्रात भारताचे एक नवे पाऊल पडले आहे. ‘एसएसएलव्ही’ डी वन रॉकेटने पृथ्वी पर्यवेक्षण उपग्रह ईओएस-02 आणि ‘आझादी सॅट’ लघू उपग्रह प्रक्षेपित केला. उपग्रह प्रक्षेपित झाला तरी ही मोहीम यशस्वी होऊ शकली नाही. उड्डाणाचे सगळे टप्पे अपेक्षेप्रमाणे पूर्ण झाल्याचे इस्रोच्या वतीने जाहीर करण्यात आले; पण अखेरच्या क्षणी काही माहिती मिळत नसल्याची नोंद झाली. इस्रोकडून या माहितीचे विश्‍लेषण सुरू असून, लवकरच त्यासंदर्भातील घोषणा करण्यात येईल. अशा मोहिमांमध्ये शंभर टक्के यशाची खात्री नसते, किंबहुना प्रत्येक अपयशातून नव्या भरारीची उमेद जागवली जात असते. त्यामुळे यशापयशाच्या पलीकडे जाऊन त्याकडे पाहणे आणि अशा मोहिमांचे मूल्यमापन गरजेचे ठरते. विज्ञान ही निरंतर चालणारी प्रक्रिया आणि त्यातील प्रत्येक प्रयोगाच्या अपयशामध्येही नव्या यशाची बीजे असतात.

‘एसएसएलव्ही’ म्हणजेच स्मॉल सॅटेलाईट लाँच व्हेईकल हे इस्रोने छोट्या सॅटेलाईट्सच्या प्रक्षेपणासाठी आणि व्यावसायिक द‍ृष्टीने तयार केलेले अवकाशयान. त्याद्वारे उपग्रह त्याच्या कक्षेत पोहोचविण्यात आला. इस्रोचा नवा प्रक्षेपक ‘एसएसएलव्ही’ची उंची 34 मीटर असून, व्यास दोन मीटर एवढा आहे. अवघ्या 100 टन वजनाचा ‘एसएसएलव्ही’ हा नवा प्रक्षेपक फक्‍त सहा जणांची टीम अवघ्या सात दिवसांत उपग्रह प्रक्षेपणासाठी सज्ज करू शकते. यामुळे ‘एसएसएलव्ही’ प्रक्षेपणाच्या माध्यमातून इस्रोची मनुष्यबळ आणि पैशांची मोठी बचत होणार आहे. या प्रक्षेपकामुळे यापुढे लहान उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी मोठ्या प्रक्षेपकावर अवलंबून राहावे लागणार नाही. इस्त्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहिमेचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत आणि उपग्रहांनी नियोजित उंचीही गाठली आणि उपग्रह ज्या भागावर आरूढ होते, त्या इंजिनचा टप्पा सुरू झाला. त्यानंतर दोन्ही उपग्रह प्रक्षेपितही झाले.

मात्र, नियोजित वेळेआधीच ते प्रक्षेपित झाले असावेत किंवा ते वेगळे होताना काही तांत्रिक बिघाड झाला असावा, असा अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे. यासंदर्भातील माहितीचे विश्‍लेेषण सुरू असून, उपग्रहांबद्दलची नेमकी माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे इस्रोच्या अध्यक्षांनी सांगितले आहे. आकाशात ढग आणि पावसाचे थेंब पडत असतानाच रॉकेटने उड्डाण केले. 34 मीटर लांब आणि सुमारे 120 टन वजनाचे हे रॉकेट 500 किलो वजन नेण्यासाठी सक्षम आहे.

‘आझादी सॅट’ हा केवळ उपग्रह नसून साडेसातशे मुलींच्या भावनांचे प्रतिबिंब असल्याचे सॅटेलाईट इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती केसन यांनी म्हटले आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागांतील सरकारी शाळांमधील मुलींना या प्रकल्पाशी जोडून घेण्यात आले होते. मुलींमध्ये विज्ञानविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. प्रकल्पाशी साडेसातशे मुली जोडल्या गेल्या असल्या तरी ते तेवढ्यापुरतेच मर्यादित नव्हते. किंबहुना या साडेसातशे मुलींमध्ये विज्ञानविषयक जागृती करणे एवढाच या मोहिमेचा मर्यादित उद्देश नव्हता तर, लाखो मुला-मुलींपर्यंत विज्ञान पोहोचविण्यासाठीचा हा जागर होता. छोट्या-छोट्या गावांतील शाळांमधील मुलींना त्यात सहभागी करून घेण्यात आले. प्रकल्प सहा महिने सुरू होता आणि या काळात संबंधित मुलींना ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात येत होते. ‘आझादी सॅट’च्या भरारीच्या निमित्ताने मागास समजल्या जाणार्‍या प्रदेशातील विद्यार्थी आणि शाळांपर्यंत विज्ञान नेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला.

विद्यार्थ्यांमध्ये आणि विशेषतः मुलींमध्ये वैज्ञानिक जाणिवा विकसित करण्याचा प्रमुख उद्देश प्रकल्पामागे होता. इस्रोच्या सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रापर्यंत पोहोचणे आणि उपग्रह प्रक्षेपण थेट पाहणे ही या मुलींच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अशी घटना. प्रकल्पामध्ये फक्‍त मुलींनाच सहभागी करून घेण्यामागे सामाजिक संदर्भ होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना सामाजिक आणि आर्थिक पातळीवर लोकसंख्येने निम्म्या असलेल्या स्त्रियांसमोर अनेक आव्हाने कायम आहेत. देशातील एकूण साक्षरतेचे प्रमाण 74 टक्के असले तरी महिलांमधील साक्षरतेचे प्रमाण 64 टक्के आहे. एका सरकारी अहवालानुसार, उच्च शिक्षणामध्येही पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची संख्या कमी आहे. भारतीय समाजव्यवस्थेत स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य मानले जात असले तरीही अजूनही अनेक ठिकाणी स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते. अनेक मुलींचे शिक्षण अर्धवट सोडून लग्‍न लावून दिले जाते. कौटुंबिक कारणांमुळे अनेकींचे शिक्षण थांबते. एकूण व्यवस्थेमध्ये मुलांपेक्षा मुलींसमोरची आव्हाने अधिक खडतर असतात. या पार्श्‍वभूमीवर भव्य स्वप्ने दाखविण्याच्या उद्देशाने या प्रकल्पामध्ये फक्‍त मुलींना सहभागी करून घेण्यात आले होते.

आपल्या स्वप्नाने अवकाशात भरारी घेण्याइतकी मोठी गोष्ट दुसरी कुठली असू शकत नाही. या मोठ्या स्वप्नाला गवसणी घालावी म्हणून फक्‍त मुलींना यामध्ये सहभागी करून घेण्यात आले होते. या मुलींना ऑनलाईन प्रशिक्षण दिले जात होते, तेव्हा त्यांना फक्‍त विज्ञान शिकवले जात नव्हते, तर त्यांच्यामध्ये आत्मविश्‍वासही निर्माण केला जात होता. या उपक्रमाने मुलींमध्ये विज्ञान आणि आत्मविश्‍वासाचे बीजारोपण केले. त्यातून निर्माण झालेला रस्ता त्यांना विकास आणि प्रगतीच्या दिशेने घेऊन जाईल. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात विविध उपक्रम होत असताना इस्रोच्या या उपक्रमाचे मोल अन्य कोणत्याही उपक्रमापेक्षा अधिक आहे. वैज्ञानिक प्रगतीच्या द‍ृष्टीने त्याचे महत्त्व आहेच; शिवाय देशभरातील सरकारी शाळांतील मुलींना त्यात सहभागी करून घेतल्यामुळे त्याला वेगळा सामाजिक संदर्भ प्राप्‍त झाला आहे.

Back to top button