गोवा काँग्रेस चा ‘वाडा’ | पुढारी

गोवा काँग्रेस चा ‘वाडा’

सुरेश गुदले

काँग्रेस गोव्यातील सत्तेच्या स्पर्धेत कधी धावणार अशीच परिस्थिती अद्याप आहे. गोव्यात आगामी सत्तेसाठी भाजप, आम आदमी पक्ष, गोवा फॉरवर्ड आणि मगोप धावत आहेत. विधानसभा निवडणूक हेच त्यांचे सध्या एकमेव लक्ष्य आहे. या शर्यतीत काँग्रेस कधी धावणार आहे, असा प्रश्‍न पडतो.

राजकीय पक्षांनी वेळेवर योग्य निर्णय घेतले नाहीत, विलंब केला, तर आमदार दुसर्‍या पक्षात पळून जातील, त्यांनाही करिअर आहेच ना हो…राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल बोलत होते, गोव्याची राजधानी पणजीत आझाद मैदानावरील जाहीर सभेत. राजकारण नफेखोरीचे करिअर होऊन खूप काळ लोटला, हेच त्यांनी स्पष्ट केले. 2017 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 17 जागा मिळालेल्या. जनादेश त्यांच्या बाजूने होता. या पक्षात पाच माजी मुख्यमंत्री आहेत. पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी या सर्वांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. ते भांडतच राहिले. ‘तुला नाही, मलाच..’ म्हणत राहिले.

दरम्यान, भाजपने सत्तेच्या लोण्याचा गोळा मटकावला. 40 सदस्यांच्या विधानसभेत 21 हा बहुमताचा जादुई आकडा. तो गाठण्यासाठी अन्य पक्ष, अपक्ष काँग्रेसच्या आमंत्रणाची वाट पाहत वैतागून गेलेले. काँग्रेसने राज्यपालांना तातडीने भेटून सत्तेसाठीचा दावाही केला नाही. भाजपने गतीने हालचाली केल्या. त्यांचे आमदार होते 13. करायचे होते 21. झाले, गोवा फॉरवर्डचे तीन, अपक्ष दोन आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे (मगोप) तीन यांची मोट बांधली. 21 चे गणित सुटले. कारभार सुरू झाल्यावर गोवा फॉरवर्ड, मगोप आणि एक अपक्षाने सरकारवर सतत दबाव आणण्याचे प्रयत्न केले. संघाचे केडरबेस असणारे कार्यकर्ते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘थांबा आणि पाहा’चे धोरण अवलंबिले. त्यांनी वेळ येताच डोईजड होऊ पाहणार्‍यांची शिकार केली. आठही सहकार्‍यांना घरचा रस्ता दाखवला. याचे कारण एका रात्रीत काँग्रेसचे दहा आमदार भाजपवासी झाले होते. त्यांना करिअरचा ‘वाटा’ मिळाला.

आता येत्या फेब्रुवारीत विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी काँग्रेस सोडून सर्वच पक्ष धावत आहेत. काँग्रेसचे माजी गोवा प्रभारी चेल्लाकुमार, सध्याचे दिनेश गुंडू राव, निवडणूक निरीक्षक पी. चिदम्बरम सारेच गोवा वारी करतात आणि निर्णयाबाबत दिल्लीकडे बोट दाखवून विमान पकडतात. चिदम्बरम यांचा दोन दिवसांचा दौरा 25 आणि 26 ऑगस्टला झाला. त्यांच्याकडून युतीबाबत, प्रदेशाध्यक्ष पदाच्या वादाबाबत, संभाव्य उमेदवारांबाबत काही ठोस प्रतिपादन अपेक्षित होते. तसे काहीच झाले नाही. पदाधिकारी, कार्यकर्त्यांना नैतिक पाठबळ दिले आणि दहा दिवसांनी परत येणार, असे सांगून गेले. स्वबळावर सर्व 40 जागा लढविण्याची घोषणाही त्यांनी केली.

त्यांच्या दौर्‍यातून निष्पन्‍न काय झाले, याचा विचार केला असता हाती फारसे काही लागत नाही. राजकारण बदलले, कार्यपद्धती बदलल्या, गती बदलली, स्थानिक गरजा आणि निर्णयांची समीकरणे बदलली आहेत. काँग्रेसच्या पाचपैकी दोन माजी मुख्यमंत्र्यांचा एक पाय सध्याच भाजपमध्ये आहे, तरीही काँग्रेसवाले काय बदलायचे नाव घेत नाहीत. स्वबळावर लढणार म्हणणार्‍या पक्षाची देशभर काय स्थिती आहे, ते सर्वज्ञात आहे, तरीही ही मंडळी ‘काय आमच्या आजोबांचा चौसोफी, टोलेजंग वाडा होता राव,’ या मानसिकतेतून बाहेर येत नाहीत.

निवडणुकीच्या तोंडावर काही इच्छुकांना पक्षात पायघड्या अंथरल्या जात आहेत. ते करताना त्यांच्या विश्‍वासार्हतेचे गंभीर प्रश्‍न आहेत. ज्यांना पक्षात घेतले आहे, ते माकडाला लाजवतील, अशा उड्या मारून पळून जाऊ शकतात, हे जनता जाणून आहे. काँग्रेसकडे भाजपसारखे कार्यकर्त्यांचे जाळे नाही. केंद्रात सत्ता नाही. त्यामुळे बंडोबांच्या, नाराजांच्या पदरात काही टाकता येत नाही. ‘करिअर है बॉस…’ म्हणत ते रातोरात भाजपवासी होऊ शकतात. सत्ताधीश भाजप काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याच्या हातात ‘कमळ’ देऊ शकते. या प्रयोगांचा भाजपचा व्यासंगही दांडगा आहे. या प्राप्त राजकीय अवकाशात काँग्रेस व्यवहार्य निर्णय गतीने घेत नाही. दस्तुरखुद्द काँग्रेसजनांच्याच या भावना आहेत. काँग्रेसच्या दुसर्‍या फळीतील युवा कार्यकर्ते स्थानिक ज्येष्ठांच्या आणि दिल्लीस्थित श्रेष्ठींच्या या कार्यपद्धतीवर चरफडतात, ते यामुळेच. काही वेळा ते उघडही बोलतात. श्रेष्ठी मात्र हा आवाज ऐकण्यासाठी वाड्यातून बाहेर यायला तयार नाहीत.

Back to top button