शेजारी आणि आपण! | पुढारी

शेजारी आणि आपण!

बाबा, दिवाळीत आपण लांबच्या प्रवासाला जाऊया?
नको ग. प्रवास फार डोईजड महाग झालेत आता.
मग निदान गौरी-गणपतीसाठी मला नवा ड्रेस तरी घ्याना.
नको सोने. तुझ्याकडे आहेत त्या कपड्यातच सण साजरे कर यंदाचे. कपडे घेणं परवडणार नाही ह्यापुढे.
मला दुचाकी घ्यायचं कधीचं कबूल केलंयत तुम्ही!
तिचं तर विसरच यंदा. एकवेळ कर्ज काढून गाडी घेतली तरी पेट्रोल परवडायला नको?
जा बाबा! तुम्ही असंच करता. काहीही आणा म्हटलं की महागाई वाढलीये, ऐपत नाही ही किरकिरच ऐकवता आम्हाला.
काय करणार? दिवसच तसे आल्येत. शेवटी निर्मलामावशींची इच्छा आणि काय?
तुम्ही काही झालं की निर्मलामावशींचा दाखला काय देता हो?
आर्थिक प्रश्‍न आले की अर्थमंत्र्यांचाच हवाला देणार की नाही? तू असं करतेस का? टूथपेस्ट वापर वाटेल तेवढी. त्या स्वस्त केल्यात निर्मलामावशींनी.
म्हणून काय दिवसात दहादा दात घासू?
तसं नाही, पण पेस्टबाबत काही परवडत नसल्याचं रडगाणं मी गाणार नाहीये. वॉशिंग मशिनं पण स्वस्त झालीयेत बरं का.
बाबा, ज्या गोष्टींची कमीत कमी गरज आहे त्या स्वस्त झाल्याचं नका हं सांगू.
मी कुठे सांगतोय? मावशी सांगताहेत. नुसतं हवेत बोलत नाहीत. सोबत रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचे द‍ृष्टांतही देतात. मग मानायला नको?
परवाच आई म्हणत होती. खोबरेल तेल स्वस्त केलंय वाटतं त्यांनी. पण ते लावायला डोक्याला केस उरले नाहीयेत म्हणत होती.
ती नेहमीच मला टकलावरून बोलते. तुम्हा सर्वांचे वाढते खर्च भागवता भागवताच तर माझं माथ्यावरचं रान वैराण झालंय हे डोक्यात शिरत नाही तिच्या. शेवटी ती ही बाईच ना!
म्हणजे काय बाबा? कशाच्या शेवटी? निर्मलामावशींची गणना नुसती एक बाई म्हणूनच करायला जाणार तुम्ही?
तसं नाही. पण स्वतःच्या कोणत्याही गोष्टीचं छान समर्थन कसं करावं? हे बायकांकडून शिकावं ह्या अर्थाने म्हणत होतो मी.
निर्मलामावशी तसं करतात का?
तूच बघ. राज्यसभेत जी.एस.टी.वरून, भाववाढीवरून एवढा गदारोळ झाला, पण मावशी आपल्या मुद्द्यावर ठाम होत्या. त्या क्षणभर तरी बिचकल्या का? उलट ठासून म्हणाल्या, वाढत्या जी.एस.टी.मुळे उलट काही काही वस्तू पूर्वीच्या सरकारपेक्षा स्वस्तात मिळताहेत.
टूथपेस्ट, वॉशिंग मशिन, चपला, एल.ई.डी. दिवे, हेच ना?
हेही! लोक मारे 7 टक्के भाववाढीवरून दंगा करत बसले. मावशींनी काय सल्ला दिला? जनहो, आपल्या शेजारी राष्ट्रांपेक्षा आपली आर्थिक परिस्थिती खूप म्हणजे खूपच बरी आहे. नेहमी शेजार्‍यांकडे बघावं आणि समाधान मानावं. निर्मलामावशींचा सल्ला म्हटल्यावर ऐकला पाहिजे.
आपल्या शेजार्‍यांनी 42 इंची टी.व्ही. विकत घेतलाय बाबा. मग आपण 50 इंची घ्यायचा? एरवी आपली परिस्थिती त्यांच्यापेक्षा बरी कशी दिसणार बाबा?

Back to top button