आयटी क्षेत्राची कसोटी

आयटी क्षेत्राची कसोटी
Published on
Updated on

पश्‍चिम युरोप सतत आऊटसोर्स करण्याचे आणि खर्च कमी करण्याचे मार्ग शोधत आहे. या शक्यतेव्यतिरिक्‍त, जगभरातील क्लाएंट क्लाऊडशी संबंधित प्रकल्प, पूर्णपणे डिजिटल सेवा, विश्‍लेषण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मेटाव्हर्सकडे जाणे सुरूच ठेवतील. कारण, या सर्व गोष्टींचे संचालन पायाभूत घटकांवरच अवलंबून असते.

रुपयाचे सतत अवमूल्यन सुरू असताना माहिती तंत्रज्ञान (आयटी) उद्योग आपली परकीय कमाई टिकवून ठेवू शकेल का? किंवा वाढता खर्च, कुशल कर्मचार्‍यांचा तुटवडा आणि संभाव्य जागतिक मंदीचा परिणाम म्हणून या क्षेत्राची वाटचाल मंदावेल का? पहिल्या तिमाहीचे निष्कर्ष तसेच व्यवस्थापनाचे अंदाज यावरून मार्जिनमध्ये घट होईल, असे संकेत मिळत आहेत. कंपन्यांना नवीन करार होण्याचा विश्‍वास आहे; परंतु त्या सर्वांनी मार्जिनवर दबाव वाढल्याचेही सांगितले आहे. निफ्टी आयटी निर्देशांक जानेवारी 2022 पासून 30 टक्क्यांनी घसरला आहे. निफ्टीच्या सहा टक्क्यांच्या एकंदर घसरणीच्या तुलनेत तो खूपच जास्त आहे. पूर्वीच्या काळात जेव्हा-जेव्हा रुपयावर दबाव होता, तेव्हा आयटी उद्योग गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरला. कारण, त्याचे उत्पन्न डॉलरमध्ये असते, तर वेतनावरील खर्च रुपयांमध्ये असतो.

नव्याने समोर आलेले निष्कर्ष असे सूचित करतात की, मार्जिनवर दबाव आहे आणि मागणी कमी होत आहे. कारण, परदेशी ग्राहकांनी आयटीवरील विवेकाधीन खर्चावर कपात केली. आयटी क्षेत्रातील चार मोठ्या कंपन्यांचा धांडोळा घेऊ या. इन्फोसिसचा रुपयातील नफा वर्षानुवर्षे केवळ तीन टक्क्यांनी वाढला, तर महसूल 24 टक्क्यांनी वाढला. कंपनीच्या ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिनमध्ये 3.5 टक्क्यांची घट झाली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 2.5 टक्क्यांनी घसरले, तर विप्रोचे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन चार वर्षांच्या नीचांकी पातळीवर घसरले. एचसीएलचे तंत्रज्ञानाचे मार्जिनही अनेक वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले. छोट्या आयटी कंपन्यांमध्येही मार्जिन ठप्प झाले. उदाहरणार्थ, टेक महिंद्राच्या ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिनमध्ये 2.25 टक्क्यांची घट झाली. संपूर्ण क्षेत्रच नकारात्मक ट्रेंडने त्रस्त आहे. कर्मचार्‍यांवरील खर्च वाढत आहे, कार्यालयांचे भाडे वाढत आहे आणि प्रवास खर्चही वाढत आहे. मोठ्या कंपन्यांमध्ये गळतीचे प्रमाण 20 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. भारतातील युनिकॉर्न कंपन्यादेखील विशिष्ट प्रतिभा असणार्‍या व्यक्‍तींनाच कामावर घेण्यासाठी स्पर्धा करीत आहेत आणि स्टार्टअप्सच्या गरजांमुळे लहान उद्योगांना उपकंत्राट देण्याचे प्रमाणही वाढले आहे.

त्याचबरोबर परदेशी क्लाएंटदेखील कॉर्पोरेट आयटी बजेटचे फेरनिरीक्षण करीत आहेत आणि आवश्यक खर्चावरच लक्ष केंद्रित करत आहेत. त्यांना रुपया आणि डॉलरचा ट्रेंड चांगलाच माहीत आहे. म्हणून ते डॉलरच्या दरांसाठी वाटाघाटी करत आहेत. म्हणजेच खर्चात वाढ होऊनही महसुलात घट झाली. पश्‍चिम युरोप मंदीच्या दिशेने वाटचाल करीत असताना उत्तर अमेरिकेतही आर्थिक मंदी येण्याची शक्यता आहे. अर्थात, बहुतेक कंपन्या नवीन करारांसह त्यांच्या व्यवसायाची गती राखली जाईल, याबाबत आशावादी आहेत. काही विश्‍लेषक आयटी क्षेत्रातील महसूल वाढण्याच्या शक्यता मंदीसदृश परिस्थितीशी जोडतात. पश्‍चिम युरोप सतत आऊटसोर्स करण्याचे आणि खर्च कमी करण्याचे मार्ग शोधत आहे. या शक्यतेव्यतिरिक्‍त, जगभरातील क्लाएंट क्लाऊडशी संबंधित प्रकल्प, पूर्णपणे डिजिटल सेवा, विश्‍लेषण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मेटाव्हर्सकडे जाणे सुरूच ठेवतील. कारण, या सर्व गोष्टींचे संचालन पायाभूत घटकांवरच अवलंबून असते; परंतु नजीकच्या भविष्यात खर्च कमी करण्यावरच लक्ष केंद्रित केले जाण्याची शक्यता आहे.

अल्फाबेट आणि मेटा यांसारख्या मोठ्या कंपन्यादेखील वाढत्या मूल्यांकनामुळे दबावाखाली आहेत. बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील ग्राहकदेखील तयारी करीत आहेत. कारण त्यांना उच्च धोरणात्मक दरांचा सामना करावा लागतो, तर जगात सर्वत्र उत्पादन क्षेत्राला पुरवठ्याच्या क्षेत्रातील अडचणींचा सामना करावा लागतो आणि महागाईमुळे ग्राहकांकडून मागणी कमी राहते. बाजारातील या पातळीवरील घसरण हे एक सूचक आहे. नजीकच्या भविष्यात आयटी क्षेत्रातील नफा आणि महसूल यावर परिणाम होऊ शकतो, याविषयी सामान्यतः एकमत असल्याचे दिसून येते. या उद्योगाने दीर्घकालीन संरचनात्मक मागणीचा लाभ घेतला पाहिजे, त्याचबरोबर उच्च प्रतिभाशाली मनुष्यबळाची कमतरता आणि जागतिक मंदी या घटकांचा परिणाम नफ्यावर होणार आहे.

– महेश कोळी, संगणक अभियंता

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news