मुंबई नावाचा ‘मराठी’ महासागर ! | पुढारी

मुंबई नावाचा ‘मराठी’ महासागर !

महाराष्ट्राच्या तब्बल 33 जिल्ह्यांत प्रवास केलेले एकमेव राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी ओळखले जातील. ते महाराष्ट्रात सर्वप्रकारच्या व्यासपीठांवर, विचारपीठांवर आणि मंचांवर जाऊन आले. लोकांशी बोलत आले. कुठे प्रमुख पाहुणे, कुठे उद्घाटक, तर कुठे विद्वान व्याख्याते म्हणून लोक त्यांना बोलावत आले आणि कोश्यारीदेखील राजभवनाच्या राजवस्त्रांची तमा न बाळगता लोकांमध्ये ऊठबस करत आले आहेत. राजभवनदेखील त्यांनी अशा कार्यक्रमांना खुले करून दिले. एखादी संस्था मानद पीएचड्या वाटते, डी. लिट वाटते, पुरस्कार वाटते. या वाटपासाठी राजभवन ही एक हक्‍काचीच जागा होऊन गेली. कोरोना योद्धा म्हणून ज्या संख्येने महाराष्ट्रात पुरस्कार वाटले गेले, ती संख्या कदाचित एकूण कोरोना रुग्णसंख्येलाही मागे टाकते की काय, अशी भीती वाटण्यासारखी परिस्थिती असताना स्वतः राज्यपालांनी राजभवनावरही असे काही कार्यक्रम होऊ दिले. अनेक कोरोना योद्ध्यांच्या पाठीवर स्वतः थाप दिली. गेल्या चार वर्षांत बघता बघता कोश्यारी हे आपल्या कुटुंबातले कुणी आजोबा, तात्या वगैरे वाटावेत इतके ते इथल्या जनमानसात मिसळून गेले. असा माणूस मराठी माणसाचा, मराठी महाराष्ट्राचा अपमान करूच कसा शकतो, असा प्रश्‍न निर्माण होणे फार साहजिक होते. आणि हा प्रश्‍न पुन्हा पुन्हा निर्माण होईल, अशा संधी खुद्द कोश्यारी यांनीही निर्माण केल्या. कोश्यारी हे अत्यंत धूर्त, चाणाक्ष राजकारणी म्हणून ओळखले जातात; पण हा त्यांचा धाक तसा प्रतिस्पर्धी राजकारण्यांना वाटत आला आहे. कोश्यारींच्या मनात काय सुरू असते याचा थांगपत्ता लागत नाही, तो ते लागू देत नाहीत, हा अनुभव उत्तराखंड या त्यांच्या राज्याने नेहमीच घेतला. आजही ते उत्तराखंडचे राजकारण मुंबईत बसून चालवतात, खेळतात, खेळवतात ते यामुळेच! तिथले मुख्यमंत्री धामी हे कोश्यारी गटाचे म्हणूनच ओळखले जातात. कोश्यारींचा आशीर्वाद हीच धामी यांची ताकद मानली जाते. आणि असा डोक्यावर हात ठेवण्याची ताकद कोश्यारी यांनीही पक्षात आणि संघ परिवारात कमावली ती आपल्या सचोटीमुळे, संघनिष्ठ जीवनशैलीमुळे. जनसामान्यांचे राजकारण करणारा नेता असलेले कोश्यारी महाराष्ट्र पालथा घालत तळागाळातल्या प्रवाहांपर्यंत पोहोचले खरे; पण या प्रवाहांचा, त्यांच्या चढ-उतारांचा अंदाज जिथे भल्याभल्या भूमिपुत्र राजकारण्यांना येत नाही, तिथे कोश्यारी तर ठरले पाहुणे! कोणताही पाहुणा फार फार तर पाट-पाणी घेतो अन् जातो. तिथल्या स्वयंपाकघरात डोकावण्याइतपत त्याला उसंत नसते. त्यामुळे प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपालांनी महाराष्ट्र पाहिला, अनुभवला, त्या महाराष्ट्राच्या जगण्यात भूत अन् वर्तमानाचे मीठ किती, तिखट किती, ते कुणाला किती चालते की निव्वळच अळणी लागते, याचा अदमास न आल्याने काही गफलती झाल्या. त्यातून समर्थ रामदास आणि छत्रपती शिवरायांची भेट त्यांनीही घडवून आणली, सावित्रीबाई फुलेंच्या संदर्भात ते अनुचित टिपणी करून बसले आणि आता तर ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुंबईच्या अस्मितेचा अंगारच त्यांनी अंगावर घेतला. मुंबईसह हा महाराष्ट्र उपर्‍यांच्या पैशांवरच जणू जगतो आहे आणि ही बाहेरची पाहुणे मंडळी इथे कायम मुक्‍कामी आहेत म्हणूनच महाराष्ट्र दोनवेळ नीट जेवतोय, हे पाहुणे इथून बाहेर काढले तर हाच महाराष्ट्र राजाचा रंक होईल अन् मुंबई निष्कांचन होईल, मुंबईच्या डोक्यावर परप्रांतीयांनी चढवलेला आर्थिक राजधानीचा मुकुट खाली उतरवून ठेवावा लागेल, हे असे काही भयंकर सूचित करतानाही राज्यपाल महाराष्ट्राचा द्वेष करतात असा निष्कर्ष काढणे अन्यायाचे आणि घाईचे ठरेल. त्यांचे या महाराष्ट्रावर प्रेम आहेच.

महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपर्‍यातून येणार्‍यांसाठी राजभवनावर चहाचे आधण कायम ठेवलेले असते. महाराष्ट्रात अभूतपूर्व सत्तांतर घडल्यानंतर तर राजशिष्टाचार बाजूला ठेवत कोश्यारींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पहिला पेढा भरवला. राजभवनाचे हे प्रेम पाहून शरद पवार यांच्यासारखा राजकारणीही घायाळ झाला. असे कधी राजभवनावर पाहिले, अनुभवले नाही असे ते म्हणाले. सारीपाट सत्तेचा असला तरी त्यावर टाकल्या जाणार्‍या सोंगट्या नाना जाती, धर्म, पंथ आणि परंपरांमधून आलेल्या असतात. त्यांना त्यांचा म्हणून एक इतिहास आणि त्या इतिहासाचे बोट धरून वर्तमान असतो. सत्तेचा सारीपाट खेळणार्‍या प्रत्येकाला याचे भान ठेवावे लागते. हे भान सुटले की मग मुंबई, महाराष्ट्राच्या खिशात खुळखुळणारी लक्ष्मी ही गुजरात, राजस्थानच्या देवघरातली दिसू लागते. राजस्थानचे लोक देशाच्या इतरही भागात स्थिरावले आणि तिथे भरभराट आली; पण खुद्द राजस्थानात राहून ही मंडळी राजस्थानची विपन्नावस्था का नाही सुधारू शकली? आपापल्या राज्यात ही विश्‍वकर्मा मंडळी प्रतिमुंबईचे निर्माण का नाही करू शकली? उत्तर प्रदेशात आता प्रतिबॉलीवूड उभारले जाणार म्हणतात. तेलंगणाच्या रामोजी फिल्म सिटीपेक्षा ते वेगळे नसेल. तिथे शूटिंग करून लोक मुक्‍कामी मुंबईतच येणार. कारण, या मुंबईत मराठी श्‍वास घेत ही माणसे जगतात. मराठी हवा, मराठी पाणी असे सारे ओक्केमंदी असल्यामुळेच जो उठतो तो आपले बोचके घेऊन मुंबई गाठतो. कष्ट करून चार पैसे गाठीशी बांधतो. इथे सारेच कष्टाने श्रीमंत होतात असे नाही. काही हिकमती करूनही श्रीमंत होतात. अशांच्याही पैशांवर मुंबई, महाराष्ट्राने कधी दावा सांगितला नाही. भूमिपुत्रांना धंद्यात पार्टनर करावेच लागेल, असा दुबईचा दंडक मुंबईत नाही. तरीही भूमिपुत्रांच्या हातांनीच ही मुंबई आजवर तोलून धरली आहे. मुंबई ही मुंबई का आहे? देशाच्याच नव्हे, जगाच्या कानाकोपर्‍यांतून येणार्‍या प्रवाहांचे स्वागत इथल्या भूमिपुत्रांनी आजवर केले. या प्रवाहांना इथे रुजता येईल, वाढता येईल, मोठे होता येईल असे वातावरण दिले. इथे येऊन मोठे झालेले प्रवाह आमच्या संधी हिरावून घेतात, आपल्या आसुरी झपाट्यात भूमिपुत्रांना वेचून वेचून किनार्‍यावर फेकतात ही भावनाही भूमिपुत्रांमध्ये अधूनमधून उफाळून येते आणि मग शिवसेनेसारख्या चळवळी जन्म घेतात; पण म्हणून मुंबईची दारे बंद झाली असे घडले नाही. या खुलेपणातून मुंबईचे नवनिर्माण सतत होत आले. माणूस कुठूनही मुंबईत येऊ द्या, तो इथे आला की, मुंबईकर होतो. तुम्ही जिथून येता ती पाळेमुळे तोडून टाका, परतीचे रस्ते बंद करा, असा कोणताही आग्रह न धरता मुंबई तुम्हाला मुंबईकर होऊ देते. म्हणूनच महाराष्ट्रातील निरनिराळ्या प्रदेशांचाच नाही तर निरनिराळ्या राज्यांच्या संस्कृतींचा संकर मुंबईत घडताना दिसतो. मराठी माणसाची ही मोठी देण म्हणावी. मुंबईचा हा अनुभव भारताचे अन्य कोणतेही महानगर देत नाही.

बंगळूर हे महानगर आहे; पण तिथे आजची नोकरी संपली की बाहेर पडणारेच जास्त. तिथे संस्कृतींचा नित्य कुंभमेळा दिसत नाही; जो मुंबईत जाणवतो. दिल्लीला तशी स्थानिक संस्कृतीच नाही. स्थलांतरितांच्या लोंढ्यांसोबत जे काही नवे जोरकस येते ते काही काळ तिथे टिकते. मुंबईची ही मुंबई असल्याची जाग तुमच्या रंध्रारंध्रात भिनते आणि ती सतत जाणवत राहते. या जिवंतपणाचा एक निकष आहे. तुम्ही मुंबईतून भूमिपुत्र वजा करू शकत नाही आणि बाहेरून आपापली ऊर्जा घेऊन जे आले त्यांना बाहेरचा रास्ता दाखवू शकत नाही. जगाचे सारे प्रवाह पचवून त्यांच्यासोबत उभे ठाकण्याचा खुलेपणा भूमिपुत्रांनी दाखवला म्हणून मुंबई ही मुंबई आहे. भूमिपुत्र आणि परप्रांतीय यात तारेवरची कसरत फार तर मतांची असू शकेल. हा खेळ भूमिपुत्रांच्या आणि परप्रांतीय कष्टकर्‍यांच्याही जगण्याशी नको. तो परवडणारा नाही. जराही तोल गेला तर त्याची राजकीय, सामाजिक किंमत मुंबईला, महाराष्ट्राला मोजावी लागू नये. वेगवेगळे देश एकत्र आले म्हणून युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका नावाच्या महासत्तेचा जन्म झाला. तसे सर्वच राज्यांचे लोंढे मुंबईत येऊन आदळतात म्हणून युनायटेड स्टेट्स ऑफ मुंबई, असे काहींना वाटते. उभा देश सामावून घेणारा मुंबई नावाचा हा मराठी महासागर आहे. या अर्थाने मुंबई ही देशाचीच राजधानी ठरावी. असे असले तरी ‘मुंबई महाराष्ट्रात आहे; पण महाराष्ट्र मुंबईत किती?’ हा ऐतिहासिक प्रश्‍न आजही पिच्छा सोडत नाही. सर्वाधिक स्थलांतर महाराष्ट्रातून होत असताना मुंबई ही मराठी माणसाची महासत्ता व्हायला हवी. मुंबईत आधीच मराठी माणूस अल्पसंख्य. त्याच्यावर हक्‍क सांगणारे अर्धा डझन पक्ष आता रिंगणात उतरतील. अशा नाजूक वळणावर राज्यपालांनी गुजराती, राजस्थानी बांधवांच्या वर्चस्वाबद्दल विधान करून मराठी माणसाला जागे केले, चेतवले. वामकुक्षी मोडून लेखक, कवी, कलावंतही हुतात्मा चौकात जमले. अपमान झाला म्हणून मराठी माणूस पेटून, संतापून उठला. याचे श्रेय राज्यपालांनाच द्यावे लागेल. हे त्यांचे ऋणच म्हणायचे!

एखाद्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गेल्यावर आयोजकांचे कौतुक करायचे असते, हे समजण्यासारखे आहे; पण आयोजकांचे जरा जास्त कौतुक करताना राज्यपाल यजमान महाराष्ट्राला दुखावून गेले. हे त्यांच्याही नंतर लक्षात आले. आपल्याच शब्दांनी आपणच कधी कधी व्यथित होतो. राज्यपालांचेही तसेच झाले असेल.कोणतीही उपाधी नावापुढे नसलेल्या एका कार्यकर्त्याचा फोन राजभवनावर उचलला गेला. राज्यपाल स्वतः बोलले. त्या आधीच त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली होती. यावर आता पुन्हा रुद्रावतार धारण केला तर ते हास्यास्पद ठरेल. राज्यपालांनी राजभवनाचे लोकभवन केले हे विसरून चालणार नाही. राजभवनावर सतत लोकांची वर्दळ असते, अगत्याने चहा विचारला जातो. अमूक एका पक्षानेच तिथे सतत पायधूळ झाडावी असे नाही. मराठी प्रांतातील सर्वच प्रवाह तिथंपर्यंत पोहोचले तर चित्र आणखी बदलेल. अशा मोक्याच्या जागांवर मराठी माणसाला, मराठी चळवळींनाही हक्‍क सांगावा लागेल. तसे साध्या साध्या लहान-मोठ्या कार्यक्रमांनाही राज्यपाल येतात. मधल्या काळात लोकांच्या निमंत्रणाला राज्यप्रमुख म्हणून ओ देण्यासाठी फक्‍त राज्यपाल उपलब्ध असायचे. शेवटी त्यांचाही पिंड राजकारण्याचा आणि सतत लोकांमध्ये असण्याचा. राज्यपाल म्हणून ते महाराष्ट्र फिरले. महाराष्ट्र हा दगडांचा, दर्‍याखोर्‍यांचाही देश. सारेच खाचखळगे एक-दुसर्‍या दौर्‍यात कसे कळतील? फार खोलात जाऊन, तपासून घ्यावी लागते प्रत्येक गोष्ट. ‘मी बावनकुळे’ असे कुणी सांगू लागला तर कुठल्याच बावन्न कुळांशी त्याचे नातेगोते असत नाही, हे कळायला अर्थात महाराष्ट्रात जन्म घ्यावा लागेल आणि महाराष्ट्राचे राजकारण खेळावे लागेल. हे राजकारण कुठे दुखते, कुठे खुपते हे राज्यपालांना कळण्याचे कारण नाही आणि त्यात त्यांचा दोषदेखील मानता येत नाही.

– विवेक गिरधारी

Back to top button