दहशतीचा खात्मा | पुढारी

दहशतीचा खात्मा

दहशतवादाचा क्रूर चेहरा म्हणून ओळखला जाणार्‍या अल्- कायदाचा प्रमुख अल जवाहिरीचा खात्मा ही जागतिक पातळीवरील अत्यंत महत्त्वाची घटना आहे. ओसाबा बिन लादेनचा शेवट केल्यानंतर अमेरिकेने मिळवलेले हे मोठे यश असले तरी 9/11 च्या हल्ल्याचा बदला पूर्ण होण्यापुरताच या घटनेचा अर्थ मर्यादित नाही. दहशतवादाविरोधातील लढाई ही काही काळापुरती किंवा विशिष्ट प्रांतापुरती चालणारी लढाई नाही, तर ती दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण करावयाची लढाई आहे, हेही अमेरिकेने या कारवाईतून दाखवून दिले.

अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेताना अमेरिकेने जी घाई केली आणि अफगाणिस्तान सहजपणे तालिबान्यांच्या हातात सोपविला गेला, त्यावरून अमेरिकेची दहशतवादविरोधी लढाई ढिली पडली की काय, अशी शंका वाटण्याजोगी परिस्थिती होती. एकीकडे रशिया आक्रमकपणे विस्तारवादी भूमिका घेत असताना आणि चीनचीही मुजोरी सुरू असताना जगाच्या फौजदाराची भूमिका बजावणारी अमेरिका तटस्थतेकडे चाललेली दिसत होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या नेतृत्वाने अनेक राष्ट्रांचा भ्रमनिरास केला होता. अशा पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने अल जवाहिरीचा खात्मा केला, हे लक्षात घ्यावे लागते. तालिबान्यांच्या ताब्यात असलेल्या अफगाणिस्तानमध्ये ही कारवाई केली, त्यावरून अमेरिकेने दहशतवादविरोधातील लढाई अद्याप सोडलेली नाही, हेच दिसून येते; परंतु त्याचवेळी यातील आणखी एक पदर लक्षात घ्यावयास हवा. अमेरिकन नागरिकांच्या हिताच्या पलीकडे जाऊन फारशा लष्कराच्या भाकरी भाजायच्या नाहीत, असेही बायडेन यांनी ठरविलेले दिसते. अल जवाहिरीचा खात्मा करून 9/11च्या हल्ल्याचा बदला घेताना बायडेन यांनी अमेरिकन नागरिकांना आश्‍वस्त केले आहे; परंतु त्यापलीकडे जाऊन बाहेरच्या कुठल्या प्रश्‍नासाठी पुढाकार घेऊन अमेरिकन सैनिकांना वेठीस धरण्यास मात्र ते फारसे उत्सुक नसल्याचे दिसते. ताज्या रशिया-युक्रेन युद्धाच्या निमित्तानेही हे दिसून आले. युक्रेनला आर्थिक मदत, शस्त्रास्त्रे पुरवण्याची हमी देताना लष्करी मदत पुरवण्याबाबत मात्र हात वर केले गेले. जॉर्ज बुश यांच्या आक्रमक आणि युद्धखोर नेतृत्वानंतर बिल क्लिटंन, बराक ओबामा यांच्यासारखे कणखर नेतृत्व अमेरिकेला लाभले आणि अमेरिकेचा जागतिक पातळीवरील दबदबा कायम ठेवला. डोनाल्ड ट्रम्प यांची कारकीर्द वादग्रस्त असली तरी आक्रमकपणाच्या बाबतीत ते कुणापेक्षाही कमी नव्हते. बायडेन यांनी मात्र आधीच्या या परंपरांना फाटा देऊन अमेरिकेचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्यांची भूमिका जागतिक पातळीवरील अमेरिकेचे महत्त्व कमी करणारी असली तरी अमेरिकन नागरिक त्याकडे कसे पाहतात, हे महत्त्वाचे असून त्याचा अंदाज येण्यास थोडा कालावधी जावा लागेल. जवाहिरीला ठार केल्यानंतर बायडेन यांनी, आता न्याय पूर्ण झाल्याची भावना व्यक्‍त केली. कितीही उशीर लागला, तुम्ही कुठेही लपलात तरी, आमच्या लोकांसाठी धोका असाल तर अमेरिका तुम्हाला शोधून बाहेर काढणारच, असा इशारा यानिमित्ताने बायडेन यांनी दिला आहे.

अमेरिकेने ज्या रितीने ओसामा बिन लादेनचा खात्मा केला, त्याच पद्धतीने अल जवाहिरीला संपवले. अल जवाहिरी आधी पाकिस्तानमध्ये राहात होता, अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट आल्यानंतर त्याने अफगाणिस्तानमध्ये आसरा घेतला. अत्यंत गुप्त आणि सुरक्षित ठिकाणी त्याचे वास्तव्य होते. जवाहिरी हा ओसाबा बिन लादेनचा उजवा हात होता आणि अमेरिकेवरील 9/11च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड म्हणूनही ओळखला जात होता. मधल्या काळात अनेकदा त्याच्या मृत्यूच्या बातम्या आल्या होत्या. व्यवसायाने डॉक्टर असलेला अल जवाहिरी अल्-कायदाचा मेंदू मानला जात होता. 2011 मध्ये ओसामा बिन लादेनला ठार केल्यानंतर अल्-कायदाची सूत्रे जवाहिरीकडे आली होती. अल जवाहिरी अमेरिकेच्या 22 मोस्ट वाँटेड दहशदवाद्यांच्या यादीत होता आणि त्याच्यावर अडीच कोटी डॉलर्सचे इनामही होते. अल्- कायदाने जगभरातील मुस्लिमांमध्ये धार्मिक कट्टरता आणि टोकाचा धर्मवाद भरण्याचा प्रयत्न केला. जवाहिरीने एकदा नव्हे, अनेकदा थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना आव्हान दिले होते. यावरून त्याच्या धाडसाची कल्पना यावी. मिस्रची राजधानी काहिरा येथे 1951 मध्ये एका प्रतिष्ठित मध्यमवर्गीय कुटुंबात अल जवाहिरीचा जन्म झाला होता. त्याचे वडील काहिरा युनिव्हर्सिटीत प्रोफेसर होते. वयाच्या पंधराव्या वर्षी मुस्लिम ब्रदरहुड या अवैध संघटनेचा सदस्य झाल्याबद्दल जवाहिरीला अटक झाली होती. मुस्लिम ब्रदरहुड ही मिस्रची मोठी इस्लामिक संघटना म्हणून ओळखली जाते. काहिरा युनिव्हर्सिटीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असतानाही जवाहिरीचे बाकीचे उपद्व्याप सुरूच होते. मिस्र सरकार उलथवून टाकण्याचे प्रयत्न कट्टरवादी मुस्लिम समूहाकडून सुरू होते; त्यात जवाहिरीचा संबंध होता. 1973 मध्ये मिस्रचे तत्कालीन राष्ट्रपती अन्वर सदात यांची हत्या झाली, त्यात जवाहिरीचा सहभाग होता आणि तिथूनच त्याच्या नेतृत्वाचा उदय झाला. हत्येच्या आरोपातून जवाहिरी सुटला तरी अवैध शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याला शिक्षा झाली. त्या काळात तुरुंगातील अनुभवांमुळे तो अधिक कट्टर बनला आणि 1985 मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर सौदी अरबला गेला. तिथून पाकिस्तान आणि तिथून अफगाणिस्तान. जवाहिरीचा हा प्रवास पाहिल्यानंतर एका चांगल्या कुटुंबातला हुशार मुलगा चुकीच्या प्रभावामुळे कसा भरकटत जातो आणि जगासाठी संकट बनतो, हे लक्षात येऊ शकते. अल्-कायदा ही ओसामा बिन लादेनची संघटना म्हणून ओळखली जात असली तरीही लादेनच्या काळातही जवाहिरीचा दबदबा तेवढाच होता. लादेनपेक्षाही जवाहिरीच्या अतिरेकी कारवाया त्या काळात अधिक प्रसारित होत असत आणि त्याद्वारे कट्टरतेचे विष पसरविण्याचे काम केले जाई. अकरा वर्षांपूर्वी लादेनचा खात्मा झाला. आता जवाहिरीही गेला. जागतिक इतिहासातील दहशतवादाचा एक अध्याय संपला!

Back to top button