ढगफुटी का होते?

ढगफुटी का होते?
Published on
Updated on

भारतात परकीय शक्‍ती म्हणजेच चीनकडून ढगफुटीच्या घटना घडवून आणल्या जात आहेत, असे विधान तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पार्श्‍वभूमीवर कृत्रिम पाऊस कसा पाडला जातो, ढगफुटी कशाला म्हणायचे आणि ती कशी होते अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे माहीत असणे योग्य ठरेल.

मुसळधार पावसामुळे तेलंगणातील गोदावरी भागात सध्या पुराचा सामना करावा लागत आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव तथा केसीआर हे 17 जुलै रोजी पूरग्रस्त भद्राचलमच्या भेटीवर गेले होते. तेथे त्यांनी गोदावरी परिसरात अतिवृष्टी आणि पुराचे कारण ढगफुटी हे असल्याचे सांगितले आणि त्यामागे परकीय षड्यंत्र असू शकते, असेही सांगितले. एका लहान भागात, कमी कालावधीत अतिवृष्टीची होणारी घटना म्हणजे ढगफुटी. वास्तविक, ढग फुटण्यासारखे काहीही यावेळी घडत नाही. पाऊस मात्र इतका जोरदार असतो, जणू पाण्याने भरलेले असंख्य पॉलिथिन आकाशात एकदम फुटले आहेत. म्हणूनच त्याला ढग फुटणे आणि इंग्रजीत 'क्लाऊडबर्स्ट' असे संबोधण्यात येते.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, जेव्हा अचानक वीस ते तीस चौरस किलोमीटरच्या परिसरात एका तासात किंवा त्यापेक्षा कमी वेळात 100 मिलिमीटर किंवा त्याहून अधिक पाऊस पडतो, तेव्हा ती ढगफुटीची घटना मानली जाते. सर्वांत आधी आपल्याला 1 मिलिमीटर पावसाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. एक मिलिमीटर पाऊस म्हणजे एक मीटर लांब आणि एक मीटर रुंद म्हणजेच एक चौरस मीटर क्षेत्रात एक लिटर पाणी पडणे होय. आता हेच गणित ढगफुटीच्या व्याख्येत बसवताना एक मीटर लांब आणि एक मीटर रुंद परिसरात जेव्हा 100 लिटर किंवा त्याहून अधिक पाणी पडते, तेही तासाभरात किंवा त्यापेक्षा कमी वेळात, तेव्हा या भागातढगफुटी झाली असे समजावे. फक्‍त शंभर लिटर? तसे पाहायला गेल्यास हे गणित खूप लहान वाटत असेल. परंतु त्याच्या विशालतेची कल्पना यावी म्हणून आपण हे गणित एक चौरस मीटरच्या ऐवजी एक चौरस किलोमीटर क्षेत्रात बसवले, तर असे म्हणता येईल की, जेव्हा त्या क्षेत्रात 10 कोटी लिटर पाणी एक चौरस किलोमीटर परिसरात एका तासापेक्षा कमी वेळात पडते, तेव्हा समजावे ढग फुटला!

1970 ते 2016 या 46 वर्षांच्या काळात देशात ढगफुटीच्या 30 हून अधिक घटना घडल्या. या सर्व घटना हिमालयाच्या प्रदेशात घडल्या. 2013 मध्ये उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे अचानक पूर आला आणि केदारनाथ आपत्ती कोसळली होती. या आपत्तीत 5 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. आसाममध्ये पाऊस आणि पुरामुळे दरवर्षी शेकडो लोकांचा मृत्यू होतो. ढगफुटीच्या बहुतांश घटना भारत-चीन सीमावर्ती भागात घडत आहेत. अशा परिस्थितीत यामागे चिनी कारस्थान असण्याची शक्यता वर्तविली जाते. भारत आणि चीनदरम्यान अनेक वर्षांपासून सीमावाद सुरू आहे. चीनचे सैन्य वेळोवेळी सीमेवर चिथावणीखोर कारवाया करीत असते. अशा स्थितीत चीन ढगफुटीचा कट रचत असून, पाऊस आणि पुरामुळे भारताचे नुकसान करण्याचा चीनचा प्रयत्न असल्याचा संशय अनेकांना आहे.
भारत, चीन, अमेरिकेसह जगातील 60 देशांनी कृत्रिम पाऊस पाडण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्रज्ञानाला क्लाऊड सीडिंग किंवा वेदर कंट्रोल टेक्नॉलॉजी म्हणतात. क्लाऊड सीडिंगद्वारे, केव्हाही किंवा वेळेपूर्वी पाऊस पाडता येतो. चीनने या तंत्रावर प्रभुत्व मिळवले आहे. बीजिंगमध्ये 2008 च्या ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान जेथे दुसर्‍या दिवशी सामने होणार होते, तेथे चीनने हवामान बदलाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून आदल्या दिवशीच पाऊस पाडला. त्यामुळे दुसर्‍या दिवशी आकाश निरभ्र झाले आणि पाऊस पडला नाही. या तंत्रज्ञानाच्या मदतीने चीनला बीजिंग ऑलिम्पिकचे आयोजन पावसाच्या व्यत्ययाशिवाय करता आले. ढगांचे पावसात कृत्रिमरीत्या रूपांतर करण्याच्या तंत्रज्ञानाला क्लाऊड सीडिंग म्हणतात. क्लाऊड सीडिंगसाठी सिल्व्हर आयोडाईड, पोटॅशियम आयोडाईड आणि कोरडा बर्फ (घन कार्बन डाय ऑक्साईड) यांसारखी रसायने हेलिकॉप्टर किंवा विमानाद्वारे आकाशात ढगांच्या जवळ विखुरली जातात. हे कण हवेतील वाफ आकर्षित करतात. त्यामुळे वादळी ढग तयार होतात आणि अंतिमतः पाऊस पडतो. अशा प्रकारचा पाऊस पाडण्यासाठी सामान्यतः अर्धा तास लागतो.

क्लाऊड सीडिंगचे दोन मुख्य उद्देश असतात. एक म्हणजे, आपल्या इच्छेनुसार पाऊस आणि बर्फवृष्टी वाढविणे आणि एखाद्या ठिकाणी एक किंवा दोन दिवस आधीच पाऊस पाडणे. याचा पहिला यशस्वी प्रयोग 1946 मध्ये अमेरिकी शास्त्रज्ञ व्हिन्सेन्ट जे. शेफर यांनी केला होता. यानंतर विमान, रॉकेट, तोफ आणि ग्राऊंड जनरेटरच्या सहाय्याने क्लाऊड सीडिंग केले आहे. अतिवृष्टी आणि ढगफुटी यात कोणताही ठळक फरक नाही. एखाद्या ठरावीक ठिकाणी ठरावीक वेळी भरपूर पाऊस पडतो, तेव्हा त्याला आपण ढगफुटी म्हणतो. ढगफुटी ढगांवर अवलंबून असते. वाफेने अधिक भरलेले ढग ओळखून त्यात क्लाऊड सीडिंग केल्यास ढग फुटू शकतात. अमेरिकेने 1967 ते 1972 दरम्यान व्हिएतनाम युद्धावेळी क्लाऊड सीडिंग तंत्रज्ञानाचा वापर केला होता. ऑपरेशन पोपोय राबविताना व्हिएतनामवर विजय मिळविण्यासाठी अमेरिकेने तसे केले होते. काही वृत्तांनुसार, व्हिएतनामच्या हो-ची-मिन्ह शहरावर अमेरिकेने क्लाऊड सीडिंगद्वारे ढगफुटीची घटना घडवून आणली होती. त्यामुळे अचानक पाऊस, पूर आणि दरड कोसळण्याची परिस्थिती निर्माण होऊन व्हिएतनामी फौजांचे मोठे नुकसान झाले होते.

जुलै 2021 मध्ये दुबईत जेव्हा तापमान 50 अंशांवर पोहोचले होते, तेव्हा उष्म्यापासून मुक्‍तता मिळविण्यासाठी तेथे क्लाऊड सीडिंग करण्यात आले. त्यासाठी सिल्व्हर आयोडाईड, पोटॅशियम आयोडाईड आणि ड्राय आईस ही रसायने विमाने आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आकाशात विखुरली गेली होती. या रासायनिक कणांमुळे हवेतील आर्द्रता आकर्षित झाली. पाण्याचे सर्व कण जवळ आल्यावर एक मोठा वादळी ढग तयार झाला. त्यानंतर हा ढग ड्रोनच्या माध्यमातून इलेक्ट्रिकली चार्ज करण्यात आले आणि त्यामुळे पाऊस पडला. या प्रक्रियेद्वारे पाऊस पाडण्यासाठी अवघा अर्धा तास लागला होता, असे सांगितले जाते.

– रंगनाथ कोकणे, पर्यावरण अभ्यासक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news