चीनची दुटप्पी चाल | पुढारी

चीनची दुटप्पी चाल

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आपली लष्करी ताकद वाढवून चीन भारतावर दबाव आणू पाहत आहे. भारताची अमेरिकेशी असलेली जवळीक चीनला आवडत नाही आणि भारताची प्रगती होत आहे, हेही त्यांना सहन होत नाही. भारतीय हद्दीतील मोठ्या भूभागावर चीनने आधीच अनधिकृत कब्जा केला आहे आणि हा कब्जा चीन आजतागायत सोडायला तयार नाही. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर व्यावहारिकद‍ृष्ट्या चीनचे वर्तन कसे वेगळे आहे, ही काही लपून राहिलेली बाब नव्हे. याचे ताजे उदाहरण इंडोनेशियातील बाली येथे सुरू असलेल्या जी-20 देशांच्या बैठकीत पाहायला मिळाले. तेथे भारत आणि चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची स्वतंत्रपणे बैठक झाली आणि त्यांनी सीमा विवाद सोडविण्याबाबत चर्चा केली. त्यावर चीनने सर्व प्रलंबित विवाद लवकरच निकाली काढण्याचे आश्‍वासन दिले. परंतु, दुसर्‍याच दिवशी लडाखमध्ये चिनी सैन्य आपल्या युद्धसामग्रीची कशी जमवाजमव करीत आहे, हे उघड झाले. चीनचे एक लढाऊ विमान भारतीय हवाई हद्दीच्या अगदी जवळून गेल्याचीही नोंद रडारवर झाली. जिथे दोन वर्षांपूर्वी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमक झाली होती, तोच हा भाग होय. साहजिकच भारतीय लष्कराने यावर तीव्र हरकत नोंदविली आहे. याखेरीज तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आपले पंतप्रधान गेले, त्यावरही चीनने आक्षेप घेतला. भारताबरोबर सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सद्भावना दाखविण्याची चीनची ही काही पहिलीच वेळ नाही; परंतु प्रत्यक्षात भारतीय जमिनीवर कब्जा करून चीन आपले विस्तारवादी धोरणच रेटताना दिसतो. सध्या चिनी सैन्य पूर्व लडाख प्रदेशात भारतीय सीमेजवळ एस-400 संरक्षण प्रणालीसह अत्याधुनिक लढाऊ विमाने आणि हवाई संरक्षण उपकरणांशी संबंधित सराव करीत आहेत. याआधी चीन तेथे मिग जातीच्या विम ानांची तैनाती करीत होता. मात्र, यावेळी त्यांनी अधिक मारक क्षमता असलेली लढाऊ विमाने तैनत केली आहेत. दोन डझनहून अधिक चिनी लढाऊ विमाने तैनात असल्याचे सांगण्यात येत  आहे. ते त्यांचे होटन आणि गुंसा हे दोन हवाई तळ अत्याधुनिक लष्करी उपकरणांनी सज्ज करीत आहेत. वस्तुतः सरावाच्या नावाखाली त्यांचे सैनिक आधीपासूनच भारतीय हद्दीत तळ ठोकतात आणि तीव्र हरकत नोंदविल्यावर आपल्या हद्दीत परततात. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून भारतीय सीमेवर ज्या प्रकारे चीन आपली ताकद वाढविताना दिसत आहे, त्यावरून चीनचा हेतू स्पष्ट होतो. चीनने रस्ते आणि पूल बांधले आहेत आणि लडाख प्रदेशातील हवाई पट्टी अपग्रेड केली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आपली लष्करी ताकद वाढवून चीन भारतावर दबाव आणू पाहत आहे. भारत बराच काळ चीनच्या नजरेत खटकत आहे. भारताची अमेरिकेशी असलेली जवळीक चीनला आवडत नाही आणि भारताची प्रगती होत आहे, हेही त्यांना सहन होत नाही. भारतीय हद्दीतील मोठ्या भूभागावर चीनने आधीच अनधिकृत कब्जा केला आहे आणि हा कब्जा चीन आजतागायत सोडायला तयार नाही. एवढे करूनही न थांबता अरुणाचल प्रदेश आणि लडाखमध्ये जमवाजमव वाढवून लष्करीद‍ृष्ट्या भारताला धमकावण्याचा प्रयत्न चीन करीत
आहे. या रणनीतीअंतर्गत चीनने पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ आणि श्रीलंका यांना आपल्या बाजूला वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय लष्कराने चीनचे मनसुबे नेहमीच उधळून लावले आहेत. लडाख भागात तैनात असलेल्या भारतीय लष्कराने त्या भागात हवाई दलाची ताकद वाढविण्याचे चीनचे डावपेच कुचकामी ठरविले आहेत. ताज्या घटनांवर आक्षेप नोंदवून भारतीय लष्कराने असे बजावले आहे की, चीनच्या अशा हालचाली अजिबात खपवून घेतल्या जाणार नाहीत
– मिलिंद सोलापूरकर

Back to top button