लवंगी मिरची : बाळ माझं गुटगुटीत! | पुढारी

लवंगी मिरची : बाळ माझं गुटगुटीत!

आई, राहुल्या किती रडतोय गं? त्याला गप्प बसव ना. दे एखादं बिस्कीट त्याला!
सकाळपासून बिस्किटाचा आख्खा पुडा उडवलाय त्याने!
जाऊ दे गं! बिस्किटं स्वस्त आहेत.
अरे पण, खिशाला परवडलं म्हणजे शरीराला परवडेलच असं नाही ना?
नाही तर फोन करून त्याच्या आईलाच विचार.
ती म्हणणार, त्याला वेफर्स द्या, नाहीतर बॉबी तळून द्या.
तो या खाऊने गप्प राहात असेल!
म्हणून तर बरण्या भरून बॉबी विकत आणून ठेवते ती.
माल आहे ना घरात? मग, द्यायला तुझं काय जातं एवढं?
माझं नाही चिरंजीव, तुमच्या चिरंजीवांचं जातंय.
चांगला टग्या झालाय की तो!
तोच तर वांधा आहे ना?
मूल गुटगुटीत झालंय हा वांधा कसा ग आई?
अरे, गुटगुटीत कशानं? पक्‍का फोपश्या झालाय तो. आताच कसली ढेरी वाढलीये त्याची.
वाढू दे. खात्यापित्या घरात जन्म घेतलाय त्याने, करू दे चैन!
असं आजकालचे तरुण पालक म्हणता म्हणून ही वेळ आलीये आपल्यावर! गलेलठ्ठ मुलांचा देश असं म्हणवून घ्यायची.
असं कोण म्हणतं?
उगाच म्हणत नाहीये कोणी. पुराव्याने सिद्धच झालंय.
आज हे काय सुचलं तुला आई?
जुलै महिन्याचा पहिला आठवडा मुलांमधला लठ्ठपणा जागृती सप्ताह म्हणून जाहीर झालाय ना!
लठ्ठपणा काय, सहज डोळ्यांना दिसतोच की! त्याच्यासाठी जागृती सप्ताह घ्यायची काय गरज?
आहे. चाईल्ड ओबेसिटी अवेअरनेस वीक आहे हा. त्याबाबत जनजागरण सुरू आहे.
मग, तू बस जागरण करत.
मुद्दा लक्षात घे. मुलांच्या लठ्ठपणाच्या क्रमवारीत जगात आपला देश दुसर्‍या क्रमांकावर पोहोचलाय. चीन पहिला आलाय. भारतात सुमारे दीड कोटी मुलं लठ्ठपणाने ग्रासलेली आहेत.
तू म्हणजे, हा एखादा आजार असल्यासारखंच सांगत्येस.
आहेच! अवास्तव लठ्ठपणा हा आजारच. अशा गुबगुबीत मुलांना मधुमेह, रक्‍तदाब, सांधेदुखी असे आजार चटकन जडतात.
आम्ही लहान असताना सगळे आम्हाला ‘काडी पैलवान’, सुका बोंबील म्हणायचात. आता राहुल्यासारख्यांच्या चांगलं अंगी लागतंय तरी तक्रार?
हे अंगी लागणं नव्हे, बाळसंही नव्हे, ही तर सूज एकप्रकारची.
मग, आमच्यासारख्यांनी काय करावं?
ऊठसूट पाव-बिस्किटं, बॉब्या चारू नये पोरांना.
मग काय त्यांना रडत ठेवाव?
चार दिवस करतील हट्ट, मग विसरतील.
आणि उपाशी राहतील त्याचं काय?
उपाशी कशानं? लाडू, चिवडा, धिरडी, थालिपीठं, भडंग, शंकरपाळी यावरच वाढलात ना तुम्ही?
आता बायका कामावर जातात आई, त्यांना वेळ नसतो.
म्हणून काय पोरांच्या तब्येतीचं नुकसान करणार? वेळ काढा म्हणावं थोडा.
पोरांनाही आताशा घरचं नको असतं आई. वडा-पाव, पिझ्झा, केक हवा, हॉटेलात न्या म्हणून डोकी खातात ती!
तसलं खातात आणि दिवसभर हातात फोन धरून बसतात! ना घरात कामाला मदत, ना बाहेर जाऊन मैदानी खेळ खेळणं. म्हणजे अंगं फुगणारच! कष्टाची कामं करायलाच नकोत कोणाला.जाऊ दे गं, त्यांचे लाडाचे दिवस थोडेच असणार.
पण, भलते लाड अंगाशीच येणार. आमचं बाळ कसं गुटगुटीत, हे म्हणणं सोडा आणि मुलांना मस्तपैकी काटक तब्येतीची बनवा.
बरं!

– झटका

Back to top button