शिकू आनंदे! | पुढारी

शिकू आनंदे!

आज शाळेत काय शिकवलं रे?
आज किनई आमच्या शाळेत अभिव्यक्ती होती आजोबा.
कशाची अभिव्यक्ती?
माहीत नाही; पण आता दर शनिवारी अभिव्यक्ती असणारे.
कोण म्हणतं?
शिक्षण विभागाने ठरवलंय म्हणे तसं!
कालपरवा काहीतरी वेगळं सांगत होतास ना?
काल कृती होती.
मग, रोज काही कृती नसते का?
यावर्षी गुरुवार, शुक्रवारी कृती व्हायला पायजेले.
मग, बुधवारी काय होतं?
गोष्ट सांगणे.
आता फक्त सोमवारच उरला. सोमवारी काय केलंत पंडितजी?
सोमवारी सजगता होती.
फक्त सोमवारी सजगता? आठवड्यातला एकच दिवस?
हो.
मग, एरव्ही काय मुलांनी वर्गात झोपाबिपा काढायच्या काय?
माहीत नाही, मास्तर म्हणलेले, आता दर सोमवारी वर्गात सजगता घ्यायची म्हणजे घ्यायचीच. वरून आर्डर आलीये तशी!
सजगता काय, कृती काय, अभिव्यक्ती काय!
तुझी अक्कल अगदी घोड्यापुढं धावतेय रे शंभ्या!
आजोबा, आता आनंददायी शिक्षण मिळणार आहे ना आम्हाला? शालेय शिक्षण विभागाचा निर्णय आहे तो!
मग, याच्या आधीचं शिक्षण काय दुःखदायी होतं का रे?
होतं थोडंसं; पण त्यातल्या त्यात मी तिसर्‍या बाकावरच्या सावनी कस्तुरेकडे बघत बसलो ना आजोबा, की आनंद मिळायचा.
अरे गुलामा, तू तर अगदी बापाच्या वळणावर गेलास. पण मला सांग, हे कृती, अभिव्यक्ती वगैरे आधी काहीच नव्हतं का शाळेत?
नो आयडिया आजोबा. आता राज्यभर हा उपक्रम राबवायचाय असं सांगितलं शाळेत.
कुठून एकेक आयडियाच्या कल्पना काढतात कोण जाणे?
गेल्या वर्षी भोर तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर राबवलेली म्हणे ही आयडिया, आनंदी शिक्षणाची! तिकडे म्हणे ती जामच डेंजर यशस्वी झाली म्हणून आता राज्यभर तिचा दंगा सुरू करायचाय!
असेल बुवा. आनंदी आनंदच म्हणायचा सगळा!
तुमच्यावेळी नव्हता का असा?
नाही, असा नव्हता, तरीपण शिक्षणात आनंद होता.
तो कुठून यायचा?
नात्यांमधून.
त्यातपण काके, मामे, मावश्या घुसडताय की काय आता?
नाहीरे, नातं म्हणजे गुरू-शिष्याचं नातं.
ते काय असतं?
एवढी वर्षे शाळेत जातोयस, तरी तुला ते नातं माहीत नाही ना?
मग तुम्ही सांगा.
अरे बाबा, जीव तोडून शिकवणारा शिक्षक आणि मन लावून शिकणारी मुलं असली ना की, आपोआपच त्यांचं गोड नातं तयार होतं. त्यातल्या आनंदासारखा दुसरा आनंद नसतो बरं जगात.
मी ट्राय मारू त्या आनंदासाठी?
ट्राय नको मारूस, प्रयत्न कर. तू गुरुपुष्य योग ऐकलायस ना? तसाच छानसा गुरू-शिष्य योग तुझ्या आयुष्यात येवो, हा आशीर्वाद!

Back to top button