धोका सायबर हल्ल्यांचा! | पुढारी

धोका सायबर हल्ल्यांचा!

सायबर हल्ले हे डिजिटल युगात नेटवर्क घुसखोरी करण्यासाठी वापरले जाणारे तंत्र आहे. हॅकर्स सिस्टिम आणि त्यातील डेटावर नियंत्रण मिळविण्यासाठी अनैतिक मार्गांचा वापर करतात. हल्लेखोर सुरक्षित सिस्टिमवर हल्ला करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मॅलिसस कोडचा आधार घेतात.

भारतासारख्या जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशावर सायबर हल्ल्याचा धोका वाढला आहे. पाकिस्तान, चीन आणि उत्तर कोरियामध्ये बसलेले हॅकर्स भारतात सायबर हल्ले करण्याच्या प्रयत्नात आहेत. भारताची वाहतूक व्यवस्था, अणुऊर्जा केंद्र, भारताची सुरक्षा व्यवस्था, आरोग्य, विमा क्षेत्र हे हॅकर्सचे लक्ष्य आहे. नुकत्याच झालेल्या सायबर सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा या परिषदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली होती. ते म्हणाले की, ज्या देशांना भारत सुरक्षित आहे हे पाहवत नाही, ते देशावर विविध प्रकारचे सायबर हल्ले करतात आणि काही देशांनी सायबर आर्मीही बनवली आहे. देशाच्या गृहमंत्र्यांनी अशा प्रकारे एखाद्या विषयावर चिंता व्यक्त करणे म्हणजे नक्कीच ती चिंतेची, चिंतनाची आणि विचारमंथनाची बाब आहे. या सार्‍याचा अर्थ एकच की, भारताच्या अंतर्गत सुरक्षिततेवर सायबर हल्ल्याचा धोका आहे.

इंटेलिजन्स ब्युरोने गेल्या वर्षी आपल्या थ्रेट इंटेलिजन्स अहवालात नमूद केले होते की, 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरदरम्यान देशातील महत्त्वाच्या भागांत स्थापित संगणक हॅक करण्याचा कट आहे. आज हा सायबर हल्ला राष्ट्रीय सुरक्षेसाठी सर्वांत मोठे आव्हान बनला आहे. आज इंटरनेट हे आपल्या जीवनातील एक महत्त्वाचे साधन बनले आहे. विशेषतः जागतिक महामारीच्या आगमनानंतर ती मानवी जीवनासाठी मूलभूत सेवा बनली आहे. मात्र, इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे सायबर हल्ल्याचा धोका वाढला आहे, हेही खरे आहे. किंबहुना त्यामुळे हल्लेखोरांना ग्राहकांवर सायबर हल्ले करणे सोपे झाले आहे, असेही म्हणता येईल.

संबंधित बातम्या

भारत हा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा इंटरनेट वापरणारा देश आहे. एकूण लोकसंख्येपैकी 41 टक्के लोक इंटरनेट वापरतात. डेटा आणि वापरकर्त्यांच्या संख्येच्या बाबतीत हे विश्‍व दिवसेंदिवस विस्तारत आहे. याशिवाय संरक्षणापासून ते पायाभूत सुविधांपर्यंत प्रत्येक क्षेत्रात त्याचा वापर केला जातो.

सायबर हल्ले हे डिजिटल युगात नेटवर्क घुसखोरी करण्यासाठी वापरले जाणारे तंत्र आहे. ज्याप्रमाणे एखाद्या प्रदेशावर कब्जा करण्यासाठी लढाया केल्या जातात, त्याचप्रमाणे सायबर स्पेसमध्ये घुसखोरी केली जाते. हॅकर्स सिस्टिम आणि त्यातील डेटावर नियंत्रण मिळविण्यासाठी अनैतिक मार्गांचा वापर करतात. हल्लेखोर सुरक्षित सिस्टिमवर हल्ला करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मॅलिसस कोडचा आधार घेतात. सायबर सुरक्षिततेवर अनेक प्रकारे हल्ले केले जाऊ शकतात. हे मालवेअर, फिशिंग हल्ला, डिनायल ऑफ सर्व्हिस, मॅन इन द मिडल अशा अनेक मार्गांनी केले जाऊ शकतात. याचा वापर सिस्टिम हॅक करण्यासाठी, क्रिप्टोकरन्सीच्या स्वरूपात पैशांची मागणी करण्यासाठी किंवा डार्क वेबवर डेटा विकण्यासाठी केला जातो.

अशा हल्ल्यांमध्ये वापरकर्त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेली संवेदनशील आणि महत्त्वाची माहिती कोणत्याही वेबसाईट किंवा वापरकर्त्यांच्या माहितीशिवाय हायजॅक केली जाऊ शकते. त्यामुळे आपली वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ शकते. वीजपुरवठा खंडित होऊ शकतो किंवा दहशतवादी किंवा हल्लेखोरांच्या इच्छेनुसार आण्विक केंद्र चालविले जाऊन देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. सिस्टिम किंवा डेटावरील हल्ले नवीन नाहीत; मात्र कोरोनाच्या जागतिक महामारीनंतर वर्क फ्रॉम होम संस्कृती उदयास आली आहे आणि त्यामुळे सायबर हल्ल्याचा धोका वाढला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

– गणेश काळे,
संगणकतज्ज्ञ

Back to top button