ई ही कसली सेवा? | पुढारी

ई ही कसली सेवा?

झाला पोराचा प्रवेश अर्ज भरून?
होईल लवकरच.
कधी होईल?

लवकरच होईल बहुतेक.
हे मी केव्हाचंच ऐकतोय.
काय करणार? प्रवेशासाठी नेसेसरी डॉक्युमेंट्स मिळायला हवीत ना?
आधीच गोळा करायची होतीत.
आधी म्हणजे कधी?
बारावीचा निकाल लागण्याआधी.
तेव्हा पोराला बजावलंच होतं मी.

पण त्याने काही केलं नाही, असंच ना? आजकालची पोरं अशीच! बेजबाबदार! ह्यांची कामं आईबापांनी करायची, हे शहजादे नुसते उंडारणार!
एरवी असंच असतं; पण ह्यावेळेला पोरापेक्षा सर्व्हरचा प्रॉब्लेम जास्त आहे.
हो खरंच की! आता ते महा ई सेवा की काहीतरी पुरवतं ना वेगवेगळी प्रमाणपत्रं?
महा आयटी विभागाचं सेतू केंद्र! महाउपद्रवी केंद्र आहे ते.
वैतागलायत?

संबंधित बातम्या

नाही. आरतीचं तबक घेऊन उभा आहे त्याच्यासमोर.
महाआरतीचा प्लॅन दिसतोय.
काय सांगायचं आता? सरकारी परवाने, उत्पन्न दाखला, रहिवास प्रमाणपत्र, जातीचा दाखला, नागरिकत्व प्रमाणपत्रं असे एकूण 42 दाखले ऑनलाईन मिळतात म्हणे तिथे.
अरे वा! एकेक बटण दाबलं की टपाटप एकेक दाखला पुढ्यात येऊन पडणार. कसली भारी सेवा दिलीये ना महाराष्ट्र सरकारने?
म्हणजे इरादा होता तसा. सर्वांच्या सोयीसाठी ई सेवा केंद्र चालवण्याचा; पण प्रत्यक्षात अनुभव असे येताहेत की आम्ही पालक म्हणतोय, ई ही कसली सेवा?
तुम्हाला बटणं दाबणंही जमेना का आता?
ती धड दाबली कुठे जाताहेत राव?
म्हणजे?

म्हणजे कोणत्याही क्षणी समोर येतो तो फक्‍त तांत्रिक बिघाड. सेवा ठप्प.
हात्तिच्या! ऐनवेळी मान टाकलीच का बेण्यानं? हजारो-लाखो विद्यार्थी, पालक तुटून पडत असणार त्याच्यावर. त्या ओझ्यानं गुदमरतंय बिचारं.

आता आपल्या राज्यात किती पोरं दहावी, बारावीला बसतात हे काय ह्यांना माहीत नाही का? तेवढ्यांची सोय करायची क्षमता ठेवायला हवीच होती. ऐन वेळेला ‘बोजा वाढला’, ‘बोजा वाढला’ म्हणून ओरड करण्यात काय अर्थ आहे?
यंत्रं आहेत म्हटल्यावर ती एखाददा कधी बिघडायचीच की नाही?
एखाददा कुठलं आलंय? दरवर्षी हेच नाटक. ज्या साईटवर निकाल जाहीर होणार ती क्रॅश होते. जिथे अर्ज भरायचे ती हँग होते. प्रमाणपत्रं तांत्रिक बिघाडामध्ये अडकतात!

आणि विद्यार्थी आणि पालक लटकतात.
तिकडून फक्‍त आश्‍वासनं येतात. उद्या दुरुस्त होईल, परवा दुरुस्त होईल, की त्या दिवशी पुन्हा लाखोंची झुंबड त्या साईट्सवर.
मग तुमचं म्हणणं काय आहे? पूर्वीसारख्या प्रमाणपत्रांच्या पिवळट गुंडाळ्या किंवा फायलींची ओझी घेऊन फिरणंच बरं पडायचं?
नाही. तेवढं नाही अगदी; पण आधुनिकता हवी असेल तर तिची पूर्वतयारी पण तेवढीच असायला हवी. अर्धवट आधुनिकता फक्‍त गोंधळ

वाढवते. सेवा ई असो की ती, कामांची गती खंडित होता कामा नये. चलू मी?
कुठे?
बघतो परत साईटवर जाऊन. काम होतं की, उद्याचा वायदा मिळतो ते!

Back to top button