ठाकरेंशिवाय शिवसेना म्हणजे शिंदेशाही? | पुढारी

ठाकरेंशिवाय शिवसेना म्हणजे शिंदेशाही?

एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद हिसकावून घेत ठाकरे मुख्यमंत्री झाले. ही नोंद ठसठसत राहिली आणि शेवटी बेंड फुटले. ही नवी कहाणी आता शिंदे यांनी उघड केली. ती लिहिली गेली, सांगितली गेली की, तीच वस्तुस्थिती आहे हे कळण्याचे कारण नाही. शिंदे यांनी त्यांच्या कानडी कारावासाची जी कहाणी भुजबळांच्या बंडाशी जोडली, ती अचंबित करणारी आहे. शिंदेशाहीने विश्‍वासदर्शक ठराव जिंकला. ते अपेक्षितच होते. मात्र, विश्‍वासदर्शक ठरावावर झालेल्या भाषणांमध्ये जे बंडखोरीचे तत्त्वज्ञान सांगितले गेले त्यावरून शिंदे गटाची पुढची दिशा कोणती असेल याचा अंदाज महाराष्ट्राला आला. या बंडखोरांना सत्ता देणारी शिवसेना हवी आहे आणि ठाकरे मात्र नकोत. ‘ठाकरेवजा शिवसेना’ प्रस्थापित करण्याच्या दिशेनेच शिंदे गटाची वाटचाल आता सुरू झाली आहे.

ठाकरेंशिवाय बंडखोरांचे सरकार चालेल. पूर्ण अडीच वर्षे चालेल. ‘मातोश्री’ची लुडबूड नाही, रिमोट कंट्रोलचा त्रास नाही. सत्तेतून घरी आणि घरून सत्तेत, वाट वाकडी करून ‘मातोश्री’वर गेलेच पाहिजे ही सक्‍ती नाही. या सुखाच्या शोधात बंडखोर कधीपासून होते आणि भाजप नेत्यांनी त्यांच्या हाती सुरत व्हाया गुवाहाटीमार्गे या सत्तासुखाचा पत्ता ठेवला. या पत्त्यावर पोहोचल्याचे समाधान प्रत्येक बंडखोराच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहते आहे. सत्तेचा सोपान गवसल्यानंतर विश्‍वासदर्शक ठरावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले भाषण आक्रमक होते. त्यांनी उद्धव ठाकरेंचे नाव घेतले नाही. ते नावही घेत नाहीत. ते फक्‍त शिवसेनेचे नाव घेतात. कारण, ‘शिवसेना’ या चार अक्षरांशिवाय सत्ता नाही आणि मिळालेल्या सत्तेचा टिकाव लागणे केवळ अशक्य, हे शिंदे यांना कळून चुकले आहे. त्यांच्या सोबतच्या अनुभवी आमदारांनाही या चाराक्षरी सत्तेची नीट जाणीव आहे. शिवसेना नावाचा परिसस्पर्श झाला म्हणूनच ही कुठल्या कुठल्या कोपर्‍यातील मंडळी एकदा नव्हे, तीनवेळा, चारवेळा आणि काही तर पाचवेळा आमदार झाली. त्यामुळे प्रत्येक बंडखोर आपल्या बंडाचे तत्त्वज्ञान सांगताना शिवसेनेची आरती ओवाळतो आणि ठाकरेंना शिव्या घालताना दिसतो.

महाविकास आघाडीसोबत शिवसेना अक्षरश: बुडणार होती, खुद्द उद्धव ठाकरेच शिवसेनेचे राजकीय विसर्जन करण्यास निघाले होते आणि ठाकरेंच्या या हाराकिरीतून शिवसेनेला वाचवण्यासाठी आम्हाला बंडाचे निशाण फडकवावे लागले, असा या बंडखोरांचा सूर आहे. मुख्यमंत्री शिंदेही विधानसभेत म्हणाले, लढून शहीद झालो तरी चालेल; पण माघार नाही. शिवसेना वाचविण्यासाठी प्रयत्न करायचे, हे ठरले आणि बंड केले. आम्हाला गद्दार म्हटले गेले; पण आम्ही कालही शिवसैनिक होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू. शिवसेनेला मी कुटुंब मानतो… पण कालपर्यंत या शिवसेनेचे कुटुंबप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते. वारसाहक्‍काने उद्धव ठाकरे हे आजचे कुटुंबप्रमुख. शिवसेनेचे कारभारीपण त्यांच्या हाती नको, आम्ही ठाकरेंना शिवसेनेचा कारभारी मानत नाही, इतकेच सांगायचे शिंदे यांनी बाकी ठेवलेले दिसते. ठाकरे यांना वजा करून काखोटीला बांधलेली शिवसेना घेऊन शिंदे भारतीय जनता पक्षाला जाऊन मिळाले ते शिवसेना वाचविण्यासाठीच. याच शिवसेनेला भाजपच्या तावडीतून वाचवा, अशी हाक देत याच एकनाथ शिंदेंनी भर सभेत उद्धव ठाकरेंच्या हाती मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते.

संबंधित बातम्या

मात्र, शिंदे यांच्या बंडाने एकाच वेळी दोन सूड घेतलेले दिसतात. एक म्हणजे, फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदावरून खाली खेचून उपमुख्यमंत्रिपदी बसण्यास भाग पाडले आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्याशी फंदफितुरी करून मिळवलेले, बळकावलेले मुख्यमंत्रिपद हिसकावून घेतले. त्यांना पायउतार होण्यास भाग पाडले. उद्धव यांच्या या फितुरीचा उल्‍लेख शिंदे यांनी विधानसभेत त्यांचे नाव न घेता केला. शिंदे म्हणाले, 2019 ला मलाच मुख्यमंत्री करणार होते ही वस्तुस्थिती आहे. मात्र, महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा आणि त्यातही अजित पवारांचा विरोध असल्याचे आम्हाला सांगितले गेले आणि ठाकरे मुख्यमंत्री झाले. नंतर अजित पवारांनीच शिंदेंकडे खुलासा केला की, हा अपघातच होता. तुम्हाला आमचा विरोध असण्याचे कारणच नव्हते… शिंदे यांच्या या कथनाने बंडखोरीचे मोठे कारण उघड झाले. शिवसेना, शिवसेनेचे अस्तित्व, शिवसेनेचे हिंदुत्व सब झूठ.

शिंदे यांना मुख्यमंत्री करायचे ठरल्यानंतर स्वत: उद्धव ठाकरे पदावर विराजमान झाले. आणि तोच शिंदे यांच्यासाठी मोठा धक्‍का होता. ठाकरेंनी दिलेला हा धोका विधानसभेत शिंदे यांनी कथन केला तेव्हा स्वत: अजित पवारही ऐकत होते. त्यावर ना त्यांनी हस्तक्षेप करून खुलासा केला, ना सभागृहाबाहेर येऊन काही वेगळी वस्तुस्थिती सांगितली. शिंदे यांनी कथन केेलेली गमावलेल्या मुख्यमंत्रिपदाची कहाणी सभागृहाच्या अभिलेखावर नोंदवली गेली. शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद हिसकावून घेत ठाकरे मुख्यमंत्री झाले, अशी ही नोंद ठसठसत राहिली आणि शेवटी बेंड फुटले. महाविकास आघाडीतील सरकार सत्तेवर आले तेव्हा उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे, असा शरद पवार आणि सोनिया गांधींचा आग्रह होता, इतकीच नोंद आतापर्यंत ज्ञात होती. शिंदे यांनी नवी कहाणी समोर आणली. बंडखोरीचे तत्त्वज्ञान प्रस्थापित करण्यासाठी ती लिहिली गेली, सांगितली गेली की, तीच वस्तुस्थिती आहे हे कळण्याचे कारण नाही; पण बंडखोरीचे म्हणून एक तत्त्वज्ञान असते. त्यात स्वत:च्या गुन्ह्यालाच न्याय म्हणून सिद्ध करण्याचा भाग मोठा असतो.

बंडखोरीचे गुन्हेगार स्वत:च्या निर्दोष असण्याचे भक्‍कम पुरावे बाळगून असतात आणि त्यासाठी इतिहासाचे पर्वदेखील उलट-सुलट करून टाकतात. शिंदे यांनी त्यांच्या कानडी कारावासाची जी कहाणी भुजबळांच्या बंडाशी जोडली ती अचंबित करणारी आहे. छगन भुजबळांच्या बंडामुळे आम्हाला कारावास कसा घडला हे सांगताना शिंदे म्हणाले, भुजबळांनी बंड केले तेव्हा ते कर्नाटकात वेश बदलून राहत होते. आम्हाला बाळासाहेबांनी कर्नाटक मोहिमेवर पाठवले. शंभर शिवसैनिकांसह आम्ही कर्नाटक गाठले. तिथल्या लोकांनी आम्हाला मारहाण केली. तुरुंगात डांबले. चाळीस दिवस तुरुंगात होतो. बाळासाहेबांनी प्रत्येकी एक लाख रुपये असे एक कोटी रुपये भरून आम्हाला सोडवले…

शिवसेनेच्या बंडाचा इतिहास जागवताना गडबड झाली. शिंदे यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नाच्या लढ्यात कारावास घडला, असे त्यांचा परिचय सांगतो. तुरुंगवासाचा हा काळ 1986 चा. भुजबळांचे बंड हे त्यानंतरचे म्हणजे 1991 चे. अठरा आमदार घेऊन ते सेनेतून फुटले; पण ते महाराष्ट्र सोडून कुठेही गेले नव्हते. महाराष्ट्रातच होते आणि शिवसैनिक त्यांना शोधत होते. शिवसेनाप्रमुखांचा दराराच असा की, फुटलेल्यांपैकी बारा आमदार शिवसेनेकडे परत गेले. सहा भुजबळांसोबत काँग्रेसवासी झाले. राजकीय क्षितिजावर आज त्यांपैकी फक्‍त भुजबळ दिसतात!

Back to top button