काय हॉटेल, काय आठ लाख, काय छप्पन्‍न लाख! | पुढारी

काय हॉटेल, काय आठ लाख, काय छप्पन्‍न लाख!

ऐकलं ते खरं का हो आबुराव?
काय आईकलंत एवढं?
रोजचा आठ लाख खर्च होता म्हणे?
शक्य आहे.
सात दिवसांचे तब्बल छप्पन्‍न लाख?
होऊ शकतात.
आलिशान हॉटेलातल्या सत्तर खोल्या एवढ्याला पडतील?
आपल्याला कुठून कळायला बसलंय बाबुराव? अहो, आपण फार तर गावाकडच्या ‘गेलीशान’ हॉटेलात राहाणारी माणसं. आपल्याला आलिशान हॉटेल कुठलं दिसायला?
ते काय बुवा, बंडखोर! बंडखोरांसाठी निदान तेवढंतरी हवंच की! नाही तर हॉटेलात शान नाही म्हणून ते नवं बंड पुकारायचे!
पण, गुवाहाटी काय एवढं मोठ्ठं, महागडं शहर आहे का?
कदाचित शहरानेही बंड केलं असेल. मला महानगराचा मान द्या म्हणून. काय आहे, बंड केलं की, फायदा होतो हे एकदा पसरलंय ना सगळीकडे!
पण, काय हो? मला एक सांगा, बंड म्हणजे खळबळ, अस्वस्थता, सारख्या चर्चा, गदारोळ उलथापालथी सुरू असणार नाही का?
असायला पाहिजेत खरं म्हणजे; पण असं का विचारताय?
मला आपलं वाटतंय की, खरंच एवढी अस्वस्थता असेल, तर चैन करणं, आडवंतिडवं खाणंपिणं सुचणार नाही एखाद्याला.
खाण्याची गोष्ट वेगळी; पण पिणं केव्हाही सुचू शकतं बर्का काहींना!
1857 च्या बंडाच्या काळात मीरत किंवा झाशीमध्ये एखाद्या रॅडिसनसारख्या हॉटेलात राहिले असतील का हो आपले सैनिक?
छे हो! तेव्हा कुठे असणार हॉटेलं, फोन, ई-मेल, छानछोकीत जगणं वगैरे. कोण मेले, कोण जगले हेसुद्धा कळलं नसेल खूप काळ घरच्यांना.
आता रॅडिसनवरून घरोघरी व्हॉटस्अ‍ॅप, ट्विटरचे मेसेजेस जायचे म्हणे. ‘पनीर पसंत पडले नाही.’ किंवा ‘इथल्यासारखा चिली गार्लिक टोस्ट तू कधी करायला शिकशील?’ अशा मजकुराचे.
बंडात झालं तरी पोट थंड थोडंच राहतं माणसाचं?
तरीसुद्धा रोजचे आठ लाख फार वाटतात नाही? बंडाचा पण काहीतरी टी.ए., डी.ए. असेल ना ठरलेला?
बाबुराव, असं करा, तुम्ही एकदा एखादं बंड करून बघाच. मग, तुम्हाला त्याच्या सगळ्या अटी, नियम, अलावन्सेस, पर्क्विझिटस् वगैरे बारकाव्याने कळेल.
मला त्यांची काळजी नाहीये हो! एवढाली बिलं भरतो कोण, हा प्रश्‍न पडतोय.
मी भरत नाही, तुम्हाला भरायला सांगत नाही, मग झालं ना?
तरी पण? विचारलं की प्रत्येक पक्ष हात वर करणार. ‘आम्ही नै’ ‘आम्ही नै’ म्हणणार. शेवटी रॅडिसनवाल्यांची धर्मादाय खाणावळ असेल तरच जमणार ना हे?
बंड करायला आधी कशाशी तरी निष्ठा असायला हवी ना! आपण सामान्य माणसं. आपली निष्ठा फार तर आपल्या रोजच्या जगण्याशी.
मग, त्यांची तरी आणखी कशाशी होती तुमच्या मते?
पक्षाशी, नेत्यांशी, विचारांशी वगैरे असेलच ना?
ते उगाच आपलं सांगण्यापुरतं. एरव्ही, इतक्या वर्षांची नाती इतक्या मिनिटांत तोंडताना केवढं गलबलायला हवं एखाद्याच्या पोटात? क्षणभर तरी पाऊल अडखळायला हवं एखाद्याचं? तसं कुठे काही झालं का?
मग या सगळ्यांची निष्ठा होती तरी कशाशी?
सोपं आहे. सगळ्यांची निष्ठा सुरुवातीला आणि शेवटीही फक्‍त चैनीशी हो! चैनबाजीपुढे काय आठ लाख, काय छप्पन्‍न लाख, काय हॉटेल? जो तो फक्‍त लागेल तेवढं लाटेल!

Back to top button