आपापला योगदिन! | पुढारी

आपापला योगदिन!

मग काय आबुराव? योगदिन कसा साजरा केलात यंदाचा?
काय म्हणता? योगदिन येऊन गेला? कधी?
अहो, असं काय करता? परवाच नव्हता का आंतरराष्ट्रीय योग दिन?
परवा? कधी परवा?

त्या दिवशी आपल्याकडे राजकीय सर्कसचा पहिला खेळ सुरू झाला तेव्हा? कसलीकसली आसनं घालून दाखवली आपल्या नेत्यांनी तेव्हा? पलायनासन, रेडी का? आसन, साईसुट्ट्यो आसन, गायब आसन, वगैरे, वगैरे!
वाचतोय मीपण जमेल तिथलं.
म्हणून म्हटलं. योगासनं घालण्यासाठी त्यांच्यापासून प्रेरणा घेतलीत की नाही थोडीतरी?
नाही हो! आपल्याला कुठलं एवढं झेपायला?

मग केलंत काय त्यादिवशी? नेहमीचं लाडकं शवासन घालून लोळत पडला होतात का काही वेगळं आसन घातलंत?
चिकाटी आसन घालून बसलो होतो खूप वेळ टी.व्ही.समोर.
चिकाटी आसन?
हो ना! सकाळपासून सुरू झालेल्या चर्चा अगदी रात्रीही सुरूच होत्या. सारखी एकावर एक ब्रेकिंग न्यूज येणार. मानापमानाची दर्शनं घडणार. ती तर वेगळीच मज्जा! ज्यांना चुकूनही, कोणीही, कणानेही, कधीही मान देत नव्हतं तेही अपमान, अपमान म्हणून कोकलत फिरायला लागल्यावर आपण काय करणार होतो?

संबंधित बातम्या

तो त्यांचा जुनाट रोग आणि आपला भोग झाला. तुम्ही योगाचं काय केलंत ते सांगा.
आश्‍चर्यात बुडून बघत बसलो. तुम्हीच विचार करा. एवढं बंड होतं आणि सत्तेवरल्यांना त्याची साधी कुणकुणही लागत नाही? पोलिस, गुप्तहेर वगैरे शवासनात झोपलेले असतात का आपल्याकडे?
ते वारीत गर्क असणार हो त्या काळात.
असं म्हणता? असेल. त्यांना बहुधा विठोबानेच कामाला लावलं असेल.
विठ्ठलाचं काय काम असणार त्यांच्याकडे?

मला वाटतं, मुळात यंदा विठुरायालाच गंभीर प्रश्‍न पडला असेल ना, की बुवा यंदाची आपली महापूजा नेमकी कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या हातून होणार?
तोच तर सगळ्याचा कर्ता करविता आहे. कोणीही मुख्यमंत्री झाला तरी त्याने आपल्या पक्षाचं, पक्षातल्या लोकांचं भलं पाहायला हवं हे तो आधी मनावर बिंबवेल बघा. नाहीतर केवळ आपल्या पक्षाकडे मुख्यमंत्रिपद आलंय ह्यात मश्गुल राहिलं की कसं होतं हे दाखवून दिलंच आहे त्याने.
तो त्याचा दृष्टान्तयोग!

म्हणजे यंदाचा आंतरराष्ट्रीय योगदिन माणसांपासूम देवापर्यंत प्रत्येकाने आपापल्या परीने साजरा केला म्हणाकी.
केलाच म्हणायचा; पण महाराष्ट्र राज्याला मात्र आता एकाच योगाची खरी प्रतीक्षा आहे.
कोणत्या म्हणे?

स्थिरसरकार योगाची. टक्केवारीचं, अडीच-अडीच वर्षांच्या वाटणीचं, तरंगतं, लोकांनाच टाळणारं असं सरकार पुरत नाही आपल्या राज्याला. तेव्हा विठुराया, आमच्या झोळीत ‘स्थिर समर्थ सरकार योग’ घालावा ही विनंती.

– झटका

Back to top button