राजस्थानातील सुंदोपसुंदी | पुढारी

राजस्थानातील सुंदोपसुंदी

राजस्थानमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. वसुंधराराजे काही महिन्यांपासून बंडाच्याच मूडमध्ये आहेत.

राजस्थानमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला केवळ एकच जागा मिळाली. भाजपच्या पाठिंब्यावर लढणारे अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांना पक्षाची संपूर्ण मते मिळू शकली नाहीत. परिणामी, त्यांचा पराभव झाला. चंद्रा यांना केवळ तीसच मते पडली, तर भाजपच्या विजेत्या उमेदवार घनश्याम तिवारी यांना 43 मते मिळाली. राजस्थानात भाजपचे 71 आमदार आहेत. राष्ट्रीय लोकशाही पक्षाच्या तीन आमदारांनी देखील सुभाष चंद्रा यांच्या बाजूने मतदान केले होते. याप्रमाणे भाजपच्या घनश्याम तिवारी यांना 41 मते मिळाल्यानंतर 34 मते राहतात. या हिशेबाने सुभाष चंद्रा यांना 34 मते मिळण्याची गरज होती. परंतु, त्यांच्या पारड्यात केवळ 30 मते पडली. भाजपच्या आमदार शोभाराणी कुशवाह यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना क्रॉस व्होटिंगमध्ये मताचे दान टाकले. त्याचवेळी पक्षाच्या अन्य दोन आमदारांनी देखील अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांना मत न देता पक्षाचे अधिकृत उमेदवार घनश्याम तिवारी यांना मतदान केले होते. भाजपने धौलपूरच्या आमदार शोभाराणी कुशवाह यांना बाहेरचा रस्ता दाखविला. त्याचवेळी दोन अन्य आमदारांविरोधात पक्षाला कोणतीही कारवाई करता आली नाही. पक्षातील एका बड्या नेत्याच्या इशार्‍यावर त्यांनी मतदान केल्याचे समजते.

राजस्थानातील भाजपचे प्रादेशिक नेतृत्व अंतर्गत कलहात अडकलेले आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे आणि प्रदेशाध्यक्ष डॉ. सतीश पुनिया यांचे एकमेकांविरोधात गट असल्याने राजस्थानात भाजपात दुफळी निर्माण झाली आहे. यामुळेच राज्यसभा निवडणुकीत 13 पैकी एकाही अपक्ष आमदाराचे मत सुभाष चंद्रा यांच्या बाजूने गेले नाही. याउपर वसुंधराराजे समर्थक शोभाराणी कुशवाह यांनी काँग्रेसच्या बाजूने क्रॉस व्होटिंग करत भाजपची फसगत केली. राज्यसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर वसुंधराराजे समर्थक डॉ. सतीश पुनिया यांची प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी करत आहेत. त्याचवेळी पुनिया समर्थकदेखील दबक्या आवाजात पराभवाचे खापर वसुंधराराजेंवर फोडत आहेत; पण वसुंधरा समर्थकांनी म्हटले की, राजस्थानात अपक्ष आमदारांची संख्या 13 आहे. माकपचे दोन, भारतीय ट्रायबल पार्टीचे दोन आणि राष्ट्रीय लोकदलचा एक आमदार आहे. याप्रमाणे 18 आमदार असे होते की, त्यांनी काँग्रेस आणि भाजप या दोन्हीपैकी एकाला पराभूत करून जिंकून आलेे होते. परंतु, काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी त्या सर्व 18 आमदारांशी समन्वय ठेवून राज्यसभेत मतदान सुरळीतपणे पार पाडले आणि काँग्रेसला विजय मिळवून दिला. भाजपच्या आमदार शोभाराणी कुशवाह यांनीदेखील गेहलोत यांच्या म्हणण्यावर मतदान केल्याचे बोलले जात आहे.

राज्यसभा निवडणुकीवरून मुख्यमंत्री गेहलोत गंभीर होते आणि त्यांनी पदाची फिकीर न करता त्यांनी स्वत: मैदानात उतरून काँग्रेसचे निवडणूक एजंट म्हणूनही काम केले. पक्षातून हाकालपट्टी केल्यानंतर शोभाराणी कुशवाह यांनी म्हटले की, पक्षाच्या मोठ्याच नेत्याकडून त्यांच्या विरोधात कुरापती केल्या जात होत्या. त्यामुळे भाजपमध्ये राहण्यास काही अर्थ राहिला नव्हता. राजस्थानातील चार जागांपैकी एकच जागा भाजपला मिळाली. या निवडणुकीत काँग्रेसचे दोन, भाजपची एक जागा पक्‍की होते. चौथ्या जागेसाठी मुकाबला होता.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे भाजपमधील अंतर्गत कलहाचा फायदा घेऊन निवडणुकीत भाजपला धोबीपछाड देत आहेत. गटबाजीचा फटकादेखील भाजपला बसला आहे. अलीकडेच कोटा येथे झालेल्या भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीत माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे या भाषण न देताच निघून गेल्या. वसुंधराराजे या काही महिन्यांपासून बंडाच्याच मूडमध्ये आहेत. संधी मिळताच त्या प्रदेश भाजपवर खापर फोडण्यास मागे-पुढे पाहत नसल्याचे दिसून येते. ही स्थिती भाजपसाठी चांगली नाही. ज्याप्रमाणे भाजपात गटबाजी वाढली असून ती वेळीच रोखली नाही, तर 2023 विधानसभा निडणुकीत देखील गेहलोत पुन्हा एकदा बाजी मारू शकतात आणि भाजप नेत्यांना हात चोळत बसण्याशिवाय हाती काहीच लागणार नाही.

– अभिमन्यू सरनाईक

Back to top button