राष्ट्रपतिपदाचे उमेदवार | पुढारी

राष्ट्रपतिपदाचे उमेदवार

राष्ट्रपतिपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (एनडीए) झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांकडून माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यातील लढत निश्चित झाली आहे. दोन्ही बाजूंकडून उमेदवारांची निवड उत्तमरितीने केली गेली असली, तरीसुद्धा एनडीएने जो राजकीय चाणाक्षपणा दाखवला, त्यामुळे द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी ही लढत सोपी बनली आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी आणि त्यासाठी उमेदवाराच्या नावावर सर्वांची सहमती असावी, यासाठी प्रयत्न झाले; परंतु ती केवळ औपचारिकता होती. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील ताणलेले संबंध पाहता निवडणूक बिनविरोध होणार नाही, हे स्पष्ट होते. शिवाय जिंकण्यासाठी पुरेसे संख्याबळ एनडीएकडे नव्हते, त्यासाठी त्यांना अन्य पक्षांवर अवलंबून राहावे लागणार होते. त्यामुळे स्वाभाविकपणे विरोधकांच्या गोटातही निवडणुकीबाबत उत्साह होता. विरोधकांकडून अनेक नावांची चर्चा होत असताना एनडीएच्या गोटातून मात्र नावाबाबत गोपनीयता राखण्यात येत होती. द्रौपदी मुर्मू यांचे नाव जाहीर करून एनडीएने केलेले बेरजेचे राजकारण महत्त्वाचे ठरले आहे. मुर्मू या आदिवासी समाजातील असून त्यांनी सहा वर्षे झारखंडचे राज्यपालपद सांभाळले आहे. ओडिशा विधानसभेतही त्या निवडून आल्या होत्या आणि भाजप आणि बीजू जनता दलाच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही सांभाळले आहे. राजकीय तसेच संविधानिक पदाचा अनुभव असलेल्या आदिवासी समाजातील महिलेची राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार म्हणून निवड करण्यातून भारतीय जनता पक्षाने सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग पुन्हा एकदा केला आहे. गेल्यावेळी रामनाथ कोविंद यांच्या माध्यमातून एका दलित व्यक्तीची राष्ट्रपतिपदी निवड केली. त्यापुढचे पाऊल टाकून यावेळी आदिवासी महिलेची निवड करण्यात आली. ती करताना भाजपने राष्ट्रीय राजकारणात दीर्घकालीन, ठोस आणि सर्वंकष धोरणाने पुढे जाण्याचा निर्धार केलेला दिसतो. केवळ कोणाची तरी ‘सोय’ लावण्याचा आणि व्यक्तिगत हितसंबंध जोपासण्याचा हेतू नाही, असे म्हणावे लागेल. विरोधकांकडून केली गेलेली यशवंत सिन्हा यांची निवडही वैशिष्ट्यपूर्ण म्हणता येईल. 84 वर्षांचे यशवंत सिन्हा हे बिहार केडरचे आयएएस अधिकारी होते. 1984 मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन ते जनता पक्षात सामील झाले. चंद्रशेखर यांचे निकटवर्तीय मानल्या जाणार्‍या सिन्हा यांनी केंद्रात अर्थमंत्रिपद, परराष्ट्रमंत्रिपद अशी महत्त्वाची पदे सांभाळली आहेत. अटलबिहारी वाजपेयी-लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत काम केलेल्या सिन्हा यांचे 2014 नंतर भाजपची सूत्रे हाती आलेल्या नरेंद्र मोदी यांच्याशी जमले नाही. त्यामुळे त्यांनी भाजपविरोधी भूमिका घेतली. राष्ट्रमंच या बिगरराजकीय संघटनेच्या माध्यमातून ते समाजकारणात सक्रिय होते. अलीकडेच तृणमूल काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली होती. त्या माध्यमातून पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत मिळाले होते. परंतु, त्या पदाचा राजीनामा देऊन ते राष्ट्रपतिपदाचे विरोधकांचे उमेदवार बनले आहेत. दोन्ही बाजूंनी उमेदवार निवडीमध्ये चोखंदळपणा दाखवला असल्यामुळे निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता असली, तरी मुर्मू यांचे पारडे निःसंशयपणे जड आहे.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली तेव्हा विरोधी गटाकडून आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा होती; परंतु आपल्याला राजकारणात सक्रिय राहायचे असल्याचे सांगून पवार यांनी तो प्रस्ताव नाकारला. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांचे नावही आले होते; परंतु त्यांनी नकार दिला. त्यांच्या पाठोपाठ गोपाळ गांधी यांनीही असमर्थता दर्शवल्यामुळे यशवंत सिन्हा यांचे नाव पुढे आले. भारतीय जनता पक्षाविरुद्ध पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जी आक्रमक भूमिका घेतली आहे, शिवाय यासंदर्भातील पहिली बैठक त्यांनीच बोलावली असल्यामुळे उमेदवार देण्याची जबाबदारीही घेऊन त्यांनी सिन्हा यांना लढण्यासाठी तयार केले असावे. सिन्हा हे ममता बॅनर्जी यांचे उमेदवार असल्यामुळे त्यांच्यासाठी त्या सर्व ताकद पणाला लावून प्रयत्न करतील. परंतु, देशातील राजकीय परिस्थिती पाहिली, तर सध्याच्या घडीला ही लढत प्रतीकात्मक ठरण्याचीच शक्यता आहे. जे पक्ष एनडीएमध्येही नाहीत आणि काँग्रेस किंवा ममता बॅनर्जी बांधत असलेल्या आघाडीतही नाहीत, अशा पक्षांवर राष्ट्रपतिपदाचे भवितव्य होते. त्या द़ृष्टिकोनातून बीजू जनता दल, वायएसआर काँग्रेस, आम आदमी पक्ष यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. वायएसआर काँग्रेसने आधीपासूनच आपण एनडीएसोबत असल्याचे जाहीर केले होते. मुर्मू यांची निवड केल्यामुळे बीजू जनता दलाला सोबत घेण्यात एनडीएने यश मिळवले. कारण, देशाच्या घटनात्मक प्रमुखपदाच्या निवडणुकीत प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा महत्त्वाचा ठरत असतो. प्रतिभा पाटील यांना जेव्हा संयुक्त पुरोगामी आघाडीने राष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवले होते, तेव्हा एनडीएसोबत असलेल्या शिवसेनेने याच मुद्द्यावर प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता. आता तीच भूमिका बीजू जनता दलाने घेतल्याचे दिसत आहे. ओडिशाच्या मुर्मू यांची निवड केल्याबद्दल मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिले आहेत. याचा अर्थ आमदार आणि खासदारांचीही दखलपात्र संख्या असलेल्या मोठ्या पक्षाला सोबत घेण्याची खेळी पहिल्याच फटक्यात यशस्वी झाली आहे. त्यामुळे सत्ताधारी गटाची बाजू अधिक सुरक्षित झाली आहे. आदिवासी महिलेची निवड करून विरोधकांच्या आघाडीत सक्रिय असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चासमोरही भाजपने संभ्रम निर्माण केला आहे. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे एनडीएचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत होते. परंतु, विरोधकांचे संख्याबळही तुल्यबळ असल्यामुळे बेरजेचे राजकारण करण्याची आवश्यकता ओळखून भाजपने या नव्या नावावर शिक्कामोर्तब केले. निवडणूक चुरशीची झाली, तरी द्रौपदी मुर्मू निवडून येण्यात कोणतीही अडचण दिसत नाही.

Back to top button