लवंगी मिरची : सोप्पे निकाल, अवघड भविष्य! | पुढारी

लवंगी मिरची : सोप्पे निकाल, अवघड भविष्य!

अभिनंदन आबुराव. नातवाने निकालात बाजी मारली ना?
हो तर बाबुराव!
अगदी धो धो मार्क मिळवले ना?
हो.
किती?
94 टक्के.
बाबो, एकट्या बारावीत 94 टक्के?
हा काय प्रश्न झाला बाबुराव?
नाही, म्हणजे मला दहावी अधिक बारावी असे दोन्ही मिळून सुमारे 92 टक्के मिळाले असतील फार तर! म्हणून विचारलं.
एकट्या बारावीत 94 टक्के काढल्येत बेट्याने. यंदा विक्रमी निकाल लागलाय म्हणे.
मुळात यंदा परीक्षा झालेली का?
झालेली.
मग ठीक. मागच्या वर्षी परीक्षा न घेताही विक्रमी निकाल लागलेला वाटतं.
असेल. न शिकवता, न परीक्षा घेता, न तपासणी करता निकाल लावण्याचा विक्रम तरी नोंदवला म्हणायचा.
गणितात आणि शास्त्रात मोठाच तीर मारला असेल ना?नुसतं तेवढंच नाही. इंग्रजी आणि मराठीतही जवळजवळ पैकीच्या पैकी मार्क मिळतात त्याला.
आमच्या वेळी भाषा विषयात पन्नास, पंचावन्न मार्क म्हणजे डोक्यावरून पाणी असायचं.
आता पूर्वीसारखं हाताने डोक्यावर पाणी कुठे घेतं कोण बाबुराव? अहो, आताची पोरं मार्कांच्या टबात पहुडलेली असतात.
अहो, मग ही गोष्ट खुशीने सांगा ना! मघापासून बघतोय. साधं तोंड भरून कौतुकही करवेना झालंय का तुम्हाला? असले कसले आजोबा तुम्ही?
आजोबा आहे म्हणूनच जरा विचारात पडलोय.
त्यांच्यासारखं मार्कात पडणं तुम्हाला तरी जमलं होतं का?
छे! आम्ही पण पोटापुरते मार्क मिळवणारे होतो.
तरी पदवी, नोकरी बरं जमलं की तुम्हाला, कुठे काही अडलं का?
तेच वाटतं हो. आमचं कसं का होईना, निभून गेलं. या पोरांचं कसं होणार?
का? एवढी हुश्शार आहेत की ती!
तीच तर प्रॉब्लेमची शमश्या वाटते मला.
है का? आपण नर्मदेतले गोटे होतो म्हणून आपल्या घरच्यांना घोर होता. इथे उलटा झोल होतो.
होणारच ना! दहावी, बारावीमध्ये बदाबदा मार्क खिरापतीसारखे वाटलेत. शाळांच्या अखत्यारीतले मार्क शंभर टक्के दिलेत. पुढे पेपरात म्हणे फक्त हो -नाहीवाले प्रश्न.
हो-नाही वाले प्रश्न म्हणजे?
म्हणजे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न. उगा माना मोडून उत्तरं लिहीत बसायचं नाही. फक्त योग्य उत्तर निवडायचं. टीका मारायच्या हो? म्हणजे या परीक्षांमध्ये नापास होणंच कठीण केलं आहे म्हणा की!!
अरे पण, एवढ्यांना द्यायला पुढचं चांगलं शिक्षण, पुरेश्या नोकर्‍या आहेत का आपल्याकडे?
हा काही परीक्षा बोर्डाचा प्रश्न नाही.
पण, पोरांचा आहे, आपला आहे, समाजाचा आहे. इकडे बदाबदा मार्क देऊन पोरांना शेफारायचं आणि नंतर काय बेकारीत ढकलायचं का?
असं होईल का? दुसरं काय होणार? कोणत्याच परीक्षा घेणार्‍यांना वाईटपणा नकोय. जबाबदारी नकोय. आला विद्यार्थी, ढकला पुढे! दहावी पास केलेल्यांना चौथीची गणितं येत नाहीत. बारावीत गेलेल्यांना दहावीचं काहीच येत नाही, हे असलं कसलं शिक्षण? पुन्हा सगळे 80, 90 टक्केवाले! कोणी कष्टाची कामं करणार नाही. सोप्पे निकाल लावण्याच्या नादात भविष्य अवघड दिसतंय मला!

– झटका

Back to top button