प्रासंगिक : इंटरनेटविना मोबाईल क्रांती | पुढारी

प्रासंगिक : इंटरनेटविना मोबाईल क्रांती

मोबाईलवर इंटरनेटविना व्हिडीओ पाहायला मिळण्याचा दिवस दूर नाही. दूरसंचार विभागाने यूजर्सच्या मोबाईलमध्ये थेट ब्रॉडकास्ट सुविधा उपलब्ध करणार्‍या स्पेक्ट्रम बँडच्या शक्यता पडताळण्यासाठी एक समिती नेमली आहे.

काही दिवसांनंतर तुम्ही तुमच्या मोबाईलवर इंटरनेटशिवाय व्हिडीओ, क्रिकेट, चित्रपट आणि अन्य मल्टिमीडिया कंटेन्ट थेट पाहू शकणार आहात. डायरेक्ट टू मोबाईल म्हणजेच डीटूएम ब्रॉडकास्टिंग तंत्रज्ञानामुळे हे सर्व शक्य होणार आहे. डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन अर्थात डॉट आणि प्रसारभारती हा देशातील पहिला पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टर या तंत्रज्ञानावर काम करीत आहे. डीओटीने गेल्याच वर्षी आयआयटी कानपूरसोबत या तंत्रज्ञानाच्या चाचणीसाठी भागीदारी केली होती. डीओटीने त्यासाठी एका समितीची नियुक्ती केली आहे.

डीटूएमचा अर्थ सोप्या शब्दांत सांगायचा झाल्यास इंटरनेट, केबल किंवा डीटीएच आदी माध्यमांचा आधार न घेता मोबाईलमध्ये बातम्या, क्रिकेट आदींचे व्हिडीओ प्रसारित करण्याची सुविधा मिळेल. त्याचबरोबर इंटरनेटशिवाय फोनवर ओटीटी प्लॅटफॉर्म दिसू शकतील. आपण एफएम रेडिओ ज्याप्रमाणे फोनवर ऐकतो, जवळजवळ तसेच हे असेल. फोनमध्ये असलेला रिसीव्हर रेडिओ फ्रिक्वेन्सीमध्ये बदल करतो आणि त्यामुळे आपण एफएमचे कार्यक्रम ऐकू शकतो. लोक एकाच मोबाईलवर अनेक फ्रिक्वेन्सीची रेडिओ एफएम स्टेशन ऐकू शकतात. त्याचप्रमाणे डीटूएमच्या माध्यमातून मल्टिमीडिया कंटेन्ट फोनमध्ये थेट ब्रॉडकास्ट करण्यात येईल.

वास्तविक हे तंत्रज्ञान म्हणजे ब्रॉडबँड आणि ब्रॉडकास्ट यांच्या मिश्रणातून तयार होईल. महत्त्वाचा भाग असा की, व्हिडीओ बफरिंगशिवाय प्रसारित होतील आणि त्यांचा दर्जा चांगला असेल. कारण, यात कोणताही इंटरनेट डेटा वापरला गेला नसेल. या तंत्रज्ञानाचा सर्वांत मोठा फायदा असा असेल की, नागरिकांशी संबंधित कोणतीही माहिती थेट त्यांच्या मोबाईलपर्यंत पोहोचविता येईल. त्यामुळे फेक न्यूज रोखण्यास, इमर्जन्सी अलर्ट जारी करण्यास आणि आपत्ती व्यवस्थापनास मदत मिळेल. कोणत्याही प्रकारचा मोबाईल डेटा खर्च न करता वापरकर्ते व्हिडीओ ऑन डिमांड (व्हीओडी) किंवा ओटीटी कंटेन्ट थेट मोबाईलवर मिळवू शकतील. ही सुविधा वापरकर्त्यांना अत्यंत कमी दरात उपलब्ध होईल.

ग्रामीण भागात जेथे इंटरनेटच्या सुविधा अद्याप नाहीत किंवा अत्यल्प आहेत, तेथील लोकही या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून असा व्हिडीओ कंटेन्ट बघू शकतील. याचा सर्वांत मोठा फायदा टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हाइडर्स म्हणजे दूरसंचार सेवाप्रदात्या कंपन्यांना होईल. या कंपन्या व्हिडीओ ट्रॅफिक आपल्या मोबाईल नेटवर्कमधून ब्रॉडकास्ट नेटवर्कवर अपलोड करू शकतील. किमती मोबाईल स्पेक्ट्रमची बचत करणे यामुळे कंपन्यांना शक्य होईल. मोबाईल स्पेक्ट्रमच्या वापरात यामुळे सुधारणा होतील आणि बँडविड्थवरील दबाव कमी होईल. त्यामुळे कॉल ड्रॉपसारख्या समस्या उद्भवणार नाहीत आणि डेटा स्पीड वाढविण्यास मदत होईल. माहिती प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांच्या म्हणण्यानुसार, डीटूएममुळे ब्रॉडकास्टर्सना फायदा होईल. कारण, त्यांना नवीन प्रेक्षकवर्ग मिळेल. ब्रॉडकास्टिंगच्या ग्राहकांची संख्या सध्या देशात केवळ 20 ते 21 कोटी घरांपर्यंतच मर्यादित आहे. कारण, एवढ्याच घरांमध्ये टेलिव्हिजन आहे. डीटूएम तंत्रज्ञान आल्यानंतर ब्रॉडकास्टर्सच्या ग्राहकांची संख्या अनेक पटींनी वाढेल. काही वर्षांतच ती 100 कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. कारण, 2026 मध्ये मोबाईल यूजर्सची संख्याच भारतात तेवढी असणार आहे.

माहिती प्रसारण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात 75 कोटी स्मार्ट फोनधारक आहेत. दूरसंचार विभागाने यूजर्सच्या मोबाईलमध्ये थेट ब्रॉडकास्ट सुविधा उपलब्ध करणार्‍या स्पेक्ट्रम बँडच्या शक्यता पडताळण्यासाठी एक समिती नेमली आहे. या विभागाच्या सचिवांचे म्हणणे असे आहे की, 526-582 मेगाहर्टझ् मोबाईल आणि ब्रॉडकास्ट दोन्ही सेवांसाठी काम करू शकतो. याच बँडचा अभ्यास ही समिती करणार आहे. तंत्रज्ञान उन्नत झाल्याने आता ब्रॉडबँड सेवेसाठी ब्रॉडकास्टिंग सेवा आणि ब्रॉडकास्टिंग सेवेसाठी ब्रॉडबँड सेवा देणे शक्य होणार आहे. डीटूएम तंत्रज्ञानामुळे केबल आणि डीटीएच क्षेत्रावर मोठा परिणाम होणार आहे. कारण, डीटूएममध्ये कोणत्याही इंटरमीडिएटरी म्हणजेच अन्य कोणत्याही माध्यमाविना थेट घरांमध्ये प्रक्षेपण होईल. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार डीटूएम तंत्रज्ञान मोठ्या स्तरावर लाँच करण्यासाठी सर्वांत मोठे आव्हान मोबाईल ऑपरेटर्ससह अन्य संबंधितांना एकत्र आणणे हे असणार आहे.

– महेश कोळी, संगणक अभियंता

Back to top button