लवंगी मिरची : नमामि गंगे! | पुढारी

लवंगी मिरची : नमामि गंगे!

अहो रिक्षावाले, हे काय करताय?
दिसत नाही? रिक्षा धुतोय,
दिसतंय की! पण, नदीत का?
मग, तुमच्या घरी आणू का धुवायला? तुम्हाला पॅसिंजर लोकांनाच रिक्षा स्वच्छ असाव्या लागतात ना?
लागतात, पण नदीच्या पाण्याने पवित्र करून द्याव्या नाही लागत अशा.
ठीक आहे. पण, आमचं असंच! आम्ही बरेच रिक्षावाले इथेच आणत असतो आमच्या रिक्षा सफाईसाठी.
नदी घाण करायला काही वाटत नाही?
वाटायचंय काय? नदी तुमची आहे का?
नाहीये, कबूल. पण, नदी सर्वांची आहे, सर्वांसाठी आहे, हे तर मान्य कराल तुम्ही?
म्हणून तर हक्काने येतो इथे. पूर्वी म्हशी धुवायला आणत होतो, आता रिक्षा आणतो. इथे वाहत्या पाण्यात किती छान होते साफसफाई.
पुढे या नदीचं पाणीच आपण घरकामाला, उद्योगाला, अगदी प्यायलाही वापरतो नाही का?
वापरणारच की! नदी म्हणजे जीवन. शाळेत शिकवलंय की!
शिकवलंय ना? मग, का गढूळ करता ते जीवन आणि इतर सर्वांचंही जीवन?
काही होत नाही. वाहत्या पाण्यात सगळं स्वच्छ होतं.
तुम्ही मोकळेपणी वाहू तरी कुठे देता पाण्याला? कचरा टाकून टाकून नदीचं पात्र लहान करता, गती कुंठित करता.
अहो काका, ते शाळेतलं नागरिकशास्त्र नका हो शिकवू नव्याने. सातवी पास आहे मी.
तरी नदीच्या जवळपास जायला बिचकत नाही. ‘नमामि गंगे’ वगैरे काही ऐकलंयत की नाही?
मस आयकलंय. गंगा नदी स्वच्छ करण्याचा प्रोजेक्ट. दिल्लीवाल्यांना असं काय काय सुरू ठेवावंच लागतं.
आपला काही संबंध नाही का त्याच्याशी?
अहो, गंगा कुठल्या कुठे? आपण कुठे?
तरी पण! 2014 पासून चाललंय हे मिशन. वीस हजार कोटींचं बजेट नेमलंय. याचं काहीच महत्व नाही?
असणार ना! गंगेच्या परिसरात राहणार्‍यांसाठी!
का हो? गोदावरीलाही गंगा म्हणतात, कृष्णेलाही गंगा म्हणतात, हे ऐकलं नाहीत का कधी?
तसं काय, अनेक गावातल्या छोट्या नद्यांनाही गंगा म्हणतात स्थानिक लोक. गावाला पापातून सोडवते ती गंगा. गंगेत पाय धुवूनच गावात शिरायचं असा शिरस्ता.
मग? ही सगळी माहिती काय बासनात गुंडाळून ठेवण्यासाठी आहे का?
कोण जाणे?
आता जगभरात नद्यांच्या संरक्षणाचे नाना प्रयत्न होतात. नदीच्या पाण्यावर सतत देखरेख चालते. काठावरच्या व्यवहारांना बंधनं असतात. नदीच्या पाण्याचा गैरवापर केला, तर प्रचंड शिक्षा ठोठावतात.
आपल्यातही नदीची आरती करतातच की ठिकठिकाणी. गंगेची आरती करायला, बघायला भारतभरातून भाविक लोक जातात.
तेच म्हणणार होतो मी. प्रत्येकाने प्रत्येक नदीची आरतीच करायला हवी असं नाहीये; पण नदीची, वाहत्या पाण्याची प्रतिष्ठा मात्र सांभाळायलाच हवी. नद्या टिकल्या तर आपण टिकू. समजलात? नक्की ना? मग म्हणा, ‘नमामि गंगे!’

– झटका

Back to top button