असंतोषाचे रूपांतर अखेर शिवसेनेतील बंडात पवार, ठाकरे यांचे अपयश | पुढारी

असंतोषाचे रूपांतर अखेर शिवसेनेतील बंडात पवार, ठाकरे यांचे अपयश

शिवसेनेला खिंडार पडून 33 आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकावला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे त्रिपक्षीय महाआघाडी सरकार धोक्यात आले. कोणत्याही क्षणी महाराष्ट्रात सत्तांतर होर्ईल, असे चित्र निर्माण झाले. अडीच वर्षांतच महाविकास आघाडी सरकारला घरघर लागली. सरकारचा कार्यकाळ पूर्ण होऊ शकत नाही, हे मोठे अपयश आहे. ही आघाडी उभारण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा पुढाकार होता. आघाडीचे शिल्पकार आणि सूत्रधार म्हणूनच ते ओळखले जात होते. आता जरी हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असला, तरी पवार यांचेही हे अपयशच म्हटले पाहिजे. पवार यांचे जसे हे अपयश आहे, तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही जबाबदारी टाळता येणार नाही.

आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून पहिल्या दीड-दोन वर्षांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पूर्णपणे सक्रिय नव्हते आणि स्वाभाविकच उपमुख्यमंत्री अजित पवार हेच सरकार चालवीत असल्याचे चित्र दिसत होते. याच काळात शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांचा आणि उद्धव ठाकरे यांचा संपर्क कमी झाला आणि पक्षाच्या मंत्री आणि आमदारांना आपले प्रश्न आणि अडचणी कुणापुढे मांडायच्या, अशी द्विधा मन:स्थिती निर्माण झाली. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना खात्याच्या निधीत झुकते माप मिळत गेले. आमदारांनाही निधीसाठी धावपळ करावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार, मंत्र्यांना सर्वाधिक निधी मिळत असल्याच्या तक्रारी होत होत्या. आघाडीचे सूत्रधार म्हणून शरद पवार यांनी या तक्रारींकडे लक्ष घालायला हवे होते. ते झाले नाही आणि अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या धोरणांमुळे त्रासलेल्या संतप्त भावनांचा उद्रेक झाला. ही जबाबदारी पवार यांना नाकारता येणार नाही.

डावलले गेल्याची भावना

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी आघाडी करूच नये, अशी एकनाथ शिंदे यांची भूमिका होती. तथापि, त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यानंतरही अडीच वर्षांत त्यांना आपल्याला डावलले जात असल्याचा अनुभव आला. राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीत त्यांना विश्वासात घेतले गेले नव्हते. त्यांच्या नगरविकास खात्यात आदित्य ठाकरे यांचा हस्तक्षेप होत असल्याचीही शिंदे यांची भावना होती. काही आय.पी.एस. अधिकार्‍यांच्या बदल्यांबाबत त्यांनी शिफारस केली होती. ती झाली नाही. नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे बदल्या झाल्या; पण त्यांच्या मनात सल राहिलीच. त्यांच्याप्रमाणेच अनेक आमदारांच्याही अशाच तक्रारी होत्या आणि त्याचा स्फोट झाला. सरकारचे प्रमुख आणि पक्षप्रमुख म्हणून आमदार आणि मंत्र्यांमधील नाराजी दूर करणे, त्यांचे समाधान करणे ही उद्धव ठाकरे यांची जबाबदारी होती. त्यात ते कमी पडले. अन्य कोणावर खापर फोडण्यात काही अर्थ नाही. कारण, नाराजी निर्माण व्हायला काही प्रमाणात का होईना ते जबाबदार आहेत, हे नाकारता येणार नाही. आपल्याला मुख्यमंत्री भेटत नाहीत, ही आमदारांची तक्रार होती. तिचे निराकरण झाले नाही. कोरोना काळानंतरही मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यात ठिकठिकाणी जाहीर कार्यक्रमांतून लोकसंपर्क साधला, असे दिसले नाही. बंडामागे हीदेखील पार्श्वभूमी आहे.

राज्यसभेत पराभव झाला, तेव्हाच भावी घडामोडींची चुणूक दिसली होती. चाणक्यनीतीत तरबेज असलेल्या शरद पवार यांना अंदाज आला नाही. हे बंड काही आकस्मिक झालेले नाही. त्याची किमान महिना -दोन महिने तयारी होत असणार. सरकारच्या गुप्तहेर खात्याला त्याचा वास आला नाही आणि पवार यांच्या यंत्रणांनाही त्याचा सुगावा लागला नाही. एरव्ही जागरूक असणार्‍या पवार यांचे हे अपयश आहे, असेच म्हटले पाहिजे.

  • राष्ट्रवादीच्या कुरघोडीने सेना आमदार, मंत्री अस्वस्थ
  • शिवसेनेत डावलल्याच्या भावनेतून उद्रेक

पुलोद ते शिंदे यांचे बंड

महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षात बंडखोरी करून सत्तांतर घडवण्याचा पायंडा शरद पवार यांनीच घालून दिला. 1978 च्या जुलै महिन्यात पवारांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले आणि पुलोदचे सरकार स्थापन केले. आता 44 वर्षांनी एकनाथ शिंदे यांनी त्यांचाच कित्ता गिरवीत सत्तांतराचा घाट घातला आहे.

– सुरेश पवार

Back to top button