गोव्यात फ्लॅट, वीज, पाणी मोफत

सुरेश गुदले गोवा वार्तापत्र

गोव्यात भाजप सत्ताधारी आहे. पाच आमदार असलेला काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष आहे. भाजप, आप, मगोप आणि गोवा फॉरवर्डने पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी कधीच सुरू केली आहे. काँग्रेस मात्र अंतर्गत वादात मदमस्त आहे.

गोव्यातील कळंगूट हा समुद्रकिनारा जगप्रसिद्ध. तो विधानसभा मतदारसंघही आहे. तेथे प्रत्येक घरामागे एक सदनिका (फ्लॅट) मोफत देऊ, अशी घोषणा आमदार होऊ इच्छिणार्‍या क्‍लबच्या मालकाने केली आहे. या क्‍लबमध्ये ‘रात्रीस खेळ चाले’ म्हणजे काय ‘धूरमय धिंगाणा’ असतो ते काय सांगायलाच पाहिजे का राव? गोव्यात सर्वांना 24 तास अखंडित मोफत वीजपुरवठा केला जाईल, असे ‘आप’चे वचन. त्याचा झटका भाजपला बसला. लगेच एक सप्टेंबरपासूनच पाणीपुरवठा मोफत, अशी तुतारी सत्तारूढ भाजपने दणक्यात फुंकली. मग गोवा फॉरवर्ड पक्ष खाडकन् जागा झाला. आरोग्य सेवा आणि शिक्षण देणार मोफतच, अशी गर्जना त्यांनी करून टाकली. शासकीय कर्मचार्‍यांना कार्यालयात दुपारी एक तास झोप घेता येईल,अशी तरतूद करू, असे हा पक्ष मध्यंतरी म्हणाला होता.

जनता जनार्दन समाज माध्यमातून या पक्षांना विचारतेय की, किती हा दानशूरपणा हो? ‘बच्चे को रूलाओगे क्या?’ निवडणुका जाहीर होण्यापूर्वीचा हा मोफतचा पाऊस. तारखा जाहीर झाल्या की, पोतडीतून काय-काय गुलछबू बाहेर काढतात पाहू या. तोपर्यंत मुंगेरीलालने सालाबादप्रमाणे पाहावीत ‘हसीन सपने.’

भाजपचा निवडणुकीचा चेहरा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतच, असा निसंदिग्ध निर्वाळा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी गोव्यात येऊन दिला. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष राज्य पिंजून काढत आहेत. 2017 च्या निवडणूक निकालानंतर काँग्रेसचे दहा, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे (मगोप) दोन अशा 12 आमदारांच्या हाती ‘कमळ’ देण्यात भाजप यशस्वी झाला. हा विषय न्यायप्रविष्ठ आहे. तेथील अनुकूल-प्रतिकूल निर्णयानुसार पटाच्या फेरमांडणीची पक्षाची तयारी सुरू आहे. राष्ट्रीय नेतेे, राष्ट्रीय स्तरावरील महिला पदाधिकारी गोव्यात येऊन माध्यमात झळकत आहेत. ‘जिंकून येण्याची क्षमता’ हा उमेदवारीचा निकष आहे. पंचायत निवडणुकांप्रमाणे ‘जो जिंकेल तो आपला’ हा राजमार्ग यावेळीही कायम आहे. मंत्र्यांमधील जाहीर वादावादी, मुख्यमंत्रिपदाचे अन्य दावेदार, जनमानसातील असंतोष अशा काही नकारात्मक बाजू आहेत. त्यावर ‘निवडणूक जुमला’ हा भाजपचा रामबाण उतारा देशाने अनुभवला आहे. त्याचीच प्राथमिक तयारी म्हणून सध्या दुसर्‍या, तिसर्‍या फळीतील कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांच्या भाजप प्रवेशाची लगीनघाई सुरू आहे.

विरोधी काँग्रेसची छावणी म्हणजे ‘पाण्यात बसलेला हत्ती’. त्यांचे गोवा प्रभारी होते दिनेश गुंडू राव. त्यांना अचानक बदलले. त्यांनी गोवा दौरा अर्धवट सोडून बंगळूरचे विमान पकडले. आता पी. चिदंबरम झालेत गोवा निवडणूक निरीक्षक. ते अनुभवी, अभ्यासू नेते. निवडणुकीस अत्यंत कमी कालावधी राहिला असताना ते काँग्रेसचे घर कसे सावरतील हा प्रश्‍नच. त्यांचे विमान गोव्यात कधी उतरणार पाहूया. सध्या अंतर्गत वादात पक्ष मदमस्त आहे. तरुणवर्गाला पक्ष काही संधी देताना दिसत नाही. निवडणुकीला सामोरे जाताना पक्षाकडे वलयांकित चेहरा नाही. पुन्हा मुख्यमंत्री व्हायला अर्धा डझन माजी मुख्यमंत्री एका पायावर तयार आहेत. गटबाजीने, चिखलकाल्याच्या जाहीर खेळामुळे प्रतिमेचा प्रश्‍नही गंभीर झाला आहे. पक्षाला मानणारे जनमानस नक्‍कीच आहे.

भाजपप्रमाणे आम आदमी पक्षानेही विधानसभेची तयारी कधीच सुरू केली आहे. ‘24 तास मोफत वीज देण्याच्या आश्‍वासनांचे केजरीवालांचे फलक कानाकोपर्‍यात झळकत आहेत. त्यांचा चेहरा आणि पक्षप्रतिमा ही आपची बलस्थाने. भाजपप्रमाणेच ‘आप’मध्येही दुसर्‍या, तिसर्‍या गटातील कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांचा धूमधडाक्यात प्रवेश सुरू आहे. एक माजी मंत्री ‘आप’वासी झालेत. एखाद्या कंपनीप्रमाणे ‘आप’ची कार्यपद्धती आहे. माध्यम व्यवस्थापन सुरू आहे. त्यासाठी दिल्लीतील ‘थिंक टँक’ मंडळींचे गोवा दौरे सुरू आहेत. त्यांच्या रणनीतीमुळे भाजपवर ‘पाणी मोफत पाजतो’ म्हणण्याची वेळ आली.

मगोप आणि गोवा फॉरवर्ड या स्थानिक पक्षांना सत्तेसाठीचे उपद्रव मूल्य वाढविण्यात दांडगा इंटरेस्ट. ‘किंग’ नाही तर ‘किंगमेकर’ तरी. बहुमताचा जादुई 21 हा आकडा गाठण्यासाठी आपला द्रोण लागावाच ही त्यांची मनोकामना. त्यामुळे ते कुंपणावर बसलेत बगळ्यासारखे. काँग्रेस, आप यांच्याशी युती व्हावी यासाठीही त्यांची धडपड आहे. बातम्यांसाठीची त्यांची भाषा अर्थातच वेगळी आहे. त्यांचा पूर्वेतिहास पाहता ‘सत्तेसाठी कायपण’ सूत्रानुसार त्यांची चाल राहील. पुन्हा तेच जनतेला विचारतात, ‘सोनू, तुझा माझ्यावर भरवसा नाय काय?’

या सर्व राजकीय घडामोडींचे भरतवाक्य काय तर सध्या स्वप्ने वाटण्याचा मोफत सेल सुरू झाला आहे. सदनिका, वीज-पाणी, आरोग्य, शिक्षण… झाडून सारे मोफत. आपणही मुंगेरीलाल. ‘हसीन सपने’ पाहणारे. स्वप्नही असते अन्नच, ते धड खाऊ न देणार्‍यांना आपण बदलायचे तरी कधी ?

Exit mobile version