घंटा वाजताहेत शाळांच्या आणि धोक्यांच्याही | पुढारी

घंटा वाजताहेत शाळांच्या आणि धोक्यांच्याही

नमस्ते मॅम! शाळा सुरू झाल्या ना? बेस्ट ऑफ लक द्या मुलांना.
मुलांनाच कशाला? शिक्षकांनाही गरज आहे यंदा शुभेच्छांची.
का हो?
काही विचारू नका. तसाही शाळेचा पहिला आठवडा म्हणजे धुमाकूळ असतो. नव्या पोरांची रडारड, पालकांची दमदाटी, नव्या वह्या-पुस्तकांचा वास, नवे छत्र्या-रेनकोट मिरवणं, उत्सवच एक प्रकारचा; पण यंदा आणखीही बराच व्याप आहे.
दोन वर्षांच्या गॅपनंतर जड जात असेल ना तुम्हाला?
हो. तरी चालेल. खरं तर आवडतंय.
काम पडलं तरी आवडतंय?
हो तर. शाळेत शुकशुकाट असणं बघवत नसे अगदी. खायला उठायच्या तशा शाळा.
आणि आता पोरं डोकं खातील तेव्हा?
चालेल. मध्ये रागवू, मध्ये लाड करू, हे तर शिक्षकांचं चालणारच ना!
पोरं उत्साहात असतील तरी पुरे,
सवालच नाही. मिठ्या मारत होती काही मुलं आम्हा शिक्षकांना! त्यांना दूर करतांना भरून येत होतं.
कठीण आहे.
आहे तर; पण दुसर्‍या बाजूने पोरांचंही कठीण वाटतंय.
का? शाळेची सवय सुटलीये म्हणून?
ते तर झालंच; पण मधल्या दोन वर्षांच्या ऑनलाईन शिक्षणाने काहींना भलभलत्या सवयी लागल्या.
उदाहरणार्थ?
अहो, सकाळी उठून तयार होऊन शाळेत जायची सवयही सुटली पोरांची. ऑनलाईन कोचिंगमध्ये कित्येक मुलं घरी, कोचांवर, आडवीतिडवी लोळत, हळूच खातपीत बसलेली असायची. फोनवर टीचरना चेहरा नीट दिसला की झालं. अशी सूट शाळेत कशी मिळणार?
म्हणजे मुलं आरामात आणि तुमचं शिक्षकांचं काम पूर्वीसारखंच?
पूर्वीसारखं नाही, जास्त वाढलेलं. सारखं स्क्रीनवर दिसणार्‍या एकेका पोराला हलवायचं, जागं करायचं. कोणाला काय येतंय, समजलंय याचा अंदाज घ्यायचा.
उत्तरं कशी तपासायचात?
बरेचसे पर्यायी उत्तरांचे प्रश्‍न द्यायचो. उत्तरं टिक मार्क करा. मार्क मिळवा. त्यापुढे जाऊन सलग दहा-बारा ओळीसुद्धा लिहायची सवयच सुटली पोरांची.
तसाही लिखाणाचा आळस असतोच या वयात बहुतेकांचा. तोंडपाटीलकी करायला हुश्शार सगळे!
हा प्रश्‍न ऑनलाईन शाळांमुळे आणखीच बळावलाय.
पण, ज्यांच्या घरी ऑनलाईन जायची सोय नव्हती त्यांचं काय झालंय?
ती बिचारी तर आणखीच खूप मागे पडलीहेत. दोन-तीन भावंडांमध्ये मिळून एकच फोन, नेटचं कनेक्शन मिळत नाहीये, त्यांचं शिक्षणाशीच कनेक्शन तुटलंय.
अरेरे!
त्यांचा मागे पडलेला अभ्यासही करून घ्यावा लागेल.
बापरे, म्हणजे सवय सुटल्यावर, त्यांच्या मागच्या आणि नव्या अशा दोन्ही अभ्यासांवर एकाच वेळी हात फिरवायचा शिक्षकांनी.
हं. अग बाई, शाळेची घंटा वाजतेय की काय?
तुम्हाला इथून शाळेची घंटा ऐकू येतेय?
फक्‍त शाळेचीच नाही. शिक्षणातल्या धोक्यांची घंटाही ऐकू येतेय. बघू आम्ही कसं तोंड देतो सगळ्याला!

Back to top button