मुख्यमंत्रिपदाचा नवस कुणासाठी? | पुढारी

मुख्यमंत्रिपदाचा नवस कुणासाठी?

‘राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला, तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेऊन तुळजाभवानीच्या दर्शनाला येईन,’ असा नवस सुप्रिया सुळेंनी बोलून दाखवला. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणे न होणे तुळजाभवानीच्याच हाती, असे सुळेंना खुशाल समजू द्या. उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र तसे समजत नाहीत. काँग्रेस आणि शिवसेना संपवण्याचे काम त्यांनी कधीच हाती घेतले आहे.

शाहू, फुले, आंबेडकर अशा महामानवांच्या नामत्रयीचा जप करत राजकारण करणार्‍यांनी नवस करावेत का, असा प्रश्न आज कुणी विचारणार नाही. राजकारणात सारेच गुन्हे माफ आणि प्रसंगी किरकोळ गुन्ह्यालाही जबर शिक्षा, असा सध्याचा राजकीय माहोल आहे. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तुळजापूर दौर्‍यात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीला केलेला नवस भलताच चर्चेत आला.

‘राज्यात आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झालेला नाही. आता पुढच्या निवडणुकीत तरी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ दे..! राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेऊन तुळजाभवानीच्या दर्शनाला येईन,’ असा नवस सुप्रिया सुळेंनी बोलून दाखवला. नवस हा श्रद्धा की अंधश्रद्धा हा भाग सोडा. नवसाचे म्हणून एक शास्त्र असते म्हणतात. नवस करताना इतरांचे नुकसान होईल, इतरांचे हक्काचे हिरावून घेतले जाईल, असे काही मागू नये. नवस करताना आपल्या मर्यादांची जाणीव ठेवावी.

साक्षात परमेश्वराला फार मोठी तोडफोड करावी लागेल, असे काही मागू नये, देवाला क्षुद्र गोष्टींचे प्रलोभन दाखवू नये, असे म्हणतात. या सर्व कसोट्यांवर सुप्रिया सुळेंचा नवस कुठे उतरतो? आपल्या जन्मापासून ‘जय भवानी-जय शिवाजी’चे नारे शिवसेना देत आली. त्याच शिवसेनेकडे असलेले मुख्यमंत्रिपद सुप्रिया सुळेंनी आई भवानीकडेच मागितले. ती ते एकाचे काढून दुसर्‍याला का बरे देईल? एखादी इच्छा तुम्ही अत्यंत मनापासून व्यक्त केली तर ती पूर्ण करण्यासाठी सारे ब्रह्मांड कामाला लागते, अशा अर्थाचा एक हिंदी शेर आहे; पण ही इच्छा तुम्ही स्वत: स्वत:साठी प्राणपणाने व्यक्त करावी लागते. दुसर्‍यांसाठी नाही.

सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्रिपदाचा नवस केला; पण तो कुणासाठी? अजित पवारांसाठी की स्वत:साठी? त्यांनी नवस करताना अजित पवारांचे नाव कुठेही घेतले नाही. महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार? या प्रश्नावर त्या मनमोकळ्या हसल्या आणि म्हणाल्या, याचा निर्णय जनताच घेईल. ते खरे आहे. सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादी काँग्रेससाठी मुख्यमंत्रिपद मागितले आणि त्या बदल्यात तुळजाभवानीला काय देऊ केले? तर म्हणे, संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेऊन तुझ्या दर्शनाला येईन! आई तुळजाभवानी जणू कित्येक वर्षांपासून राष्ट्रवादीच्या प्रतीक्षेत आहे आणि राष्ट्रवादी मात्र तुळजापूरकडे फिरकत नाही, असे काही आहे काय? या पक्षाला तुळजापूरपर्यंत आणायचे असेल तर मुख्यमंत्रिपद दिलेच पाहिजे, अशी अट सुळेंनी साक्षात भवानीला घातली.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कथित नास्तिकपणाची राजकीय चर्चा अलीकडे उठली. त्यामुळेही अशी काही अट घातली तर आई भवानी प्रसन्न होईल, असे सुळेंना वाटले असावे. शरद पवार कुठल्या मंदिरात गेले, नवस बोलले, अशी चर्चा कधी झाली नाही. परवा पुण्यात महात्मा जोतिबा फुले यांच्या भिडेवाड्यातील शाळेची पाहणी करून पवार बाहेर आले आणि बाजूलाच दगडूशेठ गणपतीची अन् त्यांची नजरानजर झाली. तरीही मंदिराची पायरी चढायची नाही याची तयारी पवार सकाळच्या नाश्त्यापासूनच करून आले होते. नॉनव्हेज खाल्ल्याचे निमित्त सांगत त्यांनी खालूनच दगडूशेठला हात जोडले आणि प्रस्थान ठेवले; पण पवारांनी गणपतीला दुरूनच का होईना हात जोडले, याचे श्रेय घेतले ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने.

राजसाहेबांच्या भगव्या शालीचा हा परिणाम. नास्तिक पवार देवाला हात जोडू लागले, असे मनसैनिक सांगू लागले. गेली सहा दशके महाराष्ट्राचे राजकारण करणारे पवार अगदीच पुण्यश्लोक नसले तरी त्यांच्या नावावर नाही म्हणायला मुंबईतल्या श्री सिद्धिविनायक मंदिराचा जीर्णोद्धार आहे. गणपतीपुळ्याच्या मंदिराचे कळसारोहणही त्यांच्या हस्ते झाले. हे सारे धार्मिक उपद्व्याप करताना पवारांनी मुख्यमंत्रिपद मागितले आणि देवाने गाभारा सोडून बाहेर येत पवारांना ‘तथास्तु’ म्हटले, असे कधी घडले नाही. उलट आपल्या संपूर्ण कारकिर्दीत शरद पवार राजकीय टोप्या उडवत आले आणि भाकरी फिरवत राहिले.

त्यांच्या सत्ताकारणाचे हेच मर्म म्हटले जाते. पवारांची पुढची पिढी मात्र आजच्या राजकीय हवालदिल परिस्थितीत घायकुतीला आली आणि मुख्यमंत्रिपदासाठी नवस बोलून बसली, असे चित्र सुप्रिया सुळेंच्या तुळजापूर भेटीतून राज्यासमोर गेले. आता राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणे न होणे तुळजाभवानीच्याच हाती, असे सुळेंना खुशाल समजू द्या. उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र तसे समजत नाहीत. पुढच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार कसे निवडून येतील याची मोठी कपटनीती त्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेविरुद्ध आखलेली दिसते.

जिथे जिथे शिवसेनेचे आमदार, तिथे राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य आणि दोन्ही नसतील तर ग्रामपंचायत सदस्याला विचारूनच निधी मंजूर केला. विकासनिधीच्या समन्यायी वाटपाचे सारे तत्त्वच त्यांनी गुंडाळून ठेवले. कुठे 22 कोटी, कुठे 65 कोटी मंजूर करताना तिथल्या काँग्रेस किंवा सेनेच्या आमदारांना त्यांनी शब्दानेही विचारले नाही. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, मात्र निधी दिला एकनाथराव खडसेंना. असा प्रकार किमान 25 विधानसभा मतदारसंघांत झाला.

सार्वजनिक बांधकाम विभागात तर निधीवाटपात विचित्र युती बघायला मिळते. या खात्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनी सर्वाधिक निधी नांदेड आणि बारामतीलाच दिला. नवस करून मुख्यमंत्रिपद मिळत नाही. ज्याचे सर्वाधिक आमदार, त्याचा मुख्यमंत्री, हे सूत्र आहे. त्यासाठी आज सत्तेत मित्र म्हणून बसलेल्या शिवसेनेचे आणि काँग्रेसचे आमदार कमी करावे लागतील, राष्ट्रवादीचे वाढवावे लागतील आणि ते भाजपपेक्षा संख्येने जास्त असावे लागतील तर आणि तरच आपल्याला मुख्यमंत्रिपद मिळेल, हे अजित पवार जाणतात. त्यामुळे मुख्यमंत्रिपद पक्षाला मिळवून देण्याचे काम आपल्यालाच करावे लागेल, हे ओळखून अजित पवार कामाला लागलेले दिसतात.

त्यासाठी जिल्ह्या-जिल्ह्यांत आजच्या मित्रपक्षांचा नवा राजकीय अनुशेष ते निर्माण करू पाहात असावेत. त्यांची ही चाल शिवसेनेचे रामटेकचे आमदार आशीष जैस्वाल यांनी ओळखली. तसा अहवालच त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला. पुढच्या निवडणुकीत नवे मतदारसंघ मिळवणे सोडाच, आज हाती असलेले मतदारसंघही राष्ट्रवादीच्या आक्रमकतेने हातातून जातील, असा धोक्याचा इशारा त्यांनी दिला. शिवसेना हा इशारा ओळखून सोडून देते की अजित पवारांचा उधळलेला वारू रोखते, यावर सेनेच्या अस्तित्वाची लढाई अवलंबून राहील.

Back to top button