ज्याच्या त्याच्या मुलांची काळजी! | पुढारी

ज्याच्या त्याच्या मुलांची काळजी!

काय हो आबुराव, आताच्या वयात आपल्याला सगळ्यात मोठी काळजी कशाची असते हो तुमच्या मते?
आताच्या वयात म्हणताय का?
हो.
म्हणजे तब्येतीची?
ती तर असतेच; पण तिची काळजी घ्यायला डॉक्टर समर्थ असतात.
मग, पैशाची काळजी?

ती काय हो, जन्मभरच असते. ते म्हणजे धावत्या कुत्र्याचं शेपूट पकडण्यासारखं आहे. महागाई वाढते, आपलं पैशामागे धावणं वाढतं, दोन्हीतलं अंतर तसंच राहतं.
मग, देशाची काळजी वाटते का?
च्यक!!! त्यासाठीच पाच-पाच वर्षें एकेकावर जबाबदारी टाकतो की आपण!
अरे वा! म्हणजे तुम्हाला कशाचीच काळजी वाटत नाही म्हणा की!

छे! एवढं कुठलं भाग्य माझं? आताशा मला आपल्या मुलांची सर्वात जास्त काळजी वाटते बघा. त्यांचं आरोग्य, शिक्षण, नोकर्‍या, घरंदारं, अन्नपाणी सगळ्याचीच काळजी वाटते दिवसेंदिवस.
सेम हियर! वाटतं आपला काळ जसाही गेला तो बरा गेला म्हणायचा, मुलांचं भविष्य कठीण आहे आपल्या.
मग, यावर मार्ग काय? का मार्गच नाही कुठला?
असं कसं? प्रत्येक समस्येवर उत्तर असतंच की! नाही तर आपल्याला शोधून काढावं लागतं.
तुम्ही काढलंयत?
असं वाटतंय मला. म्हणूनच तुम्हाला विचारावं म्हटलं.

संबंधित बातम्या

असं म्हणता? मग, आम्हालाही सोडवा की आमच्या समस्येतून.
मी असं म्हणेन आबुराव की, आपापल्या पोराची, अपत्याची काळजी ज्याला त्याला असणारच. म्हणजे बघा, सोनियाबाईंना?
जन्माचीच युवराजांची काळजी असणार बिचार्‍यांना. त्यापायी पिझ्झापण गोड लागत नसणार त्या माऊलीला.
कबूल आहे; पण तुम्हाआम्हाला युवराजांची काळजी असेल, तर काँग्रेसबरोबर जावं लागेल. चालेल?
जरा विचार करावा लागेल.

बरं, हिंदूहृदयसम्राटांच्या पोराबाळांची काळजी वाटत्ये का तुम्हाला? मग, सेनेबरोबर जावं लागेल. आहे मान्य?
बघतो. विचार करतो. शिवाय त्यांच्याबरोबर जायचं म्हटलं की दरवेळेला डायरेक्ट कृतीची तयारी हवी. तीही झेपणार की नाही ते बघतो.
बघा काय बघता ते. बाकी बारामतीकरांचं काय करता? त्यांना झाली तरी कन्येची काळजी असणारच ना?
भले! ते आख्ख्या सख्ख्या, चुलत खानदानाची काळजी घ्यायला समर्थ आहेत. मी काय पुरणार त्यांची काळजी वाहायला?
तरीपण पोरीची जात म्हणून बारामतीकरांच्या कन्येची काळजी करायची असेल, तर तुम्हाला राष्ट्रवादीत जावं लागेल. कशी वाटते आयडियाची कल्पना?

डेंजर वाटते. उडत्या पक्ष्याची पिसं मोजणार्‍यांच्या पक्षात जाणं सोपं का जाणार आहे?
म्हणजे शेवटाच्या एंडला तुम्हाला फक्त स्वतःच्याच मुलांची काळजी वाटते म्हणा की!
हो. आपण सामान्य लोकांनी आपल्यापुरतं बघावं न् काय? मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण काय करावं?
त्यांच्या भवितव्यासाठी एकच करावं, सध्याच्या सरकारला आपला संपूर्ण आणि सक्रिय पाठिंबा द्यावा.

Back to top button