जगाला दिशा दाखवणारा नवा भारत | पुढारी

जगाला दिशा दाखवणारा नवा भारत

केंद्रातील मोदी सरकारला 8 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने केंद्रात आठ वर्षे पूर्ण केली. रालोआच्या या आठ वर्षांच्या कालावधीकडे नव्या भारताच्या निर्माणाचा प्रवास म्हणून मी पाहतो. हा नवा भारत आहे तरी कसा? नवा भारत म्हणजे एक सशक्त, सक्षम, सामर्थ्यवान आणि आत्मनिर्भर भारत आणि या भारताचा पाया रचण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठ वर्षांत केले.

या काळात देशापुढे कोव्हिडच्या साथीसह अनेक संकटे आणि आव्हाने उभी राहिली. मात्र, मोदी यांच्या कुशल नेतृत्वाखाली देश ताकदीने त्यांना सामोरा गेला आणि नव्या भारताच्या निर्माणाचा प्रवास सातत्याने चालू राहिला. जगातील मोठमोठ्या देशांनी कोव्हिडच्या आव्हानासमोर गुडघे टेकले होते तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’चे आवाहन केले आणि दाखवून दिले की, निर्धार पक्का असेल, तर संकटाचे रूपांतर संधीत करता येते.

निराश होत चाललेल्या भारतीय जनमानसात ‘आत्मनिर्भर भारत’च्या विचाराने नवी आशा निर्माण झाली आणि या संकल्पनेंतर्गत जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजने भारतीय अर्थव्यवस्थेत नव्याने प्राण फुंकले. सरकारच्या या सर्व प्रयत्नांमुळे कोव्हिडच्या संकटाचा सामना केल्यानंतरही भारतीय अर्थव्यवस्था आज जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे.

भारताची अर्थव्यवस्था आज सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे आणि ‘व्यवसाय करण्यातील सुलभते’च्या निर्देशांकाच्या यादीत वर्ष 2015 मध्ये 142 व्या स्थानावर असलेला भारत आता 63 व्या स्थानावर आला आहे. भारत जगासाठी गुंतवणुकीचे गंतव्यस्थान बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भरतेच्या मार्गावर निघालेल्या भारताचा प्रवास जगातील आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वेगाने सुरू आहे.

‘सबका साथ सबका विश्वास’ हा मोदी सरकारचा मूलमंत्र असून हे सरकार विकासाच्या सर्वसमावेशक मॉडेलसह मार्गक्रमण करत आहे. उज्ज्वला, आयुषमान भारत, मुद्रा, पीएम किसान सन्मान निधी, स्वच्छ भारत, सौभाग्य, आवास, थेट लाभ हस्तांतरण इत्यादी योजनांतून मोदी सरकारने देशातील गरिबांना केवळ सामर्थ्यवानच नाही, तर त्यांना सक्षम करण्याचा आणि सन्मानपूर्वक जगण्याची संधी प्राप्त करून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. याआधीच्या सरकारच्या काळातही योजना आखल्या जात असत; मात्र योजनांची व्याप्ती आणि त्यांच्या अंमलबजावणीचा वेग हे मोदी सरकारचे वैशिष्ट्य आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच गेल्या आठ वर्षांमध्ये गरीब आणि वंचित जनता देशाच्या सरकारची हितधारक (स्टेकहोल्डर) म्हणून जोडली गेली आणि अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात सामील झाली.

मोदी सरकारच्या काळात राष्ट्रीय सुरक्षेला देखील अभूतपूर्व बळ मिळाले. देशावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा काँग्रेसप्रमाणे केवळ निषेध व्यक्त करून हे सरकार गप्प बसत नाही, तर सर्जिकल स्ट्राईक आणि शत्रूच्या तळावर जाऊन थेट हवाई हल्ले करून शत्रूला नामोहरम केले जाते. हे परिवर्तन देशाच्या कणखर नेतृत्वामुळेच साध्य झाले. काँग्रेस सरकारच्या काळात ही गोष्ट नेहमी कानावर येत असे की, भारतीय सैन्याकडे शस्त्रास्त्रांची कमतरता आहे; मात्र आताचे सरकार देशाच्या सैन्यशक्तीला सर्व प्रकारची अत्याधुनिक शस्त्रे आणि आवश्यक सामग्री देण्यासाठी निरंतर प्रयत्नशील आहे.

राफेल विमाने देशाच्या आकाशाचे रक्षण करत आहेत, तर ‘एस-400’ सारखी उत्तम क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणाही देशाचे संरक्षण कवच म्हणून तैनात केली आहे. संरक्षण साहित्यासाठी इतर देशांवर अवलंबून राहणार्‍या भारताने 2019 मध्ये 10 हजार कोटी रुपयांची संरक्षण उत्पादने निर्यात केली असून 2025 पर्यंत 35 हजार कोटी रुपयांची निर्यात करण्याचे लक्ष्य आहे. हे सगळे शक्य झाले कारण मोदी सरकारसाठी राष्ट्रीय सुरक्षा हा राष्ट्रीय हिताचा विषय आहे, राजकारण नाही. आमचे सरकार याबाबत कदापि तडजोड करू शकत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावरही भारताचा गौरव वाढवण्याचे काम केले. हवामानबदल विषयक संकटाबाबत जगाला मार्गदर्शन करणे असो किंवा कोव्हिडविरुद्धच्या भारताच्या लढ्यात जगासमोर आदर्श ठेवणे असो, या सर्व गोष्टींनी जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा वृद्धिंगत केली आहे. एवढेच नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जगातील कोणत्याही देशाला भेट देतात किंवा कोणत्याही जागतिक मंचावर आपली उपस्थिती दर्शवितात तेव्हा त्यांच्या वक्तव्यांमध्ये भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा उल्लेख आढळतो.

आपल्या वक्तव्यांच्या माध्यमातून ते जगाला भारताकडे पाहण्याची नवी द़ृष्टी देतात. आता जगातील कोणत्याही महासत्तेपुढे न झुकता देशाच्या हितासाठी भारत स्वतंत्रपणे आपले मत प्रकट करतो. आज मोदींना संयुक्त राष्ट्रांसह जगातील अनेक देशांनी सन्मानित केले आहे, हेदेखील भारताच्या जगभरातील वाढत्या प्रतिष्ठेचेच द्योतक आहे. गेल्या आठ वर्षांत भारताची महान संस्कृती आणि परंपरा केवळ देशातच पुनर्प्रतिष्ठित झाली असे नाही, तर पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांमुळे भारतीय संस्कृतीला जागतिक गौरवही प्राप्त आहे. भारताच्या योगविद्येला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळणे हे त्याचेच एक उदाहरण आहे.

मोदी देशहिताचे मोठे आणि कठोर निर्णय जर घेत असतील, तर त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे लोकांचा त्यांच्यावर असलेला अपार विश्वास हे आहे. आज जनतेचा मोदींच्या नेतृत्वावर इतका विश्वास आहे की, लोक स्वतःच त्यांचे निर्णय पुढे नेण्यास सुरुवात करतात. स्वच्छ भारत अभियानाचे आवाहन असो, गॅसवरील अनुदान सोडण्याचे आवाहन असो, नोटाबंदीचा निर्णय असो की, लॉकडाऊनची घोषणा असो, या सर्व प्रकरणांमध्ये मोदींच्या आवाहनावर जनतेने ज्या प्रकारे सरकारला सहकार्य केले, ती सर्व उदाहरणे मोदींच्या विषयीचा जनतेच्या मनातील फक्त प्रचंड विश्वासच दाखवतात.

आज मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण होत असताना आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या अमृत कालावधीत पूर्ण झालेली ही आठ वर्षे पुढील पंचवीस वर्षे देशाला पुढे नेण्यासाठी अनुकूल स्थिती घडवून त्यासाठी दिशादर्शक ठरणार आहेत. मला विश्वास आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या आठ वर्षांत देशाने नव्या भारतासाठी जी भक्कम पायाभरणी केली आहे, त्यातूनच येत्या काळात जगाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम, सशक्त आणि स्वावलंबी भारत आकाराला येईल.

अमित शहा,
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री

Back to top button