सेंटिनेलीज आदिवासींची भगिनी | पुढारी

सेंटिनेलीज आदिवासींची भगिनी

बंगालच्या उपसागरात असलेल्या नॉर्थ सेंटिनेल आयलंडवरील आदिवासींची सौहार्दपूर्ण भेट घेणारी महिला म्हणून मधुमाला चट्टोेपाध्याय यांना ओळखले जाते. बेटाबाहेरील कोणत्याही व्यक्‍तीस शत्रू मानणार्‍या या आदिवासींनी मधुमाला यांचे स्वागत बहीण असल्यासारखेच केले होते.

अंदमानच्या क्षेत्रात असलेल्या नॉर्थ सेंटिनेल बेटाला एक संरक्षित क्षेत्र म्हणूनच घोषित करण्यात आलेले आहे. या बेटावर हजारो वर्षांपासून पाषाणयुगाप्रमाणेच अजूनही जीवन जगणारे आदिवासी आहेत. या सेंटिनेलीज आदिवासींनी कधीही आपले बेट सोडलेले नाही की बाहेरच्या लोकांना आपल्या बेटावर येऊ दिलेले नाही. तिथे जाण्याचा प्रयत्न करणारी व्यक्‍ती जिवंत परत येत नाही, इतके ते लोक आक्रमक आहेत. अशा लोकांना स्वतःच्या हाताने फळे देणारी एक धाडसी महिला आपल्या देशात आहे. या महिलेचे नाव मधुमाला चट्टोपाध्याय.

अंदमान व निकोबारमधील आदिवासींबाबत महत्त्वाचे संशोधन करणार्‍या त्या एक ख्यातनाम अँथ्रोपोलॉजिस्ट आहेत. मूळच्या प. बंगालच्या असलेल्या मधुमाला यांना वयाच्या बाराव्या वर्षापासूनच अंदमानच्या बेटांवरील आदिवासींच्या जीवनाविषयी कुतूहल वाटू लागले होते. कोलकाता युनिव्हर्सिटीतून अँथ्रोपोलॉजी विषयातील पदवी घेतल्यावर त्यांनी याच आदिवासींविषयी संशोधन करण्याचे ठरवले. याबाबत पीएच.डी. करण्यासाठी त्यांनी अँथ्रोपोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडे फेलोशिपसाठी अर्ज केला. या विषयात त्यांनी पीएच.डी. संपादनही केली. अंदमानच्या बेटांवर जाऊन जगापासून फटकून राहणार्‍या आदिवासींबाबत ‘फिल्ड वर्क’ करणे किती कठीण आहे, याची आपण कल्पना करू शकतो. एक महिला म्हणून तर त्यांना या मार्गात अनेक अडचणी होत्या. त्यांना फेलोशिप मंजूर झाली, तरी तेथील धोक्यांबाबत त्यांच्याकडून एक करारही लिहून घेण्यात आला होता.

4 जानेवारी 1991 मध्ये अंदमानच्या सेंटिनेलीज आदिवासींबरोबर शांततापूर्ण भेट घेण्यासाठीच्या एका पथकाच्या त्या सदस्य बनल्या. तेथील आदिवासींची भेट घेणार्‍या त्या पहिल्याच महिला होत्या. त्यावेळी त्या अँथ्रोपोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाशी ‘रिसर्च असोसिएट’ म्हणून निगडीत होत्या. ‘एम.व्ही. तारमुगली’ या स्थानिक प्रशासनाच्या जहाजातून हे तेरा जणांचे पथक गेले. जहाजातून ते एका छोट्याशा होडीतून बेटाच्या किनार्‍याजवळ गेले. तेथे त्यांनी भेटीदाखल समुद्राच्या पाण्यावर नारळ फेकून या आदिवासींशी संपर्क प्रस्थापित करण्याचा पहिला प्रयत्न केला. त्यावेळी बेटावरून काही सशस्त्र लोकांनी येऊन कोणताही उपद्रव न देता हे नारळ गोळा करून नेले. दुसर्‍या वेळी हे पथक गेले असता एका आदिवासीने मधुमाला यांच्यावर धनुष्यबाण रोखले होते.

त्यावेळी एका स्थानिक आदिवासी महिलेने त्याला शस्त्र खाली करण्यास सांगितले व मधुमाला बचावल्या. या प्रसंगाने न डगमगता तिसर्‍या भेटीवेळी मधुमाला व त्यांचे सहकारी पाण्यात उतरले व त्यांनी स्वतःच्या हातानेच या आदिवासींना नारळ दिले. पथकातील एका व्यक्‍तीने या घटनेचेे फोटोही टिपून घेतले. अशा चार मोहिमांनंतर आणखी मोहिमा करण्यास भारत सरकारने बंदी घातली. बाहेरील लोकांच्या संपर्काने या आदिवासींना कोणत्याही आजाराचे संक्रमण होऊ नये, असा यामागे उद्देश होता. ‘नॅशनल जिओग्राफिक’ला दिलेल्या एका मुलाखतीत स्वतः मधुमाला चट्टोपाध्याय यांनीही या निर्णयाचे समर्थन केले. ‘या आदिवासींना बाहेरच्या जगाच्या कोणत्याही मदतीची गरज नाही. ते त्यांच्या जगात खूश आणि सुरक्षित आहेत. त्यांना केवळ एकटे सोडणेच गरजेचे आहे’ असे त्यांनी म्हटले आहे. मधुमाला यांनी ओंग किंवा जरावा आदिवासींचीही भेट घेऊन त्यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध स्थापन केले होते. 1991 ते 1999 या काळात त्यांनी अनेक वेळा या आदिवासींची भेट घेतली. तेथील महिलांनी त्यांना बहिणीसारखीच वागणूक दिली. त्यांना घरात बोलावले, खाऊ घातले, मुलाबाळांशी खेळू दिले. सध्या राजधानी दिल्लीत राहणार्‍या मधुमाला यांनी एक संशोधक आणि महिला म्हणूनही केलेली ही कामगिरी संस्मरणीयच आहे.

Back to top button