अस्तनीतला खंजीर अन् सत्तेचा ढाचा! | पुढारी

अस्तनीतला खंजीर अन् सत्तेचा ढाचा!

उद्धव यांच्या सत्तेचा ढाचा युतीच्या धर्मस्थळावर अतिक्रमण करून उभा आहे. तो खाली खेचण्याचा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आता दिला. हा ढाचा पाडण्यासाठी फडणवीस यांना त्यांचे राजकीय वजन कदाचित वापरावे लागणार नाही. महाविकास आघाडीचा करारनामा घडी घालून खिशात ठेवत, राष्ट्रवादी काँग्रेसने बाहेर काढलेला खंजीरच ही कामगिरी बहुधा चोख बजावणार!

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भात्यात बाण कमी आणि टोमणे जास्त, असे म्हटले जाते. शनिवारी मुंबईच्या बीकेसीमध्ये झालेल्या विराट सभेतही उद्धव यांनी टोमण्यांचा वर्षाव केला. म्हणजे हातात धनुष्यबाण आणि वर्षाव मात्र टोमण्यांचा, असे ते दृश्य होते. विषय बाबरी मशिदीचा निघाला आणि बाबरी पडली तेव्हा तिथे कोण होते, नव्हते यावरून सुरू असलेल्या राजकीय कलगीतुर्‍याला उद्धव यांनी आपलाही एक तुरा जोडून टाकला. बाबरी पडली तेव्हा शिवसेनेचे कुणीही नव्हते, मी मात्र होतो, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बूस्टर सभेत सांगितले. त्याला उत्तर म्हणून बाबरी पडताना शिवसेनेकडून जे कोणी होते त्यापैकी एकाचेही नाव उद्धव यांना सांगता आले असते. बाबरीच्या खटल्यात जे पहिले 32 आरोपी निर्दोष सुटले, त्यात शिवसेनेचे तत्कालीन नेते सतीश प्रधान होते. मात्र, नंतर ते भाजपमध्ये गेले. त्यांचे नाव कसे घ्यायचे? फडणवीस सरकारमध्ये उद्योग राज्यमंत्री राहिलेले अतुल सावे यांचे वडील आणि शिवसेनेचे माजी खासदार स्व. मोरेश्वर सावे हेदेखील बाबरी पडली तेव्हा औरंगाबादच्या शिवसैनिकांच्या जथ्यासह तिथे हजर होते. त्यांच्यावरही बाबरी खटल्याचे वॉरंट निघाले आणि कोर्टाच्या वार्‍या त्यांनीही केल्या. बाबरी पडल्यानंतर सावे जेव्हा औरंगाबादला परतले तेव्हा त्यांचे जंगी स्वागत झाले आणि त्यांना ‘धर्मरक्षक’ म्हणून उपाधी देण्यात आली. मराठवाड्यातील शिवसेनेचे पहिल्या पिढीतील जे बिनीचे शिलेदार होते त्यातील परशुराम वाखुरे यांनी ही आठवण जागवली आणि सावेंचे नाव कुणीच कसे घेत नाही, असा प्रश्न उपस्थित केला. सावेंचे चिरंजीव आज भाजपमध्ये आहेत, म्हणून कदाचित उद्धव यांनी धर्मरक्षक मोरेश्वर सावेंचेही नाव घेणे टाळले असेल. म्हणजे अयोध्येला बाबरी पाडण्यासाठी गेलेली जी नावे ‘मातोश्री’ला ज्ञात आहेत ती देखील नावे सभेत घेतली जात नाहीत. हा तसा कृतघ्नपणाच म्हणता येईल. बाबरी पडताना शिवसेनेचे कोण कोण होते हे न सांगता टोमण्यांचा वर्षाव करीत उद्धव हे देवेंद्र फडणवीस यांच्या शारीरिक वजनावर घसरले. म्हणाले, तुम्ही बाबरीवर चढण्याचा प्रयत्न केला असता तर तुमच्या वजनानेच ती खाली आली असती. कारसेवकांना ती पाडण्याचे कष्टच करावे लागले नसते. खरे तर हे फार चांगले व्यंगचित्र उद्धव यांनी भाषणातून उभे केले. मात्र, ते तसे निरोगी म्हणता येत नाही. फडणवीस यांनीही म्हणूनच हा टोमणा परतवून लावला. उद्धव यांच्या सत्तेचा ढाचा युतीच्या धर्मस्थळावर अतिक्रमण करून उभा आहेे. हा ढाचा एक दिवस खाली खेचला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. हा ढाचा भाजपला रोज दिसतो आणि जखम भळभळत राहते. परंतु, हा ढाचा पाडण्यासाठी फडणवीस यांना आपले राजकीय वजन वापरण्याची कदाचित गरजही भासणार नाही. उद्धव सरकारच्या सत्तेचा ढाचा खाली खेचण्यास राष्ट्रवादीचा खंजीर समर्थ असल्याचे गोंदियात दिसले. गोंदिया जिल्हा परिषद शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून लढवली. मात्र, निवडणूक होताच राष्ट्रवादीने उपाध्यक्षपद स्वत:कडे घेत भाजपशी हातमिळवणी केली. राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. खरे तर त्याचे पडसाद महाराष्ट्र विकास आघाडीच्या सत्ताकारणात उमटणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. सरकारमधील काँग्रेसचा एकही मंत्री याबद्दल चकार शब्द बोलला नाही. बोलले ते फक्त पटोले. अर्थात, ते भाजपमधून आलेले असल्याने खंजिराची भाषा करत आहेत, असे उत्तर त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले. दगाफटका करूनच्या करून जी शिरजोरी राष्ट्रवादीने दाखवली त्यात महाराष्ट्र विकास आघाडीच्या बिघाडीची बीजे पेरली गेली आहेत. काँग्रेसने आजवर आमच्याही पाठीत खंजीर खुपसले आहेत, असे जयंत पाटलांचे म्हणणे आहे; पण तो इतिहास झाला. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी असा महाराष्ट्र विकास आघाडीचा प्रयोग सुरू होऊन अडीच वर्षे उलटली. आता सत्ता स्थिरावली, असा अंदाज आल्यानंतर स्थानिक निवडणुका एकत्र लढविण्याचा करार या तीन पक्षांनी गेल्या जानेवारीत केला. तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी संयुक्त आवाहन पत्र जारी करण्यात आले. या आवाहन पत्रावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पहिली सही आहे. दुसरी सही शिवसेना नेते सुभाष देसाईंची, तर तिसरी सही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची. त्यानंतर चौथ्याच महिन्यात राष्ट्रवादीने या पत्राची सुरळी करून खिशात घालत अस्तनीतला खंजीर काढला आणि गोंदियात काँग्रेसला दगाफटका केला. महाराष्ट्र विकास आघाडीचे करार मदार होतात, संयुक्त सह्यांनी आवाहन केले जाते. कार्यकर्ते पक्षभेद विसरून आघाडीसाठी झटतात आणि अचानक पाठीत खंजीर खुपसला जातो, हे कुणाच्याही पचनी पडणारे नाही. राष्ट्रवादी हे भरवशाचे कूळ नव्हे, असे आजवरचे राजकीय अनुभव कानीकपाळी ओरडून सांगत आले आहेत. तरीही भाजपचा अश्वमेध रोखायचा म्हणून काँग्रेसने राष्ट्रवादीवर विश्वास टाकला. शिवसेनाही आज भाजपपासून इतकी दुरावली की, तिलाही राष्ट्रवादीशिवाय अन्य पर्याय उरलेला नाही. या आपल्या दोन मित्रांकडे राष्ट्रवादी मात्र औटघटकेचे आणि सत्तेपुरते संबंध म्हणून पाहते. काँग्रेसच्या ते आता गोंदियात लक्षात आले. शिवसेनेला अजून असा झटका बसायचा आहे. तो बसेल तेव्हा युतीच्या धर्मस्थळावर उभा राहिलेला महाराष्ट्र विकास आघाडीचा ढाचा कोसळायला सुरुवात झालेली असेल.

Back to top button