नवसंकल्प काँग्रेसला पचेल? | पुढारी

नवसंकल्प काँग्रेसला पचेल?

अजूनही यौवनात असल्याची काँग्रेसच्या बड्या नेत्यांची धारणा झाली असावी. त्यामुळेच 2024 च्या निवडणुकांची तयारी करताना अनेक कठोर निर्णयांद्वारे काँग्रेसला अपयशाच्या दलदलीतून बाहेर काढून पुन्हा एकदा भरभराटीच्या शिखरावर नेण्याचा चंग हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बांधला आहे. गेल्या काही वर्षांत झपाट्याने जराजर्जर होत गेलेल्या या पक्षाला नवतारुण्याची रग कशी मिळवून दिली जाणार, हा खरा प्रश्न आहे.

राजीव गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसमधील बुलंद नेत्यांची मालिका खंडित झाली. त्याचवेळी केडरबेस नेत्यांची मांदियाळी असलेले प्रादेशिक पक्ष अनेक राज्यांत वाढत होते. भाजपने राजकीय चतुराई दाखवून याच काळात या प्रादेशिक पक्षांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून काँग्रेसला आव्हान देण्याची तयारी सुरू केली होती. राजीवजींच्या हत्येनंतर काँग्रेस गांधी -नेहरू घराण्याचेच नेतृत्वधार्जिणे असल्याच्या मानसिकतेतून बाहेर येत नव्हती. त्यासाठी सोनिया गांधी यांच्या घराचे उंबरठे नेते झिजवत होते. सोनियांनी मौन राहून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सतत अनिश्चिततेच्या गर्तेत ठेवले. अखेर नरसिंह राव यांना पंतप्रधानपदावर बसवून काँग्रेसच्या काही नेत्यांनीच काँग्रेस आणखी हतबल होईल याची पुरेपूर काळजी घेतली. नरसिंह राव पंतप्रधान असताना खुल्या अर्थव्यवस्थेच्या धोरणामुळे देश पुढे गेला; पण काँग्रेस मात्र शक्तिहीन होत गेली, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

याच दरम्यान सोनिया गांधी राजकारणात येण्याचा प्रयत्न करीत होत्या; पण अधूनमधून बोफोर्सचे भूत उभे करून नरसिंह राव यांच्यासह एका गटाने सोनिया गांधींना शह देण्याची पुरेपूर काळजी घेतली. परिणामी समाजात खोलवर रुजलेली काँग्रेसची पाळेमुळे कमकुवत होत गेली.

सोनिया गांधींचे मौन आणि बाबरी मशिदीच्या पतनानंतर काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदी आलेले सीताराम केसरी वगैरे नेते स्वयंप्रकाशित कधीच नव्हते. मनमोहन सिंग पंतप्रधान झाल्यानंतर स्वच्छ प्रतिमेचा नेता मिळाल्याचा आनंद काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांना झाला खरा; पण पुढे डागाळलेल्या मंत्रिमंडळाचा स्वच्छ नेता असा त्यांचा लौकिक-बदलौकिक तयार झाला. त्याच दरम्यान भाजपनं नरेंंद्र मोदी यांच्यासारख्या गुजरातमधील वलयांकित नेत्याला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित करून निवडणुका लढविल्या. नरेंंद्र मोदी यांच्या सात वर्षांतल्या चकाचौंध कारकिर्दीत काँग्रेस आणखी दुर्बल झाली. भाजप आणि नरेंंद्र मोदी यांनी अत्याधुनिक प्रचारतंत्राचा वापर करून काँग्रेस आणखी दुर्बल केली. घराणेशाही हा जणू काँग्रेसचा आत्माच बनला असताना एका घराण्यात एकच, तेदेखील पक्षाचे नियमित काम केलेल्या उमेदवारालाच उमेदवारी दिली जाईल, असे हंगामी अध्यक्षांना जाहीर केले आहे. हे निर्णय कठोर असले तरी काटेकोरपणे पाळले जातील, असेही त्यांनी म्हटले आहे.

आजारपणामुळे सोनियांनी पक्षाची कमान राहुल गांधींकडे सोपवली. मात्र, त्यानंतर पक्षात प्रचंड असंतोष निर्माण झाला. सुंदोपसुंदीला ऊत आला. ज्यांनी पक्षाच्या जीवावर आपल्या पोळ्या भाजून घेतल्या तेच कर्तृत्वशून्य नेते पक्षनेतृत्वाला आव्हान देऊ लागले. राहुल गांधींमधील नेतृत्वगुणांबद्दल शंका व्यक्त होऊ लागल्या. अखेर पक्षाध्यक्षपद रिकामे ठेवून सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष झाल्या. तरीही पक्षाची अवस्था सुधारण्याचे नाव घेत नाही, हे पाहून आता नवसंकल्प करण्याचा चंग बांधून सोनियांनी उदयपूरचे शिबिर घेतले.

या नवसंकल्पांतला सर्वात महत्त्वाचा संकल्प एका घराण्यात एकालाच उमेदवारी, हा आहे. खरोखरच हा नियम काटेकोर पाळला जाईल? अर्थात, याला पहिला अपवाद असेल, तो गांधी घराण्याचा, हे उघड आहे. सोनिया गांधी रायबरेलीतून आणि राहुल गाधी वायनाड येथून निवडून आले आहेत.

परंतु वास्तव हे आहे की, काँग्रेस पक्ष अजूनही पूर्वपुण्याईवरच जगू पाहतोय. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता ही पूर्वपुण्याईची शिदोरी सत्तापदापर्यंत पोहोचण्याची ताकद काँग्रेसला देऊ शकेल असे वाटत नाही. त्यासाठी नवयुगाची जाणीव स्वतःलाच करून घ्यावी लागेल. तसे झाले नाही, तर केवळ जुनीपुराणी झालेली भरजरी वस्त्रे मिरवणे निरर्थक ठरेल!

– उदय तानपाठक

Back to top button