पंडित शिवकुमार : संतूरवादनातील सूर्य | पुढारी

पंडित शिवकुमार : संतूरवादनातील सूर्य

संतूरवादक पंडित शिवकुमार हे श्रेेष्ठ गुरू होते. त्याचबरोबर ते एक फिलॉसॉफर होते. मी जे काही सादर करत आहे, ते माझे नसून ईश्वर माझ्याकडून ते करवून घेत आहे, हाच त्यांचा भाव अखेरपर्यंत राहिला.

पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रातील एक तारा निखळला आहे. पंडितजींचा जन्म काश्मीरमध्ये झाला. संतूर हे वाद्यही मूळचं काश्मीरचं लोकवाद्य. परंतु, शास्रीय संगीतात आणि चित्रपट संगीतामध्ये या वाद्याला आणण्याचं सर्व श्रेय पंडित शिवकुमार शर्मा यांना जाते. संतूर या वाद्यावर भारतीय शास्त्रीय संगीत वाजवणारे ते पहिले संगीतकार मानले जातात. त्यांच्या वडिलांनी म्हणजेच उमा दत्त शर्मा यांनी या वाद्याशी त्यांची ओळख करून दिली. तेच त्यांचे गुरू. परंतु, शिवजींनी त्यामध्ये नवनवीन सुधारणा करून या लोकवाद्याला शास्त्रीय संगीतात स्वतंत्र वाद्य म्हणून स्थान मिळवून दिले. यासाठी त्यांनी खूप कष्ट केले. वयाच्या 13 व्या वर्षापासून शिवजींनी संतूर शिकण्यास प्रारंभ केला होता.

देशभरात त्यांचे संतूरवादनाचे सतत कार्यक्रम असायचे. त्यामुळे ते नेहमी व्यस्त असत. अशा काळात मला त्यांच्याकडे शिकण्याची संधी मिळाली. मी जेव्हा संतूर शिकवायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे दोन शिष्य माझ्याकडे पाठवले आणि ‘तुम इनको सिखाना शुरू करदो’ असे सांगितले. त्यांनीच एकहाती संतूरला जगभर प्रतिष्ठा मिळवून दिली. आपण लावलेले रोपटे बहरताना, त्याचा वटवृक्ष होताना पाहून त्यांना मनस्वी आनंद व्हायचा.

संबंधित बातम्या

पंडित शिवकुमार हे केवळ गुुरू नव्हते. ते एक उत्तम फिलॉसॉफर होते. अनेक प्रसंगांमधून त्यांनी मला वाट काढून दिली. त्यांची मूळची बांधणी ही अध्यात्मिक होती. मी जे काही सादर करत आहे, ते माझे काही नाही; ईश्वर माझ्याकडून ते करवून घेत आहे, हाच त्यांचा भाव अखेरपर्यंत राहिला. अहंभावाचा स्पर्श त्यांना कधीच झाला नाही. साहजिकच शिष्यांवरही नैसर्गिकपणे तसे संस्कार होत गेले. अतिशय नम्र व्यक्तिमत्त्व म्हणूनच आम्ही आयुष्यभर त्यांना पाहिले. ते मितभाषी, मृदू स्वभावाचे होते. इतरांकडून काही चूक झाल्यास ती समजावून सांगण्याची त्यांची शैली अनुकरणीय होती. साहजिकच आम्हीही शिष्य म्हणून सदैव त्यांच्यापुढे लीन होऊन राहायचो; पण गुरू-शिष्यांपलीकडचे आमचे नाते होते. याचे कारण दुजाभाव किंवा कुणासोबत अंतर ठेवणे हा त्यांचा स्वभाव नव्हता.

सुरुवातीला या वाद्यानुसार ते अलंकार शिकवायचे. त्याची तयारी पूर्ण झाल्याशिवाय राग शिकवायचे नाहीत. एका रागाची रचना हातात बसल्याशिवाय दुसरा राग शिकवायचे नाहीत. ज्याला खानदानी शिक्षण म्हटले जाते, तशा पद्धतीने ते शिकवायचे. महत्त्वाचे म्हणजे संतूर शिकवण्यासाठी त्यांनी कधीच पैसे घेतले नाहीत. ज्याला संतूर शिकायचे आहे, परफॉर्मर व्हायचे आहे आणि संतूर वादनाची परंपरा पुढे घेऊन जायची आहे त्यांना ते अत्यंत आनंदाने शिकवायचे. संगीतात कुठल्याही गोष्टीला शॉर्टकट नाही, हे त्यांचे नेहमीच सांगणे असायचे. प्र्रत्येकाने भरपूर रियाज केला पाहिजे आणि तो अविरत सुरु राहिला पाहिजे हा त्यांचा आग्रह असायचा. तुमचे सादीरकरण तुम्हाला स्वतःला मंत्रमुग्ध करणारे आहे का, याचा शोध घ्या, ही त्यांची शिकवण होती. कारण, कोणत्याही कलाकाराला त्याची कला सादर केल्यानंतर स्वतःला आनंद मिळत असेल, तर त्यातून दुसर्‍याला आनंदानुभूती येईल, असे त्यांचं सांगणे असायचे. संतूर वादनाच्या कोणत्याही कार्यक्रमाकडे ते एक पूजा म्हणून पाहायचे. त्यामुळं त्यांचा एकही कार्यक्रम रटाळ झाला नाही. कारण, कामचलाऊपणाने सादरीकरण करणे हा त्यांचा पिंडच नव्हता. त्यांचे प्रत्येक सादरीकरण हे अत्यंत तल्लीनतेने, एकाग्रतेने आणि तन्मयतेने असायचे. त्यामुळेच त्यांचा प्रत्येक कार्यक्रम हा रंगतदार व्हायचा आणि रसिकश्रोते मंत्रमुग्ध व्हायचे. इतक्या श्रेष्ठ दर्जाचे वादन करूनही विद्यार्थीभावामुळे त्यांच्यातील नवनिर्मितीची प्रक्रिया शेवटपर्यंत सुरू राहिली. असा हा निःस्पृह, मनस्वी गुरू आम्हाला सोडून गेला आहे, याची खंत सदैव जाणवत राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

– पं. धनंजय दैठणकर
(पं. शिवकुमार शर्मांचे शिष्य)

Back to top button