विरोधकांची कसोटी | पुढारी

विरोधकांची कसोटी

लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे आणि काँग्रेस पक्ष वगळता बहुतेक पक्षांनी त्याद़ृष्टीने मोर्चेबांधणीला प्रारंभ केला आहे. निवडणूक एनडीए आणि यूपीए अशी दोन आघाड्यांमध्ये होणार की, भाजप, काँग्रेस आणि तिसर्‍या आघाडीमध्ये होणार की, बहुरंगी होणार, याची उत्कंठा सगळ्यांनाच आहे; परंतु त्यासंदर्भातील चित्र एवढ्यात स्पष्ट होण्याची शक्यता नाही. गुजरात, हिमाचल प्रदेश या राज्यांच्या निवडणुकांनंतर धुके विरळ होऊन चित्र स्पष्ट होऊ लागेल. कारण, ही दोन राज्ये भाजप पुन्हा काबीज करणार, भाजपच्या विरोधात मजबूतपणे काँग्रेस उभी राहणार की, काँग्रेसला मागे ढकलून आम आदमी पक्ष ती जागा घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्याअर्थाने देशातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून ओळख असलेल्या काँग्रेसची ही ओळख टिकणार की आम आदमी पक्ष ती हिरावून घेणार, याचा फैसला या दोन राज्यांमध्ये होणार आहे. दिल्लीपाठोपाठ पंजाबची सत्ता मिळवून आम आदमी पक्षाने घोडदौड सुरू केली आहे, ती देशपातळीवर भाजपला पर्याय बनण्याच्या द़ृष्टीनेच. आधी या पक्षाकडे फक्त दिल्लीची सत्ता होती, तीही अर्धीमुर्धी. कारण, पोलिसांपासून जमीन व्यवहारापर्यंत कसलेही अधिकार दिल्लीच्या सरकारकडे नसतात; परंतु मर्यादित अधिकारांमध्ये दिल्ली सरकारने आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात जे काम केले, ते घेऊन हा पक्ष पंजाबच्या निवडणुकीत उतरला आणि काँग्रेस तसेच शिरोमणी अकाली दल या दोन पारंपरिक पक्षांचे वर्चस्व मोडून काढून घसघशीत बहुमताने पंजाबची सत्ता मिळवली. या राज्यात भारतीय जनता पक्षाला वर्षांनुवर्षे जे जमले नाही, ते आम आदमी पक्षाने करून दाखविले, त्यामुळे जसा काँग्रेससाठी हा झटका होता, तसाच भाजपसाठीही होता. तुम्ही प्रत्यक्षात राजकारण काहीही करा; परंतु लोकांपुढे जाताना विकासाचे मुद्दे घेऊन गेलात तर जनता त्याला प्रतिसाद देते, हेच आम आदमी पक्षाच्या पंजाबमधील ताज्या यशाने दाखवून दिले. एकीकडे राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस पक्षाची निष्क्रियता वाढत जाऊन तो गलितगात्र बनत असताना आम आदमी पक्षाने काँग्रेसची जागा घेण्याची तयारी चालवली आहे. भाजपचे नेते या बदलत्या राजकीय पटलाकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत, असे दिसते. येणार्‍या निवडणुकांतून त्यामागची रणनीती स्पष्ट होईल. गोव्याचे उदाहरणही त्यासाठी पुरेसे ठरावे. राजधानी दिल्लीत आम आदमी पक्षाला केंद्र सरकारशी रोजच संघर्ष करावा लागत आहे. रस्त्यावरील लढाईपासून सोशल मीडियापर्यंत सर्व पातळ्यांवर हा संघर्ष सुरू असतो. आपण भाजपशी लढण्यात कोणत्याही पातळीवर कमी पडत नाही, असा संदेशच त्याद्वारे जनतेला दिला जात असतो. लोकांना भाजपला पर्याय म्हणून एखाद्या पक्षाची निवड करायची असेल तर तो पक्ष काँग्रेस नव्हे तर आम आदमी पक्षच असावा, यासाठी अरविंद केजरीवाल कामाला लागले आहेत.

वर्तमान राजकीय चौकटीत लोक नेहमीच एका चांगल्या पर्यायाच्या शोधात असतात. प्रस्थापित पक्षांपैकी कुणी नव्या नेतृत्वाचा प्रयत्न केला किंवा नवा विषय घेऊन रान उठवले तर ते त्याचा लाभ उठवू शकतात; परंतु दुर्दैवाने सध्याच्या प्रस्थापित पक्षांपैकी कुणीही तसा विश्वास जनतेला देऊ शकलेले नाही. त्यामुळे दिल्लीची अर्धी सत्ता असलेल्या केजरीवाल यांच्या पक्षाने त्याद़ृष्टीने स्वतःला देशाच्या राजकारणात झोकून दिले आहे. जिथे जिथे काँग्रेस प्रभावी आहे, तिथे तिथे मैदानात उतरण्याची रणनीती त्यांनी ठरवली आहे. आम आदमी पक्ष ही भाजपची ‘बी टीम’ असल्याची टीका त्यामुळेच होते. काँग्रेससारख्या सेक्युलर पक्षाने किंवा अन्य डाव्या, समाजवादी पक्षांनी जागा व्यापून टाकण्याऐवजी जर आम आदमी पक्षासारख्या उजव्या पक्षाने ती व्यापली तर भारतीय जनता पक्षालाही ते हवेच आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाला आपल्या विरोधात खंबीरपणे उभे करण्यासाठी भाजपकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदतच केली जाते. दिल्लीतील तेजिंदरसिंग बग्गा या भाजप प्रवक्त्याच्या अटकेचे ताजे प्रकरण त्यासाठी पाहता येईल. पंजाब पोलिसांनी त्यांना दिल्लीतून अटक केल्यानंतर भाजपची सत्ता असलेल्या हरियाणा पोलिसांनी त्यांना अडवले आणि बग्गा यांची सुटका करून त्यांना परत पाठवले. पुन्हा पंजाबमधील न्यायालयाने त्यांच्या अटकेचे आदेश काढल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली. म्हणजे भाजपने तपास यंत्रणाही आम आदमी पक्षाच्या विरोधात उतरविल्या. भाजप-आम आदमी पक्ष यांच्यातील हा संघर्ष चर्चेत आला आणि आम आदमी पक्ष भाजपशी लढत असल्याचे चित्र देशभर गेले. हे एक वानगीदाखल उदाहरण झाले; परंतु देशभरात सध्या जे काही सुरू आहे, त्यात बर्‍या किंवा वाईट अशा कुठल्याच अर्थाने काँग्रेसचे अस्तित्व दिसत नाही. महाराष्ट्रातही भाजप, मनसेकडून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले जात आहे. तिथेही काँग्रेसचे कुणी नावही घेत नाही. काँग्रेसची अशी अवस्था असताना काँग्रेसचे सहप्रवाशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या डाव्या पक्षांचीही काही हालचाल दिसत नाही. सामाजिक पातळीवर डाव्यांचा संघर्ष अनेक पातळ्यांवर सुरू असला तरी राजकीय संघर्षात मात्र डाव्यांचे अस्तित्व अपवादानेच दिसते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर जोर-बैठका काढायच्या, जागावाटपावरून खेचाखेची करायची, परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करायचे आणि शेवटी आपापल्या मार्गाने निवडणूक लढवायची, असे चित्र अनेकदा दिसते. नियोजनबद्धरितीने काम करून निवडणुका लढवणार्‍या भारतीय जनता पक्षासमोर त्याचमुळे निभाव लागत नाही. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी घेतलेली भूमिका आणि त्याद़ृष्टीने केलेली मोर्चेबांधणी विशेष दखलपात्र ठरते. काँग्रेसची जागा व्यापून देशपातळीवर भाजपचा प्रमुख विरोधी पक्ष बनण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू असून, काँग्रेसची निष्क्रियता पाहता आम आदमी पक्षासाठी ते कठीण असले तरी फारसे अवघड नाही. तरी कसोटी लागणार ती भाजपच्या विरोधी पक्षांचीच.

Back to top button