लवंगी मिरची : सभा आणि भास | पुढारी

लवंगी मिरची : सभा आणि भास

अहो, बाहेर जाताय, जरा वीज बिल भरून या हो!
आण इकडे. नोटाही दे तेवढ्या.
हे घ्या. सोबत पाचशेच्या तीन, चार नोटा घ्या.
एवढं बिल? एकट्याचं? काय वीज वापरता का चेष्टा करता तुम्ही लोक?
अहो, या खेपेला बिलासाठी तेवढी वाढीव रक्कम लागणारच आहे.
रात्रंदिवस फुल्ल फॅन लावा. बंद खोल्यांमधले दिवे जाळा. मी आपला कामात घाम गाळून बिलं भरत राहतो.

महावितरणची कृपा आहे ही. या खेपेला दोन-दोन बिलं मारलीयेत माथी. एक नेहमीचं वीज वापराचं बिल, दुसरं अतिरिक्त सुरक्षा ठेवीचं बिल.
वीज वापरताना आम्ही घेऊ म्हणावं सुरक्षेची काळजी आणि सुरुवातीला वीज जोडणी करताना ठेवलीये ना काही तरी अनामत रक्कम की ठेव की कायसंस?
ती ठेव थोडीशीच होती हो! पण, पुढच्या वापरासाठी काहीतरी वेगळा फॉर्म्युला वापरलाय वाटतं त्यांनी.
तुला काय माहिती?

शेजारचे सुखात्मेकाका गेले होते वाटतं भांडायला त्या ऑफिसात. त्यांना सांगितलं म्हणे की, आता ती पहिली डिपॉझिटं कशी पुरणार? म्हणून म्हणे तुमच्या वर्षभराच्या वीज बिलांची सरासरी काढतात. ती जर सुरक्षा ठेव रकमेच्या दहा टक्क्यांहून जास्त आली, तर मूळ ठेवीत तेवढा आकार वाढवतात. त्याचं असं काही तरी गणित बसवलं आहे वाटतं.
अरे पण, आमच्या संसाराच्या गणितांचं काय? कुठूनच ताळा जुळेनासा झालाय की त्याचा!
काय करणार? हातात वहीचा पुठ्ठा धरून वारा घेत बसणार? की गारगोट्या घासून अग्नी पेटवणार? जा, भरून या बिल हातासरशी.

संबंधित बातम्या

कुठली कुठली वाढीव बिलं भरणार आपण? पेट्रोल एकशे दहा, एकशेवीसपर्यंत गेलंय. घरगुती गॅसचे भाव तीन महिन्यांमध्ये तीस टक्क्यांनी वाढलेत. दूध लिटरला साठ रुपयांच्या आसपास. रिक्षा, टॅक्सी मीटरचे दर सारखे वाढणारे. महागाई आणि बेकारी आ वासून बसलीये. सामान्य माणसाने जगायचं कसं?
राज्यकर्त्यांना असेलच की त्याची काळजी! आता एक मेला, ईदला, अक्षय तृतीयेला किती किती सभा झाल्यायत की राज्यभर!

हो तर; पण कोणीही कितीही सभा भरवल्या, तरी आपल्यासारख्यांना काही उपयोग नाही त्यांचा. उलट सभा म्हणजे भास फक्त! आपलं भलं होण्याचा भास!
असं इतकं निराशेने नका हो बोलू.

तूच आठव. एवढ्या सभांमध्ये कोणीतरी आजचे जगण्याचे प्रश्न आघाडीवर आणले का? कोणी त्यांना ‘मनसे’ भिडलं का? महा तर दूर, नजीकच्या छोट्या विकासाचा विचार तरी कोणी केला का?
मग, एवढे घसे फोडून सगळे एवढं बोलले काय?
नेहमीचंच. पूर्वी आम्ही यंव केलंय, पुढे आम्ही त्यंव करू. आजचं जगणं सोपं करायचा विचार कोणी करतं का सांग?
तो आपला आपण करायचा. प्राणनाथ, बिल भरलं नाही म्हणून वीज कापलीबिपली गेली, तर कुत्रं हाल खाणार नाही आपले. जा, सभांच्या भासातून सत्यात या. बिल भरून मोकळे व्हा!

Back to top button