शाहू विचारांचा जागर | पुढारी

शाहू विचारांचा जागर

राजर्षी शाहू छत्रपतींची जन्मशताब्दी आणि शिवराज्याभिषेक त्रिशत सांवत्सरिक महोत्सव कोल्हापुरात अतिभव्य स्वरूपात साजरे झाले, ते दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यामुळेच! लोकमान्य टिळकांमुळे शिवजयंती साजरी होऊ लागली. त्याप्रमाणे शासकीय पातळीवर शाहू जयंती साजरी करण्याचा निर्णय डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या प्रयत्नांमुळेच झाला, हे नमूद केले पाहिजे.

सन 1974 हे वर्ष मोठं वैशिष्ट्यपूर्ण ठरलं; लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांची जन्मशताब्दी आली होती; पण शाहूप्रेमींची मोठी मांदियाळी महाराष्ट्रात असतानाही ही गोष्ट कोेणाच्या गावीही आली नव्हती. सामाजिक कार्यकर्ते, इतिहासकार, राजकीय नेते, इतकंच नव्हे तर दस्तुरखुद्द छत्रपतींचे वंशज, यापैकी कोणीही त्याला अपवाद नव्हते. मात्र, याची मनाशी गाठ बांधली ती दै. ‘पुढारी’चे तत्कालीन कार्यकारी संपादक व सध्याचे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी.

10 मार्च 1974 रोजी प्रतापसिंहांनी कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहात निमंत्रक म्हणून व्यापक बैठक बोलावली. महोत्सव भव्य प्रमाणावर साजरा करण्याच्या त्यांच्या विचारांना सर्वांनीच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि बहुतेक सदस्यांनी ‘बाळासाहेब, यासंबंधीच्या व्यापक समितीचं अध्यक्षपद तुम्हीच स्वीकारावं!’ असा आग्रह धरला; पण या आग्रहाला प्रतापसिंहांनी नम्रपणे नकार देताना शाहू महाराज हे पददलितांच्या उद्धारासाठी अविरत झटल्याचे सांगून दलित समाजातील जिल्हाधिकारी शशिकांत दैठणकर यांनाच व्यापक समितीच्या अध्यक्षपदाचा मान द्यावा. तो खर्‍या अर्थानं राजर्षींच्या विचारांचा विजय असेल, असे त्यांनी सांगितलं.

मग, शशिकांत दैठणकर यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक समिती स्थापन करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. प्रतापसिंहांच्या खांद्यावर कार्याध्यक्षपदाची धुरा देण्यात आली. यावेळी आमदार पी. बी. साळुंखे, दलितमित्र बापूसाहेब पाटील, डी. एस. नार्वेकर, गोविंदराव पानसरे, गोपाळराव माने, मा. ई. कुरणे आदी सर्वपक्षीय नेते तसेच नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आदींचे पदाधिकारी, शिवाय सहकार, शैक्षणिक, सामाजिक आणि तालीम संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

सोहळ्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. समितीमध्ये जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांचा समावेश होता. त्याचबरोबर साखर कारखाने, सहकारी संस्था, तालीम मंडळे, शिक्षण संस्था, उद्योग अशा सर्व क्षेत्रांतील मान्यवरांना समितीत सहभागी करून घेण्यात आले. ही तयारी सुरू असतानाच प्रतापसिंहांनी मुंबईत जाऊन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची भेट घेतली. त्यांना शाहू महाराजांच्या कार्याची, त्यांनी रयतेसाठी जात-पात निर्मूलनासाठी, मागासवर्गीयांच्या उद्धारासाठी खाल्लेल्या खस्तांची माहिती देऊन शाहू जयंतीच्या आवश्यकतेबाबत समजावलं.

‘शिवजयंतीप्रमाणे राजर्षी शाहू महाराज जयंतीही शासकीय पातळीवर साजरी व्हावी, अशी आमची विनंती आहे,’ अशी वसंतराव नाईक यांच्यासमोर प्रतापसिंहांनी आपली भूमिका मांडली. नंतर त्यांनी सार्‍या मंत्रिमंडळालाच ही गोष्ट पटवून दिली. मग मात्र चक्रं फिरली आणि शाहू जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याचा निर्णय झाला. कार्याध्यक्ष या नात्यानं प्रतापसिंहांनी कामाला जुंपून घेतलं होतं. सर्व साखर कारखाने, इतर संस्था, तालीम मंडळं यांच्याशी संपर्क साधून सर्वांच्या बैठका घेण्याचा त्यांनी सपाटाच लावला. ‘पुढारी’च्या लायब्ररी हॉलमध्ये घेतलेल्या बैठकांमधून उत्सवाची रूपरेषा आखण्यात आली. नियोजन केलं. त्यावेळी जिल्हाधिकारी दैठणकर आणि जिल्हा पोलिसप्रमुख त्यागी हे देखील ‘पुढारी’ कार्यालयातील आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वच बैठकांना उपस्थित राहात असत.
राजर्षींच्या या कर्मभूमीत त्यांच्या स्मरणार्थ एखादं भव्य-दिव्य असं स्मारक व्हावं, त्या स्मारकातून सर्वसामान्यांना त्यांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा अविरतपणे मिळत राहावी, अशी प्रतापसिंहांची इच्छा होती. त्यांनी मांडलेल्या शाहू स्मारक भवनाच्या कल्पनेला जिल्हाधिकार्‍यांनी उत्स्फूर्तपणे पुष्टी देऊन त्यांनी जाधव यांचं कौतुकही केलं.

लगेचंच दि. 20 मे 1974 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यामध्ये शाहू जन्मशताब्दीनिमित्त विविध उपक्रमांचे संकल्प सोडण्यात आले. सर्वांनी प्रतापसिंहांच्या योजनेला एकमुखी पाठिंबा दिला आणि दसरा चौकातच राजर्षी शाहू स्मारक भवन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी 50 लाखांचा निधी उभारण्यात यावा, यावरही शिक्कामोर्तब झालं.
तसेच जन्मशताब्दीनिमित्त वर्षभरात शंभर मिश्रविवाह करण्याचं निश्चित झालं. त्याचप्रमाणे सहकारी साखर कारखान्यांनी मागासवर्गीयांना नोकर्‍यांत सामावून घ्यावं, हुशार व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुरू करावी, शाहूंच्या नावे एका संशोधन केंद्राची स्थापना करावी इत्यादी उपक्रम आणि योजना राबविण्याचंही ठरविण्यात आलं.

शाहू स्मारकासाठी 50 लाखांचा निधी जमविण्याची जबाबदारी आणि त्याचं नियोजनही प्रतापसिंहांकडेचआलं आणि हा निधी जीवाचं रान करून त्यांनी यशस्वीरीत्या जमा करून दाखविला. सर्वच सहकारी संस्था, व्यापारी संस्था, उद्योग-व्यावसायिक, शिक्षण संस्था या सर्वांनीच उत्साहानं निधी संकलनाला प्रचंड प्रतिसाद दिला. त्या काळात 50 लाख ही काही साधीसुधी रक्कम नव्हती; पण लोकांनी, संबंधित घटकांनी जबरदस्त प्रतिसाद दिल्यामुळेच ही जबाबदारी पार पाडण्यात ते यशस्वी झाले.

राजर्षी शाहू जन्मशताब्दी सोहळ्याची तारीख 30 जून ही निश्चित करण्यात आली. याबाबत 11 जून 1974 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यामध्ये जन्मशताब्दीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर राजर्षींचं जन्मस्थान सरकारकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम आणि दसरा चौकातील नियोजित शाहू स्मारक भवनाचा भूमिपूजन कार्यक्रम, असे दोन महत्त्वाचे कार्यक्रम सकाळी करण्याचा निर्णय घेण्यात आला. दसरा चौकातील सिव्हिल सर्जन यांच्या बंगल्याच्या आवारातील मोकळी जागा नियोजित स्मारकासाठी ताब्यात घेण्यात आली.

30 जूनला मुख्य कार्यक्रम असल्यामुळे 29 जूनपासूनच राजर्षींचा पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका तसेच शिवाजी विद्यापीठ यांसह सर्व सरकारी इमारती, सहकारी आणि सार्वजनिक संस्था, तालीम संस्था आदी महत्त्वाच्या वास्तू आणि स्मारकं विद्युत रोषणाईनं नटल्या होत्या. उजळून निघाल्या होत्या. जागोजागी कमानी उभारण्यात आल्या होत्या. भगव्या पताका, भगवे झेंडे यांनी करवीरनगरी साज शृंगारलेली होती. राजर्षींच्या लाडक्या रयतेनं दारोदारी गुढ्या, तोरणं उभारून जणू आपल्या राजाला मानवंदनाच दिली होती. 29 जूनच्या रात्रीच निम्मं मंत्रिमंडळ कोल्हापुरात दाखल झालं होतं. जणू महाराष्ट्र शासन उद्याच्या उगवणार्‍या दिवसाची अधीरतेनं प्रतीक्षाच करीत होतं.

30 जूनला सकाळीच मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते शाहू स्मारक भवनाच्या इमारतीचं भूमिपूजन संपन्न झालं. त्याचवेळी राजर्षींचं जन्मस्थान सरकारकडे हस्तांतरित करण्याचा सोहळा पार पडला आणि मग शाहू स्टेडियमवर लाखोंच्या उपस्थितीत भव्य जन्मशताब्दीचा मुख्य सोहळा सुरू झाला..! स्टेजवर मुख्यमंत्री वसंतराव नाईक, मंत्री वसंतदादा पाटील, मंत्री यशवंतराव मोहिते, मंत्री शरद पवार, बॅ. ए. आर. अंतुले, रफिक झकेरिया आदी मंत्र्यांसह प्रतापसिंह आणि जिल्हाधिकारी दैठणकर बसले होते. समोर स्टेडियममध्ये प्रचंड जनसागर जमलेला होता. या मंगलमय सोहळ्याला सुरुवात झाली ती गायक व गायिकांनी खड्या आवाजात सादर केलेल्या गौरवगीताने. ‘हिरे, माणके, मोती उधळा, जयजयकार करा!

जय राजर्षी शाहूराया तुजला हा मुजरा!’

कवी सूर्यकांत खांडेकर यांच्याकडून प्रतापसिंहांनीच खास लिहून घेतलेल्या या स्वागतगीतानं सारं वातावरण भारून गेलं. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी आपल्या भाषणात अस्पृश्यता निवारण आणि सामाजिक समतेचं राजर्षी शाहू महाराजांचं कार्य पुढे नेण्याचं आवाहन केलं. प्रत्येकाच्या उत्स्फूर्त भाषणातून जणू शाहू गौरव ग्रंथच आकार घेत होता. राजर्षींचं कार्य हे केवळ एखादं भारूड नसून ते अनंत काळापर्यंत चालणारं गारुड आहे, याची प्रचिती शासनालासुद्धा आली होती.

सोहळ्यानिमित्त आयोजित अतिभव्य मिरवणुकीचा दसरा चौकातून शुभारंभ झाला. वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, बॅ. ए. आर. अंतुले, यशवंतराव मोहिते, शरद पवार, रफिक झकेरिया आदी मंत्र्यांसह स्वतः प्रतापसिंह तसेच आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी दैठणकर, जिल्हा पोलिसप्रमुख त्यागी असे सर्वजण मिरवणुकीच्या अग्रभागी होते.
राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनातील सजीव देखावे, चित्ररथ, धनगरी ढोलांसह विविध वाद्यवृंद, लाठी-बोथाटी, फरीगदगा, दांडपट्टा आदी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं लोकांना मंत्रमुग्ध करीत होती. त्याबरोबरच हलगीचा कडकडाट, लेझीमचा छणछणाट, शाहिरी पथकांची गगनभेदी ललकारी माणसांच्या मनामनांमध्ये, मनामनांची वीरश्री चेतवीत होती. अशा मंत्रमुग्ध वातावरणात मिरवणूक तब्बल पाच तास सुरू होती.

यानिमित्तानं आणखी एक चांगली गोष्ट घडली. दत्तकविधान प्रकरणानंतर विद्यमान छत्रपती शहाजी महाराज किंवा युवराज शाहू कधीही सार्वजनिक कार्यक्रमात येत नव्हते. प्रतापसिंहांनी जिल्हाधिकारी दैठणकर यांच्यासमवेत न्यू पॅलेसवर जाऊन, त्यांना शाहू जन्मशताब्दी सोहळ्यास उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं होतं. ते सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत; पण दोघेही सकाळीच राजर्षींच्या पुतळ्याला हार घालून निघून गेले. 15 ऑगस्ट 1977 रोजी शाहू स्मारकाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली. आर. एस. बेरी हे या कामाचे आर्किटेक्ट होते. तीन-साडेतीन वर्षांत हे काम पूर्णही झालं आणि 3 फेब्रुवारी 1981 रोजी शाहू स्मारक भवनचं उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्या हस्ते करण्यात आलं. या माध्यमातून शाहू महाराजांच्या नावे एक विशाल स्मारक उभं करण्याचं प्रतापसिंहांनी उराशी बाळगलेलं स्वप्न साकार झालं होतं. शाहू स्मारकाच्या उभारणीमुळे देणगीदारांना प्रतापसिंहांनी दिलेल्या शब्दाचीही पूर्तता झाली, याचं त्यांना खूप समाधान वाटलं.

त्या कार्याबद्दल ‘राजर्षी शाहू जन्मशताब्दीचे प्रवर्तक आणि शाहू स्मारक भवनचे शिल्पकार’ या लेखात कोल्हापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी दैठणकर लिहितात, ‘पुढारी’चे संपादक प्रतापसिंह जाधव म्हणजे सच्चा मित्र, निरलस आणि निःस्वार्थी व्यक्तिमत्त्व. खरा शाहूप्रेमी. सर्वसामान्यांविषयी कमालीची तळमळ असणारं, समतावादी आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व. त्यांची नि माझी चांगली मैत्री जमली. यामागे त्यांचा निरलस, निःस्वार्थी स्वभाव, हाच धागा होय! राजर्षी शाहू छत्रपतींची जन्मशताब्दी आणि शिवराज्याभिषेक त्रिशत सांवत्सरिक महोत्सव हे कोल्हापुरात अतिभव्य स्वरूपात साजरे झाले, ते प्रतापसिंह जाधव यांच्यामुळेच! सोहळ्याच्या आयोजनात प्रतापसिंह जाधव यांनी घेतलेला पुढाकार आणि त्यांचे अप्रतिम संयोजन कौशल्य पाहता शाहूंचे स्मारक उभे केल्याबद्दल त्यांना खर्‍या अर्थानं शाहूप्रेमी व शाहू महाराजांच्या कार्याचे खरे वारस म्हटले पाहिजे.’  लोकमान्य टिळकांमुळे शिवजयंती साजरी होऊ लागली. त्याप्रमाणे शासकीय पातळीवर शाहू जयंती साजरी करण्याचा निर्णय प्रतापसिंह जाधव यांच्या प्रयत्नामुळेच झाला, हे नमूद केले पाहिजे.
एक अत्यंत दुर्दैवी घटना 1990 मध्ये घडली.

‘पुढारी’च्या अकौंट्स विभागातील अनंत बळवंत करवीरकर प्रतापसिंहांकडे गेले. त्यांनी त्यावर्षी प्रसिद्ध झालेले कोल्हापूर गॅझेटियर नेलेे होते. त्यांनी त्यात खुणा करून आणलेली 16 पाने त्यांना वाचायला दिली. प्रतापसिंहांनी पुढ्यातलं अग्रलेखाचं काम बाजूला सारलं आणि करवीरकरांनी खुणा करून दिलेली 16 पानं ते वाचू लागले. एकेका पानागणिक त्यांच्या मनात संतापाच्या लाटा उसळू लागल्या. डोकं बधीर होऊन गेलं! कोणीतरी कि. का. चौधरी नावाचा विद्वान (?) त्याचा संपादक होता. गॅझेटियरमधील मजकूर पाहता त्यांना बहुधा राजर्षी शाहूद्वेषाची कावीळच झाली असावी. या गृहस्थानं शाहू छत्रपती हे ब्रिटिशधार्जिणे असल्याचा जावईशोध लावला होता! आणि त्या अनुषंगानं लिखाण करताना महाराजांच्या व्यक्तिमत्त्वावर चिखलफेक करण्यात आली होती.

हा मजकूर सरकारी गॅझेटियरमध्ये आल्यानं त्याला शासनमान्यता मिळाल्यासारखाच प्रकार झाला होता. राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यकर्तृत्वावर आणि चारित्र्यावर अनेक शाहिरांनी आणि साहित्यिकांनी तसेच इतिहासकारांनी या आधीच प्रकाशझोत टाकला असून, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं यथार्थ वर्णन केलेलं आहे. अशा थोर राजाबद्दल अपलाप करणारा मजकूर वाचून प्रतापसिंहांचं मन पेटून उठलं. त्यांनी करवीरकरांनाच या विषयावर सणसणीत लेख लिहायला सांगितलं.

करवीरकरांनी त्यावर ‘गॅझेटियर की भाकडकथांचे चोपडे?’ या मथळ्याखाली या विषयावर एकूण दोन लेख लिहिले. गॅझेटियरमधील कितीतरी चुकांवर या लेखात प्रकाशझोत टाकण्यात आला होता. हे दोन्ही लेख ‘पुढारी’तून प्रसिद्ध करण्यात आले! अखेर ठिणगी पडली होती! बॉम्ब फुटला होता! कुठलाही बॉम्ब केवळ फुटत नसतो, तर फुटल्यानंतर तो वडवानलही पेटवतो. त्याप्रमाणे कोल्हापूरमध्ये फार मोठं आंदोलन उभं राहिलं! प्रतापसिंहांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आणि सर्व कोल्हापूरकर गॅझेटियरविरुद्ध दंड थोपटून उभे राहिले. सर्वत्र संतापाची लाट उसळली. समाजाच्या सर्व थरांतून त्याचा निषेध होऊ लागला.

राजर्षी शाहू छत्रपती महाराज हे कोल्हापूरकरांचं श्रद्धास्थान. राजर्षींशी कोल्हापूरकरांची भावनिक नाळ जुळलेली. साहजिकच ‘पुढारी’तील लेख, अग्रलेख, बातम्यांतून जनआंदोलन उभं राहणं आणि त्याचं नेतृत्व प्रतापसिंहांकडेच येणं, हेही अपरिहार्यच होतं! मग, त्यांच्या नेतृत्वाखाली एक व्यापक शिष्टमंडळ तत्कालीन जिल्हाधिकारी अजितकुमार जैन यांना भेटलं. ती तारीख होती, 30 ऑक्टोबर 1990. या निवेदनाद्वारे गॅझेटियरमधील आक्षेपार्ह लिखाण रद्द करण्याची मागणी त्यांनी केली.

1990 च्या डिसेंबरमध्ये नागपूर अधिवेशन सुरू झाले. तोपर्यंत हा प्रश्न इतका तापला होता की, तो आपोआपच विधानसभेच्या ऐरणीवर आला. या प्रश्नावर विधानसभेत प्रचंड गोंधळ उडाला. विरोधी पक्षांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. शेवटी राज्यमंत्री अरुण गुजराथी यांना गॅझेटियरचं संपादक मंडळ बरखास्त केल्याची घोषणा करावी लागली!दरम्यानच्या काळात राज्यात सत्ताबदल झाला. शरद पवार केंद्रात गेले आणि त्यांच्या जागी सुधाकरराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. नाईक यांनी 1 डिसेंबर 1991 रोजी गॅझेटियरमधील वादग्रस्त विधानं रद्द केल्याचं जाहीर केलं आणि मग 16 जानेवारी 1992 रोजी वादग्रस्त 16 पानं रद्द करण्यात आली. सर्वात वाईट बाब म्हणजे फुले, शाहू आणि आंबेडकरांचा उदोउदो करणार्‍या महाराष्ट्र शासनाकडून गॅझेटमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यास कमालीची दिरंगाई झाली.

26 जुलै 1997 हा दिवस उत्तर प्रदेश राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. तसाच तो महाराष्ट्रासाठीही ऐतिहासिक स्वरूपाचा होता. याच दिवशी कानपूरमध्ये अतिभव्य असा ‘शाहू महोत्सव’ साजरा करण्यात आला, तोही मायावती या एका दलित नेतृत्वाच्या पुढाकारानं! या महोत्सवाची प्रेरणा मात्र प्रतापसिंह जाधव यांचीच होती. बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशिराम यांची प्रतापसिंह जाधव यांच्याशी जवळीक फार पूर्वीपासूनची! पुण्यातील वास्तव्यात कांशीराम यांचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्याशी मैत्रीचे संबंध निर्माण झाले होते. कोळसे-पाटील आणि प्रतापसिंह जाधव यांचे मैत्रीचे संबंध. त्यामुळे कांशीराम, मायावती यांची अनेकवेळा कोळसे पाटील यांचे घरी व इतरत्र अनेकवेळा भेट व्हायची. या भेटीतच प्रतापसिंह यांनी शाहू महाराज यांच्या कार्याविषयी कांशीराम आणि मायावतींना सांगितले. राजर्षी शाहूंचे चरित्रग्रंथही प्रतापसिंहांनी त्यांना भेट दिले होते.

‘उत्तर प्रदेशात तुम्ही सत्तेवर आलात, तर शाहूंच्या नावे जिल्हा करावा आणि एखादी स्मारकाची वास्तू उभारून तिथं राजर्षींचा पुतळा उभा करावा!’ अशी सूचना प्रतापसिंह यांनी कांशीराम आणि मायावती त्यांना भेटण्यासाठी कोल्हापूरला आले , त्यावेळी केली होती. मायावतींनी त्यांना तसं आश्वासनच देऊन टाकलं आणि सत्तेवर येताच आश्वासनाची पूर्तताही केली. कानपूर जिल्ह्याचं नामकरण ‘शाहूजीनगर’ असं केलं. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कार्यकाळात कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय समाजाची परिषद घेऊन तीत मार्गदर्शनही केलं होतं. त्या ऐतिहासिक क्षणाची स्मृती आणि त्याबद्दलची कृतज्ञता म्हणून हे नामकरण करण्यात आलं. इतकंच करून मायावती थांबल्या नव्हत्या, तर त्यांनी तिथल्या विद्यापीठाला आणि रुग्णालयालाही शाहूरायांचं नाव दिलं होतं! मायावती यांनी कानपूर येथे शाहू जयंती महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.

1 जून 1997 च्या शेवटच्या आठवड्यात कांशीराम यांनी प्रतापसिंह यांना फोन करून, कानपूर येथे साजरा करण्यात येणार्‍या शाहू महोत्सवाची कल्पना दिली. शिवाय या महोत्सवामध्ये त्यांच्यासह समस्त कोल्हापूरकरांनी सहभागी व्हावं, अशी गळही घातली. इतकंच नव्हे तर या सोहळ्याला कोल्हापूरकरांना उपस्थित राहता यावं म्हणून मायावतींनी खास रेल्वेची सोयही केली होती. महोत्सवासाठी कोल्हापुरातून पाठविण्यात येणार्‍या लोकांची जबाबदारी प्रतापसिंहांनी घेतली. शिवाय त्याबाबत कोल्हापूरमध्ये सर्व तयारी करून घेण्याचं कामही त्यांनी आपल्या शिरावर घेतलं. या महोत्सवासाठी कोल्हापुरातून खास रेल्वेनं बाराशेहून अधिक प्रतिनिधी पाठविण्यात आले आणि त्यांचा सर्व खर्च प्रतापसिंह जाधव यांनी उचलला!

कोल्हापूरकरांनी 25 आणि 26 जुलै हे दोन्ही दिवस अक्षरशः गाजवले. प्रामुख्यानं मर्दानी खेळ, शाहिरी पोवाडे, कलापथकांची गाणी, धनगरी ढोल आणि धनगरी गजा अशा विविध कलाप्रकारांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. उत्तर प्रदेशच्या कानाकोपर्‍यांतून तसेच बिहार आणि पश्चिम बंगालमधूनही लोक या सोहळ्याला आले होते. मल्लखांबावरील कसरती पाहून तर प्रेक्षक थक्कच झाले. तसेच धिप्पाड भीमकाय मल्ल पाहूनही लोक अचंबित झाले. एकूणच कोल्हापूरकरांनी सार्‍यांची मनं जिंकली, यात संशयच नाही.

राजर्षींनी त्यांच्या कार्यकाळात सामाजिक जातीबंधनं घट्ट असताना आणि समाजातील दलितवर्गाला माणूस म्हणून वागविण्यात येत नसताना, उच्चवर्णीयांच्या दबावाला भीक न घालता, दलितोद्धाराचं काम करून समाजात आदर्श निर्माण केला. साहजिकच मायावती, कांशीराम यांना शाहू महाराजांबद्दल अपरंपार प्रेम. त्यांनी उत्तर प्रदेशात ‘छत्रपती शाहूजी महाराज इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायसेन्स’ नावाची वैद्यकीय संस्था स्थापन करीत असल्याची माहिती दिली. त्यासाठी 80 एकर जमीन आणि कोट्यवधींचा निधीही मंजूर करण्यात आल्याचं त्यांनी प्रतापसिंहांना सांगितलं.

पूर्वी प्रतापसिंह दिल्लीला सातत्यानं जायचे. संसद परिसरात गेल्यानंतर त्यांना नेहमी जाणवायचं की, संसदेच्या प्रांगणात विविध नेत्यांचे आणि महापुरुषांचे पुतळे उभे केलेले आहेत; परंतु सामाजिक समतेचे कृतिशील प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळा मात्र तिथं नाही. ही खंत त्यांना सातत्यानं लागून राहिली होती. या पार्श्वभूमीवर संसद भवनाच्या प्रांगणात राजर्षींचा पुतळा उभा करावा, यासाठी त्यांनी संकल्पच सोडला आणि संकल्पाला सिद्धीमध्ये परिवर्तित करण्यासाठी जिद्दीनं कामाला लागले. मग त्यांच्या जोडीला बाबुराव धारवाडेही आले आणि त्यांनी जोरदार प्रयत्न चालू केले. पुतळा उभारणीसाठी विविध मार्गांनी पाठपुरावा करण्यात आला. अर्थात, त्यामध्ये ‘पुढारी’चा सहभाग मोलाचा होता, यात कसलाच संशय नाही.

संसद भवनाची सुरक्षा लक्षात घेऊन प्रतापसिंहांसह निवडक लोकांनाच कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं होतं; परंतु एकट्यानंच दिल्लीला न जाता, त्याच दिवशी कोल्हापुरात ‘शाहू महोत्सव’ भव्य प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय प्रतापसिंहांनी घेतला. त्यासाठी ते लगेचंच कामाला लागले आणि तत्कालीन महापौर उदय साळोखे आणि प्रमुख कार्यकर्त्यांची तसेच विशेष प्रतिनिधींची एक बैठक घेतली. त्या बैठकीतच त्यांची निमंत्रक म्हणून एकमतानं निवड झाली.

17 फेब्रुवारी 2009 चा दिवस उजाडला आणि संसद भवनाचं प्रांगण धन्य धन्य झालं. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी कळफलकावरील बटण दाबलं आणि संसद भवनातील गेट क्रमांक सहाच्या हिरवळीवर अस्सल मर्‍हाठमोळ्या थाटात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. त्याचवेळी इकडे करवीरनगरीत विराट जनसागराच्या साक्षीने ‘शाहू लोकोत्सव’ सोहळा शाही थाटात पार पडला.

शाहूरायांचा गगनभेदी गजर, पोलिस बँडची मानवंदना, 21 तोफांची सलामी, धनगरी ढोलांचा दणदणाट, तसेच झांजपथक, लेझीम आणि पोवाडा या सर्व लोककलांच्या प्रदर्शनानं झपाटलेलं वातावरण, टाळ-मृदुंगांच्या साथीनं निघालेली शाहू प्रतिमेची मिरवणूक आणि हो, ग्रंथाची पालखीसुद्धा! आणि या सर्व दृष्ट लागण्याजोग्या सोहळ्यावर हेलिकॉप्टरमधून झालेली पुष्पवृष्टी! अशा मंगलमय, भावरम्य क्षणांच्या विणलेल्या शाहू भक्तीच्या गोफानं सारी करवीरनगरी शाहूमय झाली होती. जणू सार्‍या नगरीनं आपल्या लाडक्या राजाला मानाचा मुजराच केला होता!

-इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक

Back to top button