निर्नायकी राहुल गांधी | पुढारी

निर्नायकी राहुल गांधी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पर्याय म्हणून पाहणार्‍या लोकांचा स्वतः राहुल गांधीच अधुनमधून मुखभंग करीत असतात. खबरदार माझ्यासंदर्भात असा काही विचार कराल तर, असा इशाराच जणू राहुल गांधी आपल्या हितचिंतकांना देत असावेत! दोष राहुल गांधींचा नाही, तर त्यांच्या हितचिंतकांचा आहे, हे येथे लक्षात घ्यायला हवे.

ज्या माणसाला प्रवासाला जायचेच नाही, त्याला बळजबरीने घोड्यावर बसवण्यात काहीच अर्थ नसतो, हे आतातरी त्यांच्या समर्थकांनी लक्षात घ्यायला हवे. त्यांच्या ताज्या नेपाळ दौर्‍याच्या निमित्ताने जी चर्चा सुरू झाली आहे, त्यातून त्यांच्या संदर्भातील अनेक प्रश्न नव्याने समोर आले. त्यासंदर्भात वाह्यात चर्चा करणारे लोक कोण आहेत, हे सगळ्यांना ठाऊक आहे; परंतु त्यांना चर्चेला निमित्त देणारे खुद्द राहुल गांधीच आहेत. म्हणजे, चर्चा करणार्‍यांपेक्षा याचा अधिक दोष त्यांच्याकडे जातो. नेपाळमधील एका क्लबमध्ये ते असल्याचा व्हिडीओ भारतीय जनता पक्षाशी संबंधित मंडळींनी ट्विट केला. त्यावर संबंधितांनी अनेक प्रश्न उपस्थित करून राहुल गांधी पर्यटन, पार्टी करण्यात मश्गूल असल्याची टीका करण्यात आली. ते गुलछबू आहेत आणि त्यांना समाजकारणापेक्षा अशा गोष्टींमध्ये अधिक रस असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमांतून करण्यात आला.

एकीकडे पंतप्रधान अठरा तास काम करीत असतात आणि राहुल गांधी मात्र मौजमजेमध्ये व्यस्त असतात, हे बिंबवण्याचाही संबंधितांचा प्रयत्न असतो. राहुल हे मोदींना पर्याय ठरू शकत नाहीत, हा त्यांचा अंतिम दावा असतो. त्यांच्या या नेपाळ दौर्‍यासंदर्भात नंतर काँग्रेस पक्षाच्या वतीने खुलासा करण्यात आला. ते आपला मित्र देश असलेल्या नेपाळला आपल्या मैत्रिणीच्या विवाह समारंभात सहभागी होण्यासाठी गेले असल्याचे स्पष्टीकरण काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी दिले. राहुल गांधी पंतप्रधान मोदी यांच्याप्रमाणे न बोलावता पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या घरी केक कापायला गेलेले नाहीत, असा टोलाही सूरजेवाला यांनी लगावला आहे.

या राजकीय स्वरूपाच्या आरोप-प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन या दौर्‍यासंदर्भातील वस्तुस्थिती लक्षात घ्यायला हवी. नेपाळमधील काठमांडू पोस्टच्या वेबसाईटवरून राहुल गांधींच्या दौर्‍याची बातमी प्रसिद्ध झाली. भाजपकडून ट्विट करण्याच्या आधी ही बातमी प्रसिद्ध झाली असून राहुल गांधी आपल्या मैत्रिणीच्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी नेपाळ दौर्‍यावर आल्याचे आणि काठमांडूमधील खासगी हॉटेलमध्ये मित्रांसमवेत थांबल्याचे त्यात म्हटले आहे. राहुल गांधी यांचा दौरा खासगी असला, तरी त्यांनी स्वतः नेपाळला जात असल्याबाबत दोन ओळींचे ट्विट केले असते, तरी विरोधकांना ही संधीच मिळाली नसती. राजकीय जीवनातील व्यक्तीने बाळगायची व्यवधाने ते अनेकदा विसरतात, त्यातीलच हा प्रकार.

एकदा राजकीय मैदानात उतरलात की, सार्‍याच शक्यता गृहित धराव्या लागतात. त्यातही माध्यमांतर झालेले असताना आणि समाजमाध्यमे सक्रिय झाली असताना तर जबाबदारी अधिकच वाढते. हा नियम सत्ताधारी आणि विरोधकांना सारखाच लागू होतो. राहुल गांधींवर व्यक्तिगत हल्ले करून त्यांची प्रतिमा खराब करण्याचे प्रयत्न हा त्या राजकीय रणनीतीचाच भाग; पण या अपप्रचाराला राहुल गांधी स्वत:च हातभार लावत असतात. देशाच्या राजकीय क्षितिजावर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा उदय झाल्यानंतर त्यांच्या विरोधात लढण्यासाठी अधिक खंबीरपणा, सातत्य आवश्यक होते. राहुल गांधी यांनी तो क्वचितच दाखवला. अनेकदा तो फोल ठरला. ते गंभीर राजकारणी नाहीत, असे म्हणण्याची वेळ आली. त्यामागील कारणांचा शोध घेतल्यास सत्यता लक्षात येते. देशातील अनेक महत्त्वाच्या घटना, घडामोडींवेळी राहुल गांधी परदेशात असल्याचे आढळून आले आहे.

ट्विटरवरून राजकारण करणारे नेते अशी त्यांची प्रतिमा तयार होऊ लागली. प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिगत आयुष्य असते आणि त्याने ते कसे जगावे, हा त्याचा अधिकार असतो. त्यामुळे राहुल गांधी यांनाही त्यांचे व्यक्तिगत आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे. परंतु, ज्या राजकीय परिस्थितीत ते काम करताहेत त्या ठिकाणी त्यांना या सगळ्या सवलती मिळणार नाहीत. 2014 नंतर काँग्रेस पक्षाची अवस्था दिवसेंदिवस अधिक दयनीय होत चालली असताना या पक्षाचा प्रमुख नेता पर्यटन, पार्ट्या आणि लग्न समारंभ करीत बसला, तर तो सत्तेला पर्याय देऊ शकत नाही, अशी लोकांची धारणा बनू लागली आहे.

दिल्लीत जहांगीरपुरीत झोपड्यांवर बुलडोझर चालवला तेव्हा राहुल गांधी तिथे नव्हते, तिथे कम्युनिस्ट पक्षाच्या वृंदा करात बुलडोझरसमोर उभ्या राहिल्या. गुजरात, हिमाचलच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. पाच राज्यांतील निवडणुका संपल्यानंतर लगोलग पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातवर लक्ष केंद्रित केले. गुजरातमधील काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांच्या नाराजीच्या बातम्या अनेक दिवसांपासून येत आहेत. त्यांनी अलीकडे आपल्या ट्विटर प्रोफाईलमधून काँग्रेसचे नावही हटवले आहे. परंतु, या बिनकामाच्या नेतृत्वाने त्यासंदर्भात काहीही केल्याचे दिसून आले नाही.

पंजाब निवडणुकांचा आणि त्यामागील काँग्रेसच्या अपयशाचा पाढा वाचला गेला आहेच. आता राजस्थानमध्ये सामाजिक वातावरण प्रदूषित झाले आहे; परंतु कोणतीही घटनात्मक जबाबदारी आणि तसा व्याप नसतानाही तोंडावर आलेल्या गंभीर प्रश्नांबाबत काँग्रेस नेतृत्व उदासीन असल्याचे आढळून येते. व्यक्तिगत जीवनापेक्षा अधिक गंभीर समस्या समोर असतानाचे हे वर्तन बेजबाबदारपणा दाखवणारे आहे. देशाच्या विद्यमान राजकीय वर्तमानाशी ते सुसंगत तर नाहीच, सर्वसामान्य जनतेचा अपेक्षाभंग करणारे आणि आपल्या निर्नायकीने त्याची प्रतारणा करणारेच आहे.

Back to top button