‘भगवी शाल’ काही फिरली नाही! | पुढारी

‘भगवी शाल’ काही फिरली नाही!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या बहुचर्चित सभेमुळे पुन्हा औरंगाबाद शहरावर ती ऐतिहासिक भगवी शाल फिरेल, असे अनेकांना वाटले. ‘भगवी शाल फिरली’ की निकाल फिरतो, असे औरंगाबादच्या निवडणुकांचे समीकरणच कधीकाळी प्रचलित होते. निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला की, शिवसेनाप्रमुखांची एक सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर आणि दुसरी सभा सिडकोच्या मैदानावर होत असे. या सभांना खुर्च्या लावलेल्या नसत.

लोक उत्स्फूर्त येत. त्यासाठी गाड्या पाठवलेल्या नसत. शिवसेनाप्रमुखांच्या या सभा झाल्या की निकालाबद्दलची जी काही धाकधूक असे ती निघून जाई. भगव्या शालीचा हा परिणाम समजला जात असे. मुंबई, ठाण्यात मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक संघटना म्हणून नाव आणि सत्ता कमावल्यानंतर शिवसेनेने आक्रमक हिंदुत्वाचा नारा दिला. हा नारा महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचवण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1988 मध्ये औरंगाबादचीच निवड केली. याच मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर झालेल्या सभेतून शिवसेना मराठवाड्यात अत्यंत वेगाने पसरली.

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत भले शिवसेनेला बहुमत मिळाले नाही; पण 60 पैकी 27 जागा हा काही छोटा विजय नव्हता. सर्वांत मोठा पक्ष असूनही शिवसेना विरोधी बाकावर आणि काँग्रेस-मुस्लिम लिग युती सत्तेवर, तरीही शिवसेनाप्रमुखांनी औरंगाबादेत ‘विजयी मेळावा’ घेतला आणि औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण जाहीर केले.(पुढे युतीची सत्ता आल्यानंतरही हे नामकरण प्रत्यक्षात आले नाही आणि भोंगेदेखील उतरवता आले नाहीत, हा भाग वेगळा.) औरंगाबादच्या या सुरुवातीच्या सभांनी शिवसेनेचे हिंदुत्व मराठवाड्याच्या मनात ठसले. पुढे लोकसभेच्या ज्या चार जागा शिवसेनेने महाराष्ट्रातून जिंकल्या त्यातल्या दोन मराठवाड्यातील होत्या. औरंगाबाद आणि परभणी.

तब्बल 34 वर्षांनी याच इतिहासाची पुनरावृत्ती करण्याच्या मार्गावर राज ठाकरे निघाले; पण शिवसेनाप्रमुख आणि मनसेप्रमुख यांच्या या वाटचालीत दोन मोठे फरक दिसतात. मुंबई, ठाणे काबीज केल्यानंतरच आक्रमक हिंदुत्वाचा नारा देत शिवसेनाप्रमुखांनी औरंगाबादेतून सुरुवात केली. मनसेकडे तशी राजकीय मजबुती नाही. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या चार महानगरांत मोठे राजकीय यश मिळवल्यानंतर मनसे अपयशाच्या गर्तेत सापडली. संकटात हवालदिल झालेला माणूस कुंडली बघतो. गंडे-दोरे घालतो. दरवाजा-खिडक्यांची दिशा बदलतो. प्रसंगी विचारही बदलतो आणि कालपर्यंत पूजलेले देवही टाकून देत नवे निवडतो. मनसेने झेंडा बदलला, पक्षचिन्ह असलेल्या इंजिनाची दिशा बदलली आणि आता मराठी हक्कांचा विचार टाकून देत हिंदुत्वाचा नारा दिला. हा झाला पहिला फरक. शिवसेनाप्रमुखांनी मराठी न सोडता हिंदुत्वाचा नारा दिला, तेव्हा भाजपसारखा मवाळ हिंदुत्ववादी पक्ष देशपातळीवर पुढे येण्यासाठी प्रयत्न करत होता.

शिवसेनाप्रमुखांच्या आक्रमक हिंदुत्वाची तुलना भाजपच्या मवाळ हिंदुत्वाशी होऊ लागली आणि महाराष्ट्राने नाही म्हटले, तरी आक्रमक हिंदुत्वाला पसंती दिली. महाराष्ट्रासमोर शिवसेनाप्रमुखांनी दोनच पर्याय ठेवले होते. एकाची निवड करा, खान नाही तर बाण! राज ठाकरे असा कोणताही ठोस पर्याय देऊ शकत नाहीत. खरे तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने अयोध्या प्रश्न सुटला. श्रीराम मंदिराची उभारणी सुरू झाली. त्याच क्षणी राजकारणातील हिंदुत्वाच्या मुद्द्याने राम म्हटले, असे वाटले होते. आता मशिदींवरील भोंग्याचा विषय हाती घेत हिंदू मतांचे पुन्हा ध्रुवीकरण करण्याचे स्वप्न कुणाचे? भाजपने हे स्वप्न राज यांना दाखवले, असे शिवसेनेला वाटते. भाजप आणि मनसे यांच्यात जो राजकीय ताळमेळ सध्या दिसतो त्यावरून या संशयाला जागा आहे. मशिदींवर भोंगेच नसते, तर कोणत्या मुद्द्यावर हिंदुत्वाचा नारा राज यांनी दिला असता? उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही निवडणुकीच्या प्रचारात भोंगे उतरवण्याचे आश्वासन दिले नव्हते.

महाराष्ट्रात हिंदुत्वाचे भोंगे वाजू लागल्यानंतर योगी यांनीही चार वर्षांपूर्वीचा नियम बाहेर काढला आणि जेमतेम 10,923 भोंगे उतरवले. आजही उत्तर प्रदेशातील 35,000 हून अधिक मशिदींवर परवानगीसह भोंगे मर्यादित आवाजात वाजत आहेत. या भोंग्यांच्या आवाजातही एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी जी भूमिका घेतली, ती सगळेच भोंगे बंद करणारी ठरू शकते. ज्या भोंग्यांना परवानगी नाही ते सर्व भोंगे खुशाल उतरवा, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले. हाच धागा पकडून महाराष्ट्र विकास आघाडी सरकार नियमावर बोट ठेवत मनसेच्या भोेंग्यांची हवाच काढून घेऊ शकते. तसे झाले, तर मग हिंदुत्वाचे नारे देण्यासाठी मनसेच्या हाती कोणते मुद्दे असतील? बरे, हिंदुत्वासाठी इतकी सारी वसवस करणारी भाषणे करूनही भाजपसोबत युती होण्याची खात्री मनसेला नाही.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप-मनसे युतीच्या चर्चा कपोलकल्पित ठरवल्या. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही अशी शक्यता फेटाळून लावली. रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनीही भाजपला मनसेशी युती नको, असा सल्ला देऊन टाकला. म्हणजे इतका सारा आटापिटा करून मनसे केवळ पाडापाडीचा खेळ रंगवण्यासाठी रिंगणात उतरणार आहे? नाही तरी, हिंदू मतांच्या विभाजनाची म्हणा की, त्रिभाजनाची चर्चा आता सुरू झाली आहे.

उद्या आपल्याला दोष नको म्हणून या त्रिभाजनाचा दोष मनसेला देण्याची सुरुवात भाजपकडूनच झालेली दिसते. मुळात महाराष्ट्रात हिंदू मतांचे असे त्रिभाजन शक्य आहे काय? अठरापगड जातींमध्ये विभागलेल्या हिंदू समाजाने महाराष्ट्रात आधीच आपापले पक्ष निवडलेले आहेत. दलित-दलितेतर, मराठा-मराठेतर, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, हिंदू-मुस्लिम अशा एक ना अनेक फळ्या. जिथे टक्का कमी- जास्त होतो, तिथे निकाल फिरतात. पक्षीय बलाबल वर-खाली होते. निकाल फिरवण्याइतका टक्का मनसेने अद्याप कमावलेला नाही. मुंबईसारख्या शहरात काही निकाल मनसे जरूर फिरवू शकेल. मात्र, मुंबईबाहेरील शहरांमध्ये आज ती परिस्थिती नाही. नुसते भोंगे वाजवून भगवी शाल फिरणार नाही. भोंगे बंद झाल्यानंतर पुढे काय, या प्रश्नाचे उत्तर मनसेला आताच शोधावे लागेल.

‘भगवी शाल फिरली’ की निकाल फिरतो,

असे औरंगाबादच्या निवडणुकांचे समीकरणच कधीकाळी प्रचलित होते. तब्बल 34 वर्षांनी याच इतिहासाची पुनरावृत्ती करण्याच्या मार्गावर राज ठाकरे निघाले; पण नुसते भोंगे वाजवून भगवी शाल फिरणार नाही. भोंगे बंद झाल्यानंतर पुढे काय, या प्रश्नाचे उत्तर
मनसेला आताच शोधावे लागेल.

– विवेक गिरधारी

Back to top button