‘अनाथ’ जल, | पुढारी

‘अनाथ’ जल,

अहो स्टॉलवाले, एक पाण्याची बाटली द्या हो!
घ्या.
ही कुठलीये? ही नको. स्टँडर्ड द्या!
अहो, ते पाणी गारेगार आहे म्हणून देतोय. ज्याचं करावं बरं, तो म्हणतो…
ती बाटली कोणी, कुठे, कशी भरली, काही माहिती नाही. उगा दूषित पाणी पिऊन रोगाला आवतन नको. तुम्ही मला आपलं नाथजलच द्या. एस्टीने खास प्रवाशांसाठी भरलेल्या बाटल्या, ‘नाथजल’.
घ्या. वीस रुपये द्या.

वीस? अहो, इथे बाटलीवर तर पंधरा रुपये किंमत छापलीये!
पण, आम्ही वीसलाच विकतो.
कस्काय?
या आख्ख्या एस्टी स्टँडवर कुठेही विचारा. वीसलाच चाललीये बॉटल.
महाग पडते हो. वीस रुपयांना काही काही सरबतंपण मिळतात.
मग ते घ्या!

असं काय म्हणता? सरबताबरोबर औषधाची गोळी घेतं का कोणी? बसमध्ये म्हातारी बसलीये आमची. तिला डोकं दुखण्याची गोळी घ्यायची म्हणतेय.
आता बघा, ही बाटली तुम्हाला परवडत नाही. अगोदर दिलेली पटत नाही. अशाने कसं व्हायचं तुमच्यासारख्याचं?
बघा काय? तुम्हीच बघा. एस्टीने प्रवाशांसाठी ‘नाथजल’ ही सुविधा सुरू केली, तर तुम्ही अडवणूक करताय.
अहो साहेब, ती एक लिटरची बाटलीच घ्या, असं कोण म्हणतंय का? ‘नाथजल’चीच लहानी बाटली घ्या.
लहानी म्हणजे?
650 मिलीची.
ती तरी छापील किमतीला विकणार का?
तो आमचा प्रश्न आहे.

संबंधित बातम्या

असेल; पण प्रवाशांचे प्रश्नही असतात हे विसरू नका. सुट्ट्या पडल्या आहेत. बायकापोरांना घेऊन प्रवास करावे लागतात. उन्हाळा भडकलाय. त्यात कार्टी तर पाणी पिऊन पिऊन उच्छाद मांडतात. मागच्या जन्मी मासे असणार आमची पोरं. त्याशिवाय पाणी प्यायची, सांडायची, अंगावर शिंपडायची एवढी हौस येणार कुठून?
दिवसाकाठी पाच-सातशे पाण्याच्या बाटल्या उगाच का विकतो आपण?
बापरे! प्रत्येक बाटलीमागे पाच रुपये असे कमावता? केवढा पैसा झाला हा? तोपण लोकांना पाण्यासारखा पैसा खर्चायला लावून?
अहो साहेब, घ्यायचं तर घ्या, नाहीतर जा ना! का उगाच डोक्याला शॉट देताय?
का हो? स्टॉलवर विकायच्या वस्तूंचं दरपत्रक लावायची सक्ती नाहीये का?
आहे. लावलेत की तिकडे रेटस्. ती पाटी हवी तर जाऊन बघा!

ती पाटी? तिथे सहजासहजी कोणाची नजर जाईल का? लिहायचं अक्षर तरी किती गचाळ आणि बारीक? कोणाच्या बापाला दिसणारे ते? इथे येणारा प्रत्येक माणूस तर प्रवासाच्या गडबडीत असणार. त्याला वाचायला, वाद घालायला वेळ कुठला असणार?
ही बाटली वाटल्यास फुकट घ्या साहेब; पण इथे काड्या घालत बसू नका.
मी भिकारी आहे का? फुकट का घेऊ?
बरं. द्यायचं ते द्या आणि निघा!

जातोय. इथे कोण राहायला आलंय? मोठं ‘नाथजल’ नाव दिलं. संतांची आठवण जागवली. पण, आता आपल्याला तेवढंही संतपण कुठलं पेलतंय? नाथजलालाही अनाथ करणारे निघालो आपण. देवा, तूच वाचव आणि बुद्धी देरे आता!

– झटका

Back to top button