जॉन्सन यांचा दौरा | पुढारी

जॉन्सन यांचा दौरा

जागतिक पातळीवरील राजकारण गेले काही महिने एका नव्या वळणावर पोहोचले असताना ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरणारा आहे. भारत-ब्रिटन संबंध अधिक मजबूत होण्याबरोबरच व्यापारी आणि संरक्षणद़ृष्ट्या भारतासाठी हा दौरा उपयुक्त ठरणारा होता.

एकीकडे रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक राजकारणात विविध देशांच्या परस्परसंबंधांनी कूस बदलली आहे. युक्रेनवर हल्ला करणार्‍या रशियाच्या विरोधात बव्हंशी युरोपीय राष्ट्रे एकवटली आहेत. संयुक्त राष्ट्रासारख्या मंचावर समन्वयाची भूमिका घेणार्‍या भारतासारख्या देशालाही मधल्या काळात धमकीवजा इशारे देण्यात आले. अशा काळात ब्रिटनच्या पंतप्रधानांनी भारतात येणे आणि गुंतवणूकविषयक बाबींबरोबरच अन्यही अनेक महत्त्वाच्या विषयांमध्ये सहकार्याचा हात पुढे करणे हे भारताच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील भूमिकेला समर्थन देणारे ठरले आहे. रशिया-युक्रेन युद्धासंदर्भातील भारताची भूमिका ब्रिटनने थेटपणे मान्य केल्याचे त्यांच्या विधानावरून स्पष्ट होते. भारत आणि रशियाचे ऐतिहासिक संबंध आहेत, ते जगाला माहीत आहेत आणि ते संबंध बदलणार नाहीत, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

रशिया-युक्रेन युद्धाने जगाच्या नकाशावरील देशांच्या संबंधांची नव्याने मांडणी केली. महायुद्धाची चर्चा करणे सोपे; पण प्रत्यक्ष त्यात उतरणे कठीण. यामुळे एकमेकांना धमकावणार्‍या देशांच्या आणि समूहांच्या मर्यादाही स्पष्ट झाल्या. रशियाचा वारू मात्र युक्रेनची भूमी जाळत निघाला आहे. या परिस्थितीत भारताने तटस्थतेची भूमिका घेतली. त्यास ब्रिटनसारख्या देशाने संमती दिली. जॉन्सन यांनीच दिलेल्या माहितीनुसार त्यांनी भारतासोबत पाच क्षेत्रांमध्ये सहकार्याबाबत चर्चा केली. जमीन, समुद्र, वायू, अंतराळ आणि सायबर अशा क्षेत्रांतील संरक्षण सिद्धतेला चर्चेत प्राधान्य मिळाले. हिंद महासागर आणि पॅसिफिक महासागरातील चीनच्या आव्हानांचा विचार करून सुरक्षेच्या द़ृष्टिकोनातून झालेली चर्चा हाही जॉन्सन यांच्या दौर्‍यातील महत्त्वाचा भाग होता.

भारत आणि ब्रिटन हे दोन्ही देश नव्या गुंतागुंतीच्या संकटांचा सामना करीत असल्याचे जॉन्सन यांचे विधान अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे. जागतिक पातळीवरील परिस्थिती सातत्याने बदलत चालली असताना विशिष्ट मुद्द्यावरून एखाद्या देशाशी असलेले संबंध पूर्णपणे तोडणे कुणालाही परवडणारे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर समोर आलेली जॉन्सन यांची वक्तव्ये दोन्ही देशांमधील जवळिकीवर प्रकाश टाकणारी आहेत. रशिया-युक्रेन युद्धानंतर भारताने घेतलेल्या भूमिकेमुळे अमेरिकेने नाराजी व्यक्त केली असताना ब्रिटनसारख्या देशाशी संबंध सुधारणे अनेक अर्थांनी महत्त्वाचे ठरणार आहे. भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना बोरिस जॉन्सन यांनी दौर्‍यावर येणे महत्त्वाचे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी दोन्ही देशांनी केलेल्या सामरिक समझोत्याचा आढावाही घेण्यात आला आणि ‘रोडमॅप 2030’चीही चर्चा करण्यात आली. दोन्ही देशांमधील भविष्यातील संबंधांच्या द़ृष्टीनेही ते महत्त्वाचे ठरणार आहे. बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य गुजरातला भेट दिली. त्यामध्ये त्यांनी बुलडोझर कारखान्याची पाहणी केली. एकीकडे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्लीमधील बुलडोझर कारवाया चर्चेत असताना भारत दौर्‍यावर आलेल्या ब्रिटनच्या पंतप्रधानांनी बुलडोझरचे प्रमोशन करावे, हे चर्चेला निमंत्रण ठरले.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील किंवा कोणत्याही महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटींमधून छोट्या-छोट्या गोष्टींच्या माध्यमातूनही संकेत आणि संदेश दिले जात असतात. भूमिका स्पष्ट केल्या जात असतात. भारतात जेव्हा बुलडोझरच्या विरोधात तळातील घटकांकडून आक्रोश सुरू आहे, अशा काळात जगातील एका महत्त्वाच्या देशाच्या पंतप्रधानांनी बुलडोझरवर चढून प्रसारमाध्यमांना छायाचित्रे देण्याच्या कृतीतून जाणारा संदेश दुर्लक्षित करता येणार नसला, तरी बोरिस जॉन्सन हे जगातील उथळ नेत्यांच्या यादीतील अग्रक्रमावर असलेल्यांपैकी एक आहेत, हे लक्षात घ्यावे लागेल. त्यामुळे त्यांच्याकडून गंभीर कृतीची अपेक्षा करणेही गैर. जॉन्सन यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली आणि चरखाही चालवल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. बुलडोझरवर चढणे आणि चरखा चालवणे या दोन परस्परविरोधी कृती आहेत, याची जाणीव जॉन्सन यांना असेल, असे वाटत नाही किंवा असली तरी एकूण कुठल्याही गोष्टीचे गांभीर्य नसल्यामुळे सेल्फी काढणार्‍यांच्या वृत्तीतून त्यांनी या दोन्ही कृती केलेल्या असू शकतात.  त्यामुळे त्याकडे दुर्लक्षच करणे योग्य. या दौर्‍यात समोर आलेले दोन महत्त्वाचे विषय म्हणजे भारतातून पळून गेलेले आर्थिक गुन्हेगार आणि खलिस्तानवाद्यांनी घेतलेला आश्रय.

भारतीय बँकांना कोट्यवधींचा चुना लावून ब्रिटनमध्ये पळालेल्या नीरव मोदी, विजय मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाचा विषय स्वाभाविकपणे आला. त्यावर आपण त्यांच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे; परंतु कायदेशीर बाबींमध्ये प्रकरण अडकले असल्याचे सांगून त्यांनी आपली सोडवणूक करून घेतली. भारतातील गुन्हेगारांना आमच्या देशाच्या कायद्यांचा गैरवापर करू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले असले, तरी अशा अनेक गुन्हेगारांचे आश्रयस्थान ब्रिटन बनले असल्याची वस्तुस्थिती नजरेआड करून चालत नाही.

ब्रिटनमधील खलिस्तानवाद्यांसंदर्भातील प्रश्नही त्याच प्रकारचा होता आणि त्यावरही त्यांनी सरकारी छापाचे उत्तर देऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. कट्टरपंथी आणि दहशतवाद्यांबाबत आम्ही कधीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्टीकरण त्यांना द्यावे लागले. वर्तमान स्थितीमध्ये जॉन्सन यांचे भारतात उत्साही स्वागत होणे स्वाभाविक होते. ते झाले आणि त्यामुळे जॉन्सन भारावून गेले. या स्वागतामुळे आपण सचिन तेंडुलकर किंवा अमिताभ बच्चन असल्यासारखे वाटल्याचे जॉन्सन यांनी सांगितले.

भारताचे क्रिकेट आणि चित्रपटाचे वेड, तसेच या दोन क्षेत्रांतील महानायकांचा उल्लेख करून त्यांनी भाबड्या भारतीयांची नेमकी नस पकडण्याचा प्रयत्न केला. भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांतील चढ-उतार अनेकदा चिंतेचे विषय ठरतात. बोरिस जॉन्सन यांच्या दौर्‍यातून दोन नेत्यांमधील संबंधांऐवजी दोन देशांमधील संबंधांची चर्चा व्हावी, एवढीच अपेक्षा!

Back to top button