वसुंधरेपुढील आव्हाने | पुढारी

वसुंधरेपुढील आव्हाने

हे ब्रह्मांडच अनादिअनंत आहे. पृथ्वी त्याचाच एक भाग आहे. पृथ्वीचा नाश होईल, अशी कल्पनाही कुणी केली नसेल; पण पृथ्वीचाही शेवट आहे, असे शास्त्रज्ञांना वाटते. जीवाश्मांचा पुरावा आपल्याला सांगतो की, पृथ्वी या ब्रह्मांडात 3.5 अब्ज वर्षांपासून फिरत आहे. एवढ्या काळात तिने भयंकर हिमयुगे पचवली, अंतराळातून बरसणारे दगड सहन केले. विषारी आणि विखारी किरणोत्सर्ग सोसला, तरीही पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट झाली नाही. तरीही, अशी काही महाकाय संकटे आहेत ज्यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट होण्याचा धोका आहे.

ज्वालामुखीचा उद्रेक साधारण 25 कोटी वर्षांपूर्वी म्हणजे पर्मियन युगाच्या शेवटी पृथ्वीवरील 85 टक्के जीवसृष्टी नष्ट झाली होती आणि त्यातील 95 टक्के जीव हे समुद्रातील होते. 25 कोटी वर्षांपूर्वी सैबेरियाच्या मोठ्या जमिनीवर लाव्हा पसरला तेव्हा तेथील जीवसृष्टी पार गुदमरून गेली. त्यानंतर 20 कोटी, 18 कोटी आणि 65 लाख वर्षांपूर्वी असे उद्रेक झाले. नॉर्वेतील ओस्लो विद्यापीठातील शास्त्रज्ञ हेन्रिक स्वेन्सेन सांगतात की, एखाद्या ठिकाणी पृथ्वीचे कवच फोडून ज्वालामुखीचा लाव्हा किती वेगाने बाहेर पडतो, यावर पृथ्वीवरील जीवसृष्टी किती प्रमाणात नष्ट होईल, हे अवलंबून आहे. 25 कोटी वर्षांपूर्वीचा ज्वालामुखीचा उद्रेक जीवसृष्टीच्या विनाशाला कारणीभूत ठरला नसेल, असे स्वेन्सेन यांना वाटते. त्यांच्या मते सैबेरियात मीठाचे साठे मोठ्या प्रमाणावर आहेत. ज्वालामुखीच्या उष्णतेने ते गरम झाले तेव्हा त्यातून ओझोन नष्ट करणारे रासायनिक घटक बाहेर पडले त्यामुळे बहुतांश जीवसृष्टी नष्ट झाली असावी.

लघुग्रहाची धडक

पृथ्वीवर एक लघुग्रह धडकला आणि त्यामुळे झालेल्या उलथापालथीत डायनासोर नष्ट झाले असा एक सिद्धांत मांडला जातो. आताही अशी घटना होऊ शकते; पण असा लघुग्रह पृथ्वीवर नेमका कुठे धडकतो त्यावर जीवसृष्टीची किती हानी होईल, हे अवलंबून आहे. लघुग्रह आदळल्यानंतर त्यातून मोठ्या प्रमाणावर धूळ निर्माण होऊन कदाचित हवामान बदलही घडू शकतो आणि त्यातून जीवसृष्टी नष्ट होण्याचा धोका आहे. तथापि, लघुग्रह आदळण्याच्या घटना पृथ्वीवर अत्यंत दुर्मीळ आहेत.

पृथ्वीचा गाभा गोठला, तर

पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र दुर्बल होत असल्याचे तुम्ही वारंवार ऐकत असाल; पण यामुळे काळजीचे कारण नाही. या चुंबकीय क्षेत्राची दिशा बदलू शकते; पण ते मृत होत नाही आणि दिशाबदलाची प्रक्रियाही लाखो, कोट्यवधी वर्षांतून घडत असते; पण हे चुंबकीय क्षेत्र नष्टच झाले तर? केंब्रिज विद्यापीठाचे रिचर्ड हॅरिसन यांना अशी शक्यता वाटत नाही. तसे घडलेच, तर पृथ्वीचा बाहेरील गाभा गोठेल; पण असे होण्याची शक्यता नाहीच, असे ते म्हणतात.

पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट होण्याच्या या शक्यता आहेत. पण, पृथ्वीच नष्ट होण्याची शक्यता कितपत आहे, याविषयीही शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आहे. एक सिद्धांत असा आहे की, प्रत्येक गोष्ट एका निश्चित अशा वेळी स्वत:ला मुक्त करते. कारण, ऊर्जा कायम बंधनात राहू शकत नाही. या सिद्धांताला एपोप्टोसिस असे म्हटले जाते; पण या सिद्धांतावर मात करणारा एक सिद्धांत आहे तो म्हणजे अमरत्वाचा सिद्धांत. प्रत्येक जीव आपल्या मृत्यूच्या आधी आपले प्रारूप तयार करून अमरत्व प्राप्त करते. म्हणजे एखादे झाड मरण पावते; पण त्यापूर्वी त्याचे बीजारोपण होऊन त्याची अनेक रूपे झाडांत जिवंत असतात. माणूस मरतो; पण त्याच्या संततीच्या रूपाने तो जिवंत असतो, तसेच पृथ्वीचेही आहे. पृथ्वीची बीजे अन्य ग्रहांवर अंकुरित झाली, तर त्यातून नवी पृथ्वी आकार घेऊ शकते.

सूर्याची सुमारे 54 टक्केच उष्णता पृथ्वीकडे येते. बाकीची उष्णता ओझोनमुळे परस्पर परावर्तीत होते. परंतु, या ओझोनच्या थरालाही वाढत्या प्रदूषणामुळे धोका निर्माण झाला आहे. निसर्गानुकूल, पर्यावरणपूरक वर्तणूक आणि कृती करण्याचा संकल्प प्रत्येकाने करायला हवा आणि तो अमलात आणायला हवा, तरच वसुंधरा दिन सार्थकी लागला, असे म्हणता येईल. अन्यथा…

पृथ्वी या ब्रह्मांडात 3.5 अब्ज वर्षांपासून फिरत आहे. एवढ्या काळात तिने भयंकर हिमयुगे पचवली, अंतराळातून बरसणारे दगड सहन केले; पण आता पृथ्वीच्या र्‍हासाला माणूस जबाबदार ठरतो की काय, अशी स्थिती आहे.

– प्रा. विजया पंडित

Back to top button