महाविकास आघाडी आणि भाजप संघर्ष टोकाला जाण्याची चिन्हे | पुढारी

महाविकास आघाडी आणि भाजप संघर्ष टोकाला जाण्याची चिन्हे

नुकत्याच संपलेल्या विधिमंडळ अधिवेशनात महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात परस्परांवर तोफांचा भडिमार झाला. हाच संघर्ष चालू वर्षात होणार्‍या 14 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या मिनी विधानसभा म्हणून म्हटल्या जाणार्‍या निवडणुकांच्या निमित्ताने आणि वेगवेगळ्या यंत्रणांच्या कारवायांमुळे टोकाला जाण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्रात उष्णतेची लाट आली असताना राजकीय तापमानाचा पाराही चांगलाच वाढला आहे. नुकत्याच संपलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात अर्थसंकल्पासह इतर कामकाज झाले. मात्र, त्यापेक्षा गाजले ते आरोप-प्रत्यारोप. सत्तारूढ महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील सामना जबरदस्त झाला. परस्परांचे वाभाडे निघाले. आता अधिवेशनानंतर नजीकच्या काळातच या संघर्षाचा पुढचा अध्याय सुरू होईल आणि तो चांगलाच हातघाईचा ठरण्याची चिन्हे आहेत.

गेल्या चार-पाच महिन्यांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवर ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’ या केंद्रीय यंत्रणांनी करडी कमान धरलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री अनिल देशमुख आणि त्यानंतर नवाब मलिक ‘ईडी’च्या कोठडीत अडकले आहेत. शिवसेनेचे मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती अनिल परब हे चौकशीच्या फेर्‍यात आहेत.

मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर ‘ईडी’च्या रडारवर आहेत. त्यांचे ठाण्यातील 11 फ्लॅट जप्त झाले आहेत. संजय राऊत, मुंबई मनपाचे स्थायी समितीचे माजी सभापती यशवंत जाधव, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आदींच्या मागे चौकशीचा ससेमिरा आहे. यशवंत जाधव यांची डायरी आणि त्यातील ‘मातोश्री’चा उल्लेख गाजत आहे.

कारवाईच्या अशा पार्श्वभूमीवर विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभ झाला. भाजपने पहिल्या दिवसापासूनच नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. सभागृहाबाहेरही त्यासाठी ठिय्या आंदोलन केले. अधिवेशन काळात एकामागून एक कारवाया होत होत्या. किरीट सोमय्या यांचे आरोप, संजय राऊत यांचे प्रत्यारोप सुरू होते. अधिवेशनाचे कुरुक्षेत्रच झाले आणि भाजप व महाविकास आघाडीतील संघर्ष विकोपाला गेल्याचे दिसले.

पेनड्राईव्ह बॉम्ब

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पेनड्राईव्ह बॉम्बने हा संघर्ष आणखी टोकदार झाला. भाजप नेत्यांना वेगवेगळ्या गुन्ह्यांत अडकवण्याचे कारस्थान रचण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. त्याला उत्तर म्हणून फोन टॅपिंग प्रकरण पुढे करण्यात आले; पण पेन ड्राईव्हचे अस्त्र अधिक प्रभावी ठरले. मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना टोलेबाजी केली. सामना अटीतटीचा झाला; पण अनिर्णीत राहिला. विरोधक चांगलेच आक्रमक राहिले. मात्र, महाविकास आघाडीही फारशी बॅकफूटवर गेली, असे दिसले नाही.

‘महाविकास’ला धास्ती

सर्वाधिक जागा संपादन करूनही सत्ता मिळवता आली नाही आणि पहाटेचा शपथविधीचा औट घटकेचा प्रयोग फसला, याची खंत भाजपला आहे. त्यामुळे सत्ता प्राप्तीसाठी भाजपने गेल्या वर्ष-दीड वर्षात सातत्याने पडद्याआड हालचाली केल्या. त्याला यश आले नसले, तरी महाविकास आघाडीलाही 172 सदस्यांचे बहुमत असतानाही अध्यक्षपदाची खुल्या मतदानाने निवडणूक घेण्याचे धाडस झालेले नाही. ऐनवेळी भाजप काही कोलदांडा घालील, अशी महाविकास आघाडीला धास्ती आहे. राजकीय संघर्ष किती निकराचा झाला आहे आणि महाविकास आघाडीही कशी ताक फुंकून पीत आहे, हेच यातून अधोरेखित होते.

मुंबई महापालिका रणांगणाचे वेध

आता लवकरच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे वेध लागतील. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा लक्षात घेता या निवडणुका पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता आहे. महापालिकेत कमळ फुलवण्यासाठी भाजपचा आटोकाट प्रयत्न राहील, यात शंकाच नाही. त्यातूनच मुंबई मनपातील भ्रष्टाचार बाहेर काढण्याची मोहीम भाजपने हाती घेतली आहे. यशवंत जाधवांचे डायरी प्रकरण सध्या गाजत आहेच. आणखी काही प्रकरणे बाहेर येऊ शकतात. फडणवीसांच्या ‘पेन ड्राईव्ह’मध्ये दडलंय काय, अशी चर्चा सुरू आहेच.

अधिवेशनात संघर्षाचा पहिला अध्याय झाला. आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत संघर्षाचा दुसरा अध्याय अधिक चुरशीने लिहिला जाईल. मुंबई महापालिकेवरची आपली सत्ता अबाधित ठेवण्यासाठी शिवसेना सर्व ताकद पणाला लावील, तर शिवसेनेचे एक महत्त्वाचे सत्तास्थान हिसकावून घेण्यासाठी भाजप जंग जंग पछाडील. मैदानात हेच दोन मुख्य प्रतिस्पर्धी असतील. एकेकाळी काँग्रेसचा मुंबईत चांगला दबदबा होता. आता महाविकास आघाडी एकत्र लढणार की मैत्रीपूर्ण लढती होणार, हे गुलदस्त्यात आहे. या निमित्ताने तरी काँग्रेसची मरगळ संपणार का, हा प्रश्नच आहे.

मिनी विधानसभा

मुंबई महापालिका क्षेत्रातून 36 आमदार निवडून येतात. या महापालिकेबरोबर राज्यातील 14 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदा यांच्याही लढती होतील. जिल्हा परिषदाअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्याही निवडणुका होतील. एकूण हे वर्ष मिनी विधानसभा रणांगणाचे ठरणार आहे. भाजप आणि महाविकास आघाडी यांची या लढतीत अग्निपरीक्षाच होणार आहे. अधिवेशनात जो संघर्षाचा अध्याय झाला, तो या भावी प्रखर संघर्षाची नांदीच म्हटली पाहिजे.

सुरेश पवार

Back to top button