पाणी बचतीचे महत्त्व केव्हा कळणार? | पुढारी

पाणी बचतीचे महत्त्व केव्हा कळणार?

जगभरातील सुमारे तीन अब्ज लोकांसमोर पाण्याची समस्या उभी आहे आणि विकसनशील देशांमध्ये ही समस्या गंभीर होत चालली आहे. पाणी टंचाईची समस्या भविष्यात अतिशय धोकादायक रूप धारण करू शकते.

पाणी टंचाईची समस्या जगातील जवळपास सर्वच देशांची गंभीर समस्या बनली आहे. या परिस्थितीचा विचार करून जलसंधारण आणि देखभालीबाबत जगभरातील लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी 1992 मध्ये रिओ दि जानेरो येथे आयोजित पर्यावरण आणि विकास विषयावरील संयुक्त राष्ट्र परिषदेत (यूएनसीईडी) संयुक्त राष्ट्रांनी जलदिनाची घोषणा केली होती. संयुक्त राष्ट्रसंघाच्या याच घोषणेनंतर 22 मार्च 1993 रोजी पहिला जागतिक जलदिन साजरा करण्यात आला. खरे तर सध्या जगात दोन अब्ज लोक असे आहेत, ज्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही आणि शुद्ध पाणी न मिळाल्याने लाखो लोक आजारी पडून अकाली बळी जातात.

भारतात 2011 मध्ये पहिल्यांदाच पाण्याचे संकट असलेल्या देशांच्या यादीत आपला देश समाविष्ट झाला होता. 15 ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधानांनी देशातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोहोचविण्यासाठी जलजीवन मिशन नावाची मोहीम सुरू केली होती. सरकारी आकडेवारीनुसार, ही मोहीम सुरू होण्यापूर्वी देशातील ग्रामीण भागात केवळ 3.23 कोटी कुटुंबांकडे नळ कनेक्शन होते. या योजनेअंतर्गत 2024 पर्यंत 19.22 कोटी ग्रामीण कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे.

आकडेवारी पाहता, ही मोहीम सुरू झाल्यापासून 28 महिन्यांच्या कालावधीत एकूण 5.44 कोटी कुटुंंबांना नळाने पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील एकूण 8.67 कोटी लोकांना नळाद्वारे पाणी मिळत आहे. मात्र, घरोघरी पाणीपुरवठ्याचा खरा फायदा व्हायचा असेल, तर नळाद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा सुरळीत असायला हवा. ज्यावेळी जलस्रोतांवर देखरेख ठेवण्याची उत्तम व्यवस्था असेल आणि जलसंवर्धनासाठी भावी काळात प्रयत्न केले गेले, तरच हे शक्य आहे.

पृथ्वीवर उपलब्ध एकूण पाण्यापैकी फक्त तीन टक्के स्वच्छ पाणी उरले आहे आणि त्यातील सुमारे दोन टक्के पाणी बर्फाच्या स्वरूपात पर्वतांवर आणि ध्रुवांवर आहे. उर्वरित एक टक्का पाणी फक्त वापरण्यासाठी उपलब्ध आहे. एक टक्का पाणी पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या सुमारे 95 टक्के भूगर्भातील पाण्याच्या रूपात पृथ्वीच्या खालच्या थरात आणि उर्वरित भूपृष्ठावरील पाण्याच्या स्वरूपात तलाव, सरोवरे, नद्या किंवा कालवे आणि मातीतील आर्द्रतेच्या स्वरूपात उपलब्ध आहे. लोकसंख्येचा वेग झपाट्याने वाढत असला, तरी भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्याऐवजी घटत चालली आहे.

देशातील जलसंकट अधिक गडद हेण्याचे मुख्य कारण म्हणजे, भूजलाची सतत कमी होत जाणारी पातळी. एका अहवालानुसार, जगभरातील सुमारे तीन अब्ज लोकांसमोर पाण्याची समस्या उभी आहे आणि विकसनशील देशांमध्ये ही समस्या गंभीर होत चालली आहे. या देशांमध्ये सुमारे 95 टक्के लोकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. आशिया खंडात आणि विशेषतः भारतात पाण्याची समस्या अतिशय गंभीर रूप धारण करीत आहे.

पाणी टंचाईची समस्या जगभर झपाट्याने वाढत असून, भविष्यात ती अतिशय धोकादायक रूप धारण करू शकते. तेलासाठी आखातात युद्धे आपण पाहिलीच; पण जलसंकट कायम राहिल्याने किंवा अधिक बिकट झाल्याने येत्या काही वर्षांत पाण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये युद्धे होतील आणि कदाचित पुढचे महायुद्धही याच मुद्द्यावरून लढविले जाईल, अशी भीती बहुतांश तज्ज्ञांना वाटते. जगभर पाण्याच्या टंचाईमुळे विविध देशांमधील पाणी करारांवर आणि भारतासारख्या देशात अगदी वेगवेगळ्या राज्यांमधील करारांवरही संकटाचे ढग दाटून आले आहेत.

म्हणूनच पाण्याचे महत्त्व वेळीच समजून घेतले पाहिजे. पाणी हेच जीवन आहे आणि पाण्याशिवाय पृथ्वीवर जीवनाची कल्पनाही करता येणार नाही, हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु, जेव्हा आपण पाण्याचा सर्वत्र दुरुपयोग होताना पाहतो तेव्हा खूप वाईट वाटते. पाण्याच्या अंधाधुंद वापराबरोबरच नद्या, तलाव, झरे आदी आपले पारंपरिक जलस्रोत दूषित करण्यात आपण कोणतीही कसर सोडलेली नाही. पावसाचा प्रत्येक थेंब अनमोल आहे आणि तो वाचविणे अत्यंत आवश्यक आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. पावसाच्या पाण्याच्या संवर्धनाकडे विशेष लक्ष दिल्यास नद्यांमध्ये जाणार्‍या पाण्याचे संवर्धन करून पाणी टंचाई सहज दूर करता येऊ शकते आणि त्यामुळे जलसंकटाला बर्‍याच अंशी तोंड देता येईल.

– रंगनाथ कोकणे, पर्यावरण अभ्यासक

Back to top button